हणमंत नरहर जोशी
हणमंत नरहर जोशी, अर्थात "काव्यतीर्थ" कवी सुधांशु (जन्म : ६ एप्रिल, इ.स. १९१७, औदुंबर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - - १८ सप्टेंबर इ.स. २००६: औदुंबर ,सांगली, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.
जीवन
संपादनइ.स. १९३७पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. सुधांशूंना एकदा रा.अ. कुंभोजकर यांनी ’तुम्ही कवी कसे झालात?’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ’मी दोन मातांच्यामुळे कवी झालो. एक माझी जन्मदात्रीमाऊली आणि दुसरी कृष्णामाई. एकीने माझ्या अंतःकरणात कवितेची बीजे रुजवली आणि दुसरीने आपल्या निर्मलतेने आणि समृद्धीने मला काव्यदृष्टी दिली.’
सुधांशूंच्या गीतदत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले. भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा. द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती.
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. त्यांच्या घरी काही भूमिगत स्वातंत्र्यसैनिक एकदोन दिवसांसाठी गुप्तपणे मुक्कामासाठी राहून जात.गावकऱ्यांच्या कवी सुधांशूंवर असलेल्या अतूट प्रेमामुळे ही बातमी पोलिसांपर्यंत कधीच पोहोचली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स.१९६०मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९पासून सदानंद साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या सदानंद साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात.
१८ सप्टेंबर, इ.स. २००६ला कवि सुधांशु यांचे निधन झाले.
प्रकाशित साहित्य
संपादनकवितासंग्रह
संपादन- कौमुदी (१९४०)
- गीतदत्तात्रय
- गीतदत्तात्रयाचे संस्कृत भाषांतर
- गीतसुगंध
- गीत सुवर्ण
- गीतसुधा
- गीत सुषमा
- जलवंती (१९५८)
- झोपाळा
- दत्तगुरूंची गाणी
- भावसुधा (१९७३)
- यात्री
- विजयिनी (१९५०)
- श्रीदत्त गीते
- सुंदर कालिंदीकाठी
- स्वर (१९७०)
गद्यलेखन
संपादन- खडकातील झरे (कथासंग्रह)
- चतुरादेवी (बालवाङ्मय)
- दत्तजन्म (एकांकिका)
- सुभाषकथा (बालवाङ्मय)
गाजलेली गीते
संपादन- इथेच आणि या बांधावर *
- गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी
- गोकुळाला वेड लाविले *
- दत्तगुरू सुखधाम
- दत्त दिगंबर दैवत माझे *
- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा *
- देव माझा विठू सावळा *
- प्रभू या हो
- भुकेला भक्तीला भगवान *
- भुलविलेस साजणी *
- मनी माझिया नटले गोकुळ *
- माझ्या मनात विणिते नाव *
- या धुंद चांदण्यात तू *
- या मुरलीने कौतुक केले
- रुद्राक्षांच्या नकोत माळा
- स्मरा स्मरा हो *
- हिरवे पिवळे तुरे उन्हाचे *
पुरस्कार आणि मानसन्मान
संपादन- कवी सुधांशूंना शंकराचार्यांकडून काव्यतीर्थ ही पदवी मिळाली
- भारत सरकारकडून इ.स.१९७४मध्ये पद्मश्री[१]
- मराठी साहित्य परिषदेकडून कवि यशवंत पुरस्कार
- एका विद्यापीठाकडून डी.लिट.
- सांगलीकरांकडून सांगलीभूषण हा पुरस्कार
संकीर्ण
संपादनसुधांशु दत्तभक्त होते [ संदर्भ हवा ]. दत्तभक्ती हे खास करून महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. याचे कारण प्रमुख दत्तक्षेत्रे ही महाराष्ट्रातच आहेत. कवी सुधांशूंचे आयुष्यही औदुंबर या श्री दत्तात्रेयाच्या स्थानी गेले. त्यांच्या जास्तीतजास्त कवितांचे नायक श्रीदत्त आहेत. गीत दत्तात्रय संग्रहातील बहुतेक सर्व गीते ही चरित्रगीते आहेत. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह या दत्तावतारांच्या चरित्रांवर ही गीतरचना आहे. श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्री नारायणानंद स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत ’गुरुदत्त पाहिले कृष्णातिरी', ’दत्तगुरू सुखधाम’ या गीतांनी दत्तगुरूंची पहिली पूजा झाली होती.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ संजय वझरेकर (१८ नोव्हेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |