श्रीपाद द्वारकानाथ वैद्य
डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य (१९२६ - २५ ऑक्टोबर, २०११) हे एक मराठी कलावन्त बागवान (Landscape Architect) होते. ते पुणे महापालिकेत उद्यान अधीक्षक होते. त्यानंतर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील बगिचाला आकर्षक करायचा काम त्यांनी केले. सर होमी भाभा यांच्या उत्तेजनाने वैद्यांनी फ्रांसमधील व्हर्साय युनिव्हर्सिटीचा लँडस्केप आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम १९५८ साली केला. इटालियन पद्धतीची बोगनवेलीची बाग, पार तेर ह्या फ्रेंच धर्तीवर मांडणी केलेली कर्दळीची बाग, इंग्लिश पद्धतीचा चालत फिरण्यासारखा पार्क, झेन पद्धतीची जपानी बाग, अशा जगातील विविध पद्धतींच्या बागा त्यांनी अणुशक्ती केंद्रात लावल्या. भाभा अणुसंशोधन केंद्राचा संपूर्ण परिसर निसर्गाच्या हिरवाईने नटलेला दिसतो.
श्रीपाद द्वारकानाथ वैद्यांनी अणू केंद्राची उद्याने उभारण्याव्यतिरिक्त काश्मीरमधील मुघल गार्डन्सचा अभ्यास केला आणि त्यांची देखभाल कशी करायची याचा सल्ला शेख अब्दुल्ला सरकारला दिला. याशिवाय त्यांनी वरळीची नेहरू सेंटरची बाग, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, घारापुरी लेण्यांचा परिसर इ.चे आरेखन केले. चित्रकलेच्या जाणकारीमुळे सर होमी भाभांनी त्यांना चित्रनिवड समितीवरही घेतले होते.
वृक्षांचा समग्र अभ्यास करून सौंदर्यदृष्ट्या कोणते वृक्ष कुठे लावावेत ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. विकासकामात कधीना कधी वृक्ष काढण्याची वेळ येते. मलबार हिल येथील अशाच एका पर्जन्यवृक्षाबाबत डॉ. भाभांच्या सांगण्यावरून त्यांनी तो जिवंत वृक्ष तेथून स्थलांतरित करून पेडर रोडवरील अणू केंद्राच्या केनिलवर्थ ह्या गृहसंकुलात स्थानापन्न केला. अशा अनेक वृक्षांना वैद्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवनदान दिले आहे.
वैद्यांचे स्मरण म्हणून इंडियन सोसायटी ऑफ लॅण्डस्केप आर्किटेक्चर ह्या संस्थेतर्फे त्यांच्या नावाने दर वर्षी एक स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते.