जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच: Actions, स्पॅनिश: Acciones, पोर्तुगीज: Ações, जर्मन: Aktien, इंग्लिश: Shares / Stocks , शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत[श १] म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक [श २] म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.

"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या मुंबईतील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र

समभागांचे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण समभाग [श ३] आणि अधिमान्य समभाग [श ४]. सामान्य जनतेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात.

हे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट समभागाच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढ‍उतार होतात.

पुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफ्याचा मोठा हिस्सा हा लाभांश [श ५] म्हणून भागधारकांना दिला जातो. दर समभागामागे किती लाभांश देऊ केला आहे, हे भागधारकाला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्या वेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही.

वित्तीय बाजारांमधील समभाग म्हणजे साधारण समभाग [श ३] किंवा अधिमान्य समभागांसारख्या [श ४] विविध वित्तीय साधनांसाठी[श ६], तसेच मर्यादित भागीदारी[श ७]स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील[श ८] गुंतवणुकीसाठी हिशेबाचे एकक[श ९] असतो.

पारिभाषिक शब्द

संपादन
  1. ^ दर्शनी किंमत (इंग्लिश: Face value, फेस व्हॅल्यू)
  2. ^ भागधारक (इंग्लिश: ShareHolder, शेअरहोल्डर)
  3. ^ a b साधारण समभाग (इंग्लिश: Ordinary stock / Ordinary share, ऑर्डिनरी स्टॉक / ऑर्डिनरी शेअर)
  4. ^ a b अधिमान्य समभाग (इंग्लिश: Preferential stock / Preferential share, प्रेफरेन्शियल स्टॉक / प्रेफरेन्शियल शेअर)
  5. ^ लाभांश (इंग्लिश: Dividend, डिव्हिडंड)
  6. ^ वित्तीय साधन (इंग्लिश: Financial instrument, फायनॅन्शियल इन्स्ट्रुमेंट)
  7. ^ मर्यादित भागीदारी (इंग्लिश: Limited partnerships, लिमिटेड पार्टनरशिप्स)
  8. ^ स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ (इंग्लिश: Real estate investment trusts, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स)
  9. ^ हिशेबाचे एकक (इंग्लिश: Unit of account, युनिट ऑफ अकाउंट)