हारुकी मुराकामी
हारुकी मुराकामी (जपानी: 村上 春樹 ; रोमन लिपी: Haruki Murakami ;) (जानेवारी १२, इ.स. १९४९ - हयात) हा जपानी लेखक व अनुवादक आहे. त्याचे साहित्य समीक्षकांनी नावाजले आहे, तसेच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर' या कादंबरीला 'फ्रान्झ काफ्का पुरस्कार मिळाला असून जेरुसलेम पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
हारुकी मुराकामी | |
---|---|
हारुकी मुराकामी इ.स. २००५ साली एम.आय.टी. येथे व्याख्यान देताना | |
जन्म | जानेवारी १२, इ.स. १९४९ |
राष्ट्रीयत्व | जपानी |
कार्यक्षेत्र | साहित्य, अनुवाद |
साहित्य प्रकार | कादंबरी |
स्वाक्षरी |
सद्यकालीन साहित्यिकांमध्ये त्याला मान आहे द गार्डियन दैनिकाने त्याच्या साहित्यकृती व पुरस्कारांमुळे "आज हयात असणाऱ्या जगातील थोर साहित्यिकांपैकी एक" म्हणून त्याला गौरवले आहे.
जीवन
संपादनदुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपानात मुराकामीचा जन्म क्योतो येथे झाला. त्याचे बालपण शुकुगावा (निशिनोमिया), अशिया, कोबे येथे गेले. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील) हे बौद्ध पुरोहित होते व आईचे वडील ओसाक्यातले एक व्यापारी होते. त्याचे आईवडील दोघेही जपानी साहित्य शिकवत असत.
लहानपणापासूनच मुराकामीवर पाश्चिमात्य विचारसरणीचा, विशेषतः पाश्चिमात्य संगीत व साहित्याचा जबरदस्त पगडा होता. अमेरिकन लेखकांची पुस्तके वाचत तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यात व इतर जपानी साहित्यिकांमध्ये हा मोठा फरक दिसून येतो.
तोक्यो येथील वासेदा विद्यापीठात त्याने नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथेच त्याची व पत्नी योको हिची प्रथम गाठ पडली. त्याने पहिली नोकरी एका रेकॉर्ड दुकानात धरली. (नॉर्वेजियन वूड या त्याच्या कादंबरीतले एक मुख्य पात्र, तोरू वातानाबेदेखील तेथेच नोकरी करताना दाखवला आहे.) अभ्यासक्रम संपत आलेला असतानाच मुराकामीने त्याच्या पत्नीच्या साथीने 'पीटर कॅट' नावाचे एक कॉफीहाऊस (जे संध्याकाळी जॅझ बार असे) कोकुबुंजी, तोक्यो येथे सुरू केले. हा बार त्यांनी इ.स. १९७४पासून इ.स. १९८१पर्यंत चालवला.
त्याच्या बहुतांश कादंबऱ्यांतील मध्यवर्ती संकल्पना व शीर्षके ही शास्त्रीय संगीताशी निगडित असतात. उदा. द वाइंड-अप बर्ड क्रॉनिकलातील तीन पुस्तके. यांपैकी 'द थिविंग मॅगपाय' रोझिनीच्या ऑपेरा ओव्हरशरावर बेतले आहे, 'बर्ड अॅज प्रॉफेट' हे रॉबर्ट शुमन याच्या इंग्लिशीत द प्रॉफेट बर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पियानो संगीताच्या तुकड्यावर आधारित असून 'द बर्ड कॅचर' हे मोझार्टाच्या द मॅजिक फ्लूट या ऑपेऱ्यातल्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.
मुराकामी हा मॅराथॉन व ट्रायथलॉन धावपटू आहे. त्याने वयाच्या तेहतिसाव्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. जून २६, इ.स. १९९६ साली त्याने पहिली अल्ट्रामॅराथॉन (होक्काइडो येथील सरोमा सरोवराभोवतीची १०० किलोमीटरची शर्यत) पूर्ण केली. त्याच्या धावण्यासंबंधी त्याने इ.स. २००८ साली प्रकाशित केलेल्या त्याच्या व्हॉट आय टॉक अबाऊट व्हेन आय टॉक अबाऊट रनिंग या पुस्तकात लिहिले आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)