व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे जन्म दिनांक २३ जून (माहेरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे) या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. संगीताचे वडील शाळेत चित्रकला शिक्षक होते. संगीताबाईंना इयत्ता चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद लागला. पहिल्या केलेल्या कवितेच्या चार ओळी त्यांनी वर्गात सर्वांसमोर म्हणून दाखवल्या होत्या.

संगीता बर्वे या B.A.M.S (आयुर्वेदातल्या पदवीधर) आहेत. शिवाय त्यांनी त्यांनी Masters in Ayurvedic Dietetics -डायटेशियनचा अभ्यासक्रम केला आहे.

वैद्यकीय पदवीधर झाल्यानंतर संगीताबाईंनी वाचनाच्या आवडीपायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्‌मयापासून ते, निरनिराळ्या साहित्यकृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या साहित्यभूषण आहेत. त्या परीक्षेच्या अभ्यासानिमित्ताने त्यांनी संत साहित्यही वाचले.

संगीता बर्वे यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. त्यांनी मुलांसाठी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही.

संगीताबाईंचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

संगीता बर्वे या प्रख्यात गायिका मालती पांडे यांच्या स्नुषा आहेत.

मुळशी तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात झालेल्या २६व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या..

संगीता बर्वे यांची प्रकाशित पुस्तके

संपादन
  • अदितीची साहसी सफर (अनुवादित गद्य)
  • उजेडाचा गाव (कवितासंग्रह -बालसाहित्य)
  • खारुताई आणि सावलीबाई (कवितासंग्रह -बालसाहित्य)
  • गंमत झाली भारी (बालकविता)
  • झाड आजोबा (कवितासंग्रह -बालसाहित्य)
  • नल-दमयंती आणि इतर कथा
  • (५वी ते ९वी इयत्तांच्या) पाठ्यपुस्तकांतील कविता आणि त्यांचा रसास्वाद (भाग १ ते ६, उन्मेश प्रकाशन)
  • रानफुले (बालकविता)
  • पीयूची वही (रोजनिशी) : या रोजनिशीवर ‘संगीत पीयूची वही’ नावाचे बालनाट्य आहे.
  • संभाजीराजा (बालसाहित्य)
  • हुर्रे हुप (बालसाहित्य)

कवितासंग्रह

संपादन
  • उजेडाचा गाव (बालसाहित्य)
  • गंमत झाली भारी (बालसाहित्य)
  • दिवसाच्या वाटेवरून (पॉप्युलर प्रकाशन)
  • रान फुले (बालसाहित्य)
  • मृगतृष्णा (१९९८, प्रस्तावना शांता शेळके)

डी.व्ही.डी.

संपादन
  • संगीता बर्वे यांच्या संगीतबद्ध कवितांच्या ’बच्चोंकी फुलवारी’ (हिंदी), 'गंमत झाली भारी' आणि ’सारे सारे गाऊ' या तीन डीव्हीडी फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.

.

संगीता बर्वे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • ’संभाजीराजा’ या पुस्तकासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानचा काव्यदीप पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य भा.रा. तांबे पुरस्कार
  • इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार
  • विशाखा पुरस्कार
  • कामगार साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर पुरस्कार
  • अनन्वय पुरस्कार
  • संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या बालसाहित्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार (२०१५)