सुनंदा पुष्कर (जून २७, इ.स. १९६२ - जानेवारी १७, इ.स. २०१४) या काश्मीरमध्ये जन्मलेल्या उद्योजिका होत्या. त्यांचे वडील पोष्कर नाथ दास लष्करातून लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले व काश्मीरमध्ये स्थायिक झाले. १९९० मध्ये काश्मिरी अतिरेक्यांनी त्यांचे घर हिंसाचारात पेटवून दिल्यामुळे तिचे कुटुंब जम्मूला येऊन स्थायिक झाले. सुनंदा पुष्कर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीनगर(काश्मीर) येथे झाले. दिल्लीत हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या एका काश्मिरी युवकाशी झालेला त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही. घटस्फोटानंतर त्यांनी एका दुबईस्थित उद्योगपतीशी लग्न केले. दुबईतील टीकॉम या सरकारी कंपनीत त्यांनी नोकरी धरली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात झपाट्याने वाढणाऱ्या दुबईत नामांकित कंपन्यांची दुकाने होती. कंपनीच्या विक्री व्यवस्थापक म्हणून वावरताना त्यांनी अनेक नामवंतांशी ओळखी करून घेतल्या. त्यांतून त्यांचा वावर दुबईतील उच्चभ्रूंमध्ये सुरू झाला. या नंतर सुनंदा पुष्कर यांनी दुबईत एक स्पा काढला. जगभरातील वलयांकित व्यक्ती औषधी पाण्याच्या या तुषारस्नानगृहाला भेटी देऊ लागल्या.

भारतीय सरकारातील परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांची मैत्रीण असलेल्या सुनंदा पुष्कर यांना इंडियन प्रीमियर लीगच्या कोची फ्रँचाइझसाठी व्यावसायिक मदत केल्याबद्दल रॉन्देव्हू या कोची संघाच्या मालकांकडून सत्तर कोटी रुपयांचे समभाग बक्षिसादाखल मिळाले. यावर गदारोळ झाल्याने शशी थरूर यांचे मंत्रिपद धोक्यात आले. ते वाचावे म्हणून सुनंदा पुष्कर यांनी ते समभाग परतही केले(१८-४-२०१०). परंतु त्याचा काहीही उपयोग न होता थरूर यांना त्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

पुढे शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केले. त्यांचा संसार बहुधा सुखात चालला होता. अचानक मेहेर तरार नावाच्या एका ४५-वर्षीय पाकिस्तानी स्त्री-पत्रकाराशी शशी थरूर यांचे प्रेमसंबंध असल्याची बातमी वाचायला मिळाली. बातमीची शहानिशा होण्याआधीच सुनंदा पुष्कर यांचा मृत देह दिल्लीतील ’दि लीला’ या हॉटेलात सापडल्याची बातमी आली(१७ जानेवारी २०१४)