सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

(सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

सुरुवात

संपादन

पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात आपले गुरू सवाई गंधर्वांच्या पहिल्या स्मृती दिनापासून इ.स. १९५२ मध्ये हा संगीत महोत्सव सुरू केला. त्यांचे गुरूबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरूभगिनी गंगुबाई हनगल यांचाही या महोत्सवात पहिल्या वर्षापासून सहभाग होता.

हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडेपु.ल. देशपांडे यांचेही सहकार्य लाभले.

पुण्याचा ब्रँड

संपादन

गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पुण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे. कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.

उत्सवाचे स्थळ

संपादन

प्रारंभी आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे होणारा हा महोत्सव रेणुका स्वरूप हायस्कूल, नूमवि प्रशाला अशी त्रिस्थळी वाटचाल करून शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर स्थिरावला. मध्यंतरी एक वर्ष गणेश कला क्रीडा मंच येथेही हा महोत्सव झाला होता. मात्र, हे स्थळ पुणेकरांच्या पचनी पडले नसल्याने महोत्सव पुन्हा एकदा रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होऊ लागला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा संगीत महोत्सव होतो.

उत्सवात होणारी कलावंताची आणि तो सादर करीत असलेल्या कलाकृतीची ओळख

संपादन

महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते. कलाकाराबद्दलची माहिती, तो सादर करणार असलेल्या रागाबद्दल आणि त्यातील बंदिशीबद्दलची सविस्तर माहिती देणे हे सवाई महोत्सवात अगदी न चुकता होते. त्याचा परिणाम म्हणजे गाणे ऐकताना राग न कळल्यामुळे येणारी अस्वस्थता या महोत्सवाच्या मंडपात दिसत नाही. उलट नंतर पुन्हा कधीतरी तोच राग वेगळ्या कलाकाराकडून ऐकताना ‘सवाई’मधील त्या मैफलीची हटकून आठवण होते. अशा कितीतरी कलाकारांचे स्वरदर्शन महोत्सवाच्या स्वरमंचावरून झाले आहे. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, पं. संगमेश्वर गुरव, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारखे सवाई गंधर्वाचा वारसा पुढे नेणारे कलाकार रसिकांचे कान तृप्त करीत राहिले. त्याचप्रमाणे कितीतरी नावे या महोत्सवामुळे रसिकांच्या जवळची झाली.

महोत्सवाचा कालावधी

संपादन

रात्री दहानंतर ध्वनिवर्धकावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या महोत्सवाचे स्वरूपही बदलले. पूर्वी तीन रात्री चालणारा हा महोत्सव न्यायालयाच्या आदेशानंतर चार दिवस आणि पाच सत्रांत होऊ लागला.

महोत्सवाच्या सांगतेचे सादरीकरण

संपादन

महोत्सवाची सांगता पूर्वी स्वतः पंडीत भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. वृद्धापकाळामुळे त्यांनी सादरीकरण थांबवल्यानंतर किराणा घराण्याच्या इतर गायकांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. २००५ साली संगमेश्वर गुरव यांच्या गायनाने उत्सवाची सांगता झाली. २००७ पासून किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या गायनाने उत्सवाची सांगता होते. उत्सवाची अधिकृत सांगता सवाई गंधर्वांच्या आवाजातील राग भैरवी मधील प्रसिद्ध ठुमरी जमुना के तीरची ध्वनिमुद्रिका ऐकवून केली जाते.

रसिकांचा सहभाग

संपादन

महोत्सवात हजारोंच्या संख्येने रसिक सहभागी होतात, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील विविध गावातून, तसेच परदेशातूनही ह्या महोत्सवासाठी रसिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.

भारतातील अन्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत महोत्सव

संपादन
  • कलकत्त्यातील डोव्हर लेन महोत्सव
  • जालंधरचा हरवल्लभ मेळा (इ.स. १८७५पासून)
  • भोपाळचा तानसेन महोत्सव
  • मुंबईचे स्वामी हरिदास संगीत संमेलन
  • पुण्याचा स्वरझंकार महोत्सव
  • मुंबईचा गुणिदास संगीत समारोह, वगैरे वगैरे.


हे देखील पहावे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे संकेतस्थळ
  • "हीरक महोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव".[permanent dead link]
  • "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फोटो". 2014-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-14 रोजी पाहिले.