सदाशिव कानोजी पाटील
सदाशिव कान्होजी पाटील, तथा स.का. पाटील, (११ ऑगस्ट, इ.स. १८९८ - - १९८१) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. स.का. पाटील हे कधी काळी मुंबईचे महापौर होते आणि जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७) मंत्रिमंडळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.
सदाशिव कानोजी पाटील | |
---|---|
जन्म |
१४ ऑगस्ट, इ.स. १८९८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | स.का. पाटील |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आचार्य अत्र्यांनी ठेवलेल्या सदोबा पाटील या नावानेच ते ओळखले जात. मुंबईतील चर्नी रोड स्टेशन नजीकच्या एका छोट्या बगिच्याला स.का.पाटील उद्यान म्हणतात; बगिच्याचे जुने नाव जपानी गार्डन असे होते.
जीवन
संपादनस.का. पाटील मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले.[२] मुंबईतही ते रात्रशाळेत शिकवत असत. [३]बॉम्बे मिल मजदूर युनियनची स्थापना केली पण नंतर ही युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये विलीन झाली..[४]
राजकीय कारकीर्द
संपादनस.का. पाटीलांनी कामगार संघटनेचे नेतृत्वही केले होते परंतु ते उजव्या विचारसरणीचे समजले जात. स.का. पाटलांनी काँग्रेसच्या वतीने राजकारणातील कम्युनिस्ट आणि डाव्या विचारधारांवर मात करण्याचा प्रयत्न केला, असे मानले जाते. आंध्रातील आणि महाराष्ट्रातील राजकारणात इतर पुढाऱ्यांच्या एका गटाच्या माध्यमातून - सिंडिकेटच्या माध्यमातून - इंदिरा गांधींच्या डावीकडे झुकणाऱ्या भूमिकांनाही त्यांनी अडथळे उभे केले.[१][५][६][७][८]
तत्कालीन नेहरू मंत्रिमंडळातील डाव्या आर्थिक नीतींचे प्रतिनिधित्व करणारे व्ही.के कृष्ण मेनन हे केंद्रीय मंत्री मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत. ते दाक्षिणात्य होते, त्यांना राजकारणात परास्त करण्याकरिता, मुक्त अर्थशास्त्राचे समर्थक स.का. पाटीलांनी दाक्षिणात्यांना विरोधाची भूमिका लावून धरणाऱ्या शिवसेनेस पुढे आणले असे काही राजकीय निरीक्षकांचे मत होते. कृष्ण मेनन यांना दूर करण्याकरिता तत्कालीन औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या साखळी' वृत्तपत्रांतूनही कृष्ण मेनन विरोधी वातावरण जाणीवपूर्वक तापवले जात असल्याचा डाव्या विचारसरणीच्या निरीक्षकांचे मत होते.[९]
स.का. पाटलांनी मुंबईचे महापौर, मुंबई काँग्रसचे आणि नंतर महाराष्ट्र कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी पदे भूषविली. एकूण तीन वेळा लोकसभेत मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, इ.स. १९६७ च्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी पाटलांचा पराभव केला.[१०] स.का. पाटलांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणले जाई
अमेरिकेकडून धान्याची आयात
संपादनकेंद्रीय मंत्रिमंडळातील अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का. पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि दहा लाख टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लाननंतर ही अमेरिकेने दुसऱ्या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.[११]. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. [ संदर्भ हवा ]
ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या काँग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. [ संदर्भ हवा ]
अमेरीका-सोव्हियेट शीतयुद्धाच्या काळात, स.का. पाटलांवर अमेरिकेशी विशेष हितसंबध असल्याचे दर्शवणारी हेतुपुरस्सर खोटी कागदपत्रे, रशियन गुप्तचरांनी बनवून वितरित केल्याचा दावा नंतरच्या काळात एका रशियन गुप्तचराने केला होता.[१२]
मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध
संपादनस.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली.[१३] या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशी स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली.[१४][१५] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच जॉर्ज फर्नांडिसांकडून हार पत्करावी लागली.
ग्रंथ लेखन
संपादन- The Indian National Congress, a case for its reorganisation. (भाषा इंग्रजी)[१६]
प्रकाशन वर्ष इस १९४५ औंध प्रकाशन ट्रस्ट औंध
स्मरणार्थ
संपादनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावात असलेल्या हायस्कूलला स. का. पाटील विद्यामंदीर, केळूस असे नाव दिले आहे.
संदर्भ
संपादन- ^ a b "संग्रहित प्रत". 2012-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=250639[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-8727248,prtpage-1.cms[permanent dead link]
- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205977:2012-01-18-18-23-20&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210
- ^ http://www.indianexpress.com/news/the-future-is-federal/936814
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2273240[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=38294899[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/7272724.cms[permanent dead link]
- ^ http://www.mainstreamweekly.net/article3178.html
- ^ http://www.indiankanoon.org/doc/157442/
- ^ /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली
- ^ The KGB papers - ‘It seemed like the entire country was for sale’ दि टेलीग्राफ,कलकत्ता मधील Sunday, September 25, 2005 ला प्रकाशित लेख दिनांक २२/०४/२०१२ला भाप्रवे सायं १८.३० वाजता जसा दिसला
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1257648[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती[permanent dead link]
- ^ १५ नोव्हेंबर, इ.स. १९५५ लोकसभा चर्चेतील सहभाग
- ^ Guha, Ramachandra. "The battle for Bombay". द हिंदू. 2005-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-12 रोजी पाहिले.
- ^ http://openlibrary.org/works/OL12895952W/The_Indian_National_Congress