औदुंबर साहित्य संमेलन
औदुंबर (जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन भरत आले आहे. हे संमेलन दरवर्षी १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीला भरते. या संमेलनाची छापील निमंत्रणे पाठवली जात नाहीत. कार्यकारी मंडळाची बैठक होते. तीत अध्यक्ष निवडला जातो. संक्रातीच्या दोन दिवस आधी ही बातमी सांगलीच्या व कोल्हापूरच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होते. निमंत्रित अध्यक्ष हे नामवंत मराठी साहित्यिक असतात. जिल्ह्यांतील अनेकांना ही बातमी मौखिक प्रचाराद्वारे समजते. मग परिसरातील साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, शाळामहाविद्यालयांतील विद्यार्थी आणि अन्य साहित्यप्रेमी, औदुंबर गावी दुपारी चार वाजता पोहोचता येईल अशा बेताने आपापल्या गावी बस पकडण्यासाठी गर्दी करतात. संमेलनस्थळी असलेला लांबरुंद उंच कट्टा हे व्यासपीठ असते. छायादार वृक्षांच्या सावलीत अंथरलेल्या मोठ्या सतरंज्यांवर मंडळी आसने पकडून बसत आणि संमेलनातील वक्त्यांची भाषणे व कविसंमेलनांत कवींच्या कविता मनापासून ऐकत. भाषणे ऐकताना ज्या विशाल वृक्षाची सावली श्रोत्यांवर पडत असे, तो वृक्ष २००७ साली कोसळला. त्यामुळे त्यानंतर दरवर्षी संमेलनाच्या जागी मांडव घालावा लागतो.
या संमेलनाला सदानंद साहित्य संमेलन म्हणूनही ओळखले जाते.
औदुंबर गाव
संपादनसांगली जिल्ह्यातील औदुंबर हे दत्त देवस्थान सर्वदूर परिचित असलेले असे एक अत्यंत मनभावन ठिकाण आहे. हे गाव अगदी टिकलीएवढे गाव आहे. आजतागायत या गावाला ग्रामपंचायतसुद्धा नाही. कारण दत्त देवस्थानच्या निमित्ताने तिथे जेवढी घरे उभी राहिली तेवढी घरे हाच या गावाचा परिसर आहे. औदुंबरची ग्रामपंचायत अंकलखोप ही आहे आणि अंकलखोप व औदुंबर ही आवळी-जावळी वाटावीत अशी गावे आहेत. सुपीक जमिनीमुळे आणि संथ वाहणाऱ्या कृष्णामाईमुळे ही गावे गेली कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
इतिहास
संपादनअशा औदुंबरच्या कृष्णाकाठी १९३७ साली सदानंद सामंत व हणमंत नरहर जोशी या दोन शाळकरी मुलांच्या मनात गावात 'बालशारदा मंडळ' स्थापण्याची कल्पना आली आणि त्यांनी तशी स्थापनाही केली. यानिमित्ताने आपल्या सवडीनुसार कधीतरी काव्यवाचन करावे आणि साहित्यिक गप्पाटप्पा कराव्यात एवढाच माफक हेतू मनात ठेवून ही सभा सुरू झाली. पण दुर्दैवाने १९३९ साली सदानंद सामंत या गुणी मुलाचा विषमज्वराचा ताप येण्याचे निमित्त होऊन अकाली मृत्यू झाला. त्याचे सारे सवंगडी सैरभैर झाले. आणि यातूनच भविष्यात गुणवंत कथाकार म्हणून नावारूपाला आलेले म. बा. भोसले व हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांनी आजच्या 'सदानंद साहित्य संमेलना'ला प्रारंभ केला.
हे संमेलन संक्रांतीच्या मंगल मुहूर्तावर संपन्न करायचे असा इरादाही या दोघांनी जाहीर करून टाकला आणि त्यांनी रोवलेली ही मुहूर्तमेढ आजही 'संक्रांतीचे संमेलन' म्हणून अवघ्या परिसरात प्रसिद्ध आहे.
पहिले संमेलन
संपादनदत्तो वामन पोतदार हे, १४-१-१९३९ रोजी झालेल्या पहिल्या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या पहिल्या साहित्य संमेलनाला गावकऱ्यांच्या घरी जाऊन व त्यांना पुन्हा पुन्हा बोलावूनही जेमतेम २५ माणसे हजर होती. ती महामहोपाध्याय पोतदारांचे एका तासाचे भाषण संपताच घरोघरी निघून गेली. नाराज झालेल्या कवि सुधांशूंना दत्तो वामन पोतदार म्हणाले, "ही पंचवीस माणसे पुरेशी आहेत. काहीतरी ऐकण्याच्या इच्छेने ती आली होती हे विशेष. पंधरा माणसे जमली असती तरीसुद्धा मला वाईट वाटले नसते. या तीस-चाळीस घरांच्या खेड्यात मराठी भाषेच्या प्रेमाखातर ही मुले एकत्र आली हीच माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी आणखी माणसे जमतील, हळूहळू तीं वाढत जातील, मराठी भाषेचा गजर करतील, खंताऊ नका. तुमचे काम न थकता चालू ठेवा." आणि महामहोपाध्यायांचे हे भाकीत खरे ठरले.
नंतरची संमेलने
संपादनकवि सुधांशूंच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा पुरुषोत्तम आणि कराड गावचे लेखक संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनी संमेलनाची प्रथा चालूच ठेवली. इ.स. २०१७ साली, ७४वे औदुंबर मराठी साहित्य संमेलन झाले.
यापूर्वीचे संमेलनाध्यक्ष
संपादन- औदुंबर साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष
- दत्तो वामन पोतदार (पहिले अध्यक्ष), अनंत काणेकर, कवी अनिल, अरुण साधू, आनंद यादव, गो.नी. दांडेकर, निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर (२०१५), ना.धों. महानोर, पु.ल. देशपांडे, महादेवशास्त्री जोशी, कवी यशवंत, यू.म. पठाण, डॉ. रा.चिं. ढेरे, वसंत बापट, विजय तेंडुलकर, डॉ. विजया राजाध्यक्ष, वि.द. घाटे, विंदा करंदीकर, विश्वास पाटील (२०१७), वि.स. खांडेकर, शंकर पाटील, श्री.म. माटे.
पहा : मराठी साहित्य संमेलने