अरविंद घोषांचे साहित्य
अरविंद घोष (श्रीअरविंद) हे उच्च विद्याविभूषित होते, बहुभाषाविद होते. महाकवी होते, लेखक होते, अनुवादक होते, संपादक होते. त्यांनी विपुल लेखन केले आहे.
(एस.ए.बी.सी.एल.) - इ.स. १९७२ मध्ये श्रीअरविंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यात आले. श्रीअरविंद आश्रमातर्फे Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL), श्रीऑरोबिंदो बर्थ सेन्टेनरी लायब्ररी या नावाने एकूण ३० खंड प्रकाशित करण्यात आले होते. [१]
(सी.डब्ल्यू.एस.ए.) - इ.स. १९९७ साली, त्यांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्ताने, पुन्हा एकदा उर्वरित अप्रकाशित साहित्याचा समावेश करत सुधारित समग्र साहित्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. आजवर त्यामधील ३६ खंडांचे प्रकाशन झाले आहे. ते खंड Complete Works of Sri Aurobindo (CWSA). कम्प्लीट वर्क्स ऑफ श्रीऑरोबिंदो या नावाने प्रकाशित करण्यात आले.आधीच्या ३० खंडामधील साहित्याव्यतिरिक्त आणखी सुमारे ३००० पानांची भर या खंडांमध्ये घालण्यात आली आहे. यामधील प्रत्येक खंड सुमारे ५०० पानांचा आहे. [२] यावरून श्रीअरविंद यांच्या बहुप्रसवा लेखणीची कल्पना येईल.
क्रमश: लिखाण
संपादनश्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे.
श्रीअरविंद यांनी अनुवादित केलेले साहित्य
संपादनश्रीअरविंद यांनी संस्कृत, बंगाली, तमिळ, ग्रीक, फ्रेंच आणि लॅटिन या भाषांमधील निवडक साहित्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यांनी वेद आणि उपनिषदांमधील निवडक साहित्याचाही अनुवाद इंग्रजीत केला आहे. त्यांनी संस्कृतमधील निवडक साहित्याचे बंगालीमध्येही भाषांतर केले आहे. इ.स. १९८३ ते इ.स.१९४० या दरम्यान त्यांनी हे अनुवादाचे कार्य केले आहे.[३]
संस्कृत मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंद यांनी रामायणामधील काही भागाचे, महाभारतामधील सभा पर्व, विराट पर्व, उद्योग पर्व यांतील काही भागाचा अनुवाद केला आहे. श्रीमद भगवद्गीता यामधील पहिले सहा अध्यायही अनुवादित केले आहेत. कालिदासांच्या मेघदूत, विक्रमोर्वशीयम्, कुमारसंभवम् यामधील काही भागाचा अनुवाद केला आहे. भर्तृहरीच्या निवडक साहित्याचा अनुवाद त्यांनी केला आहे. [४]
बंगाली मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंदांच्या अनुवादित साहित्यामध्ये काव्यरचनांचादेखील समावेश आहे. उदा. त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला आहे.[५] आपल्या शिष्यवर्गाच्या काही काव्यरचनांचा अनुवाद देखील त्यांनी केला आहे. त्यात दिलीपकुमार रॉय, निरोदबरन, ज्योतिर्मयी, निशिकांतो, सहाना, द्विजेंद्रलाल रॉय यांच्या रचनांचा समावेश आहे.
श्रीअरविंद यांनी वैष्णवांच्या भक्तिकाव्याचा अनुवाद केला आहे. चंडीदास, बिद्यापती यांच्या रचनांचा समावेश त्यात आहे. बंकिम चंद्र चटर्जी यांच्या बंदे मातरम् चा अनुवाद त्यांनी केला आहे, तसेच त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतील पहिल्या तेरा प्रकरणांचा अनुवादही श्रीअरविंद यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे.[६]
श्रीअरविंद यांनी दुर्गा स्तोत्राची रचना प्रथम बंगाली भाषेत केली. ती रचना ऑक्टोबर १९०९ साली 'धर्म' या बंगाली नियतकालिकात प्रथम प्रकाशित करण्यात आली.आणि नंतर त्यांनी स्वतः त्या रचनेचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. [७]
तामिळ मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंद यांनी अंडाल, नम्मलवार, कुलशेखर अलवार, तिरूवल्लूवर यांच्या रचनांचा अनुवाद केला आहे. श्रीअरविंद साहित्य आणि तमिळ भाषा यांच्या अभ्यासक डॉ. प्रेमा नंदकुमार यांनी म्हणले आहे, 'कुलशेखर अलवार यांचे साहित्य इंग्रजीमध्ये अनुवादित करणारे श्रीअरविंद हे पहिले होते.'
ग्रीक मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंद यांनी इलियड आणि ओडिसी या रचनांचा अनुवाद केला आहे.
लॅटिन मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंद यांनी व्हर्जिल आणि होरास यांच्या रचनांचा अनुवाद केला आहे.[८]
फ्रेंच मधून इंग्रजीमध्ये अनुवाद
संपादनश्रीअरविंद यांनी श्रीमाताजी लिखित Pri`eres et m´editations (प्रार्थना आणि ध्यान) या ग्रंथातील निवडक लिखाणाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. [३]
श्रीअरविंद यांचे काव्यलेखन व समीक्षा
संपादनश्रीअरविंद यांच्या Collected Poems या ६८७ पानी पुस्तकामध्ये त्यांच्या बहुतांशी काव्यरचनांचे संकलन करण्यात आलेले आहे.
The future poetry या पुस्तकात त्यांनी इंग्रजी काव्याची समीक्षा केलेली आहे. त्या पुस्तकात त्यांनी साहित्यशास्त्र उलगडून दाखविले आहे. 'आर्य' या नियतकालिकामध्ये इ.स. १९१७ ते १९२० या दरम्यानच्या काळात यातील लिखाण प्रकाशित होत गेले.
बाजी प्रभू ही वीररसप्रधान दीर्घ कविता श्रीअरविंद यांनी त्यांच्या राजकीय धामधुमीच्या काळातच लिहिलेली आहे. बाजी प्रभूंनी आपल्या कर्तबगारीने मृत्यूवर मिळविलेल्या विजयाचे रोमहर्षक चित्रण या कवितेत येते. मार्च १९१० मध्ये ती 'कर्मयोगिन्' या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आली होती.[९]
श्रीअरविंद यांनी साधकांना लिहिलेली पत्रे
संपादनश्रीअरविंद १९२६ पासून १९५० पर्यंतच्या काळात एकांतवासात राहत होते. त्या दरम्यानच्या काळात पत्रांच्या माध्यमातून ते साधकांशी संपर्कात होते. अशा निवडक पत्रांचे आजवर चार खंड प्रकाशित झालेले आहेत.
श्रीअरविंद यांचे राजकीय व सामाजिक विषयावरील लेखन
संपादनश्रीअरविंद यांचे राजकीय व सामाजिक विषयावरील लेखन हे प्रामुख्याने विविध नियतकालिकामधून प्रकाशित झाले आहे. धर्म, आर्य, बंदे मातरम्, इंदुप्रकाश इ.नियतकालिकामधून त्यांचे लिखाण प्रकाशित होत असे.
चित्रदालन
संपादन-
बंदे मातरम् - २९ सप्टेंबर १९०७ चा अंक
-
धर्म - बंगाली साप्ताहिक
श्रीअरविंद यांचे शिक्षणविषयक लेखन
संपादनश्रीअरविंद यांचे शिक्षणविषयक प्रमुख लिखाण १८९९ ते १९२० च्या दरम्यान लिहिले गेले आहे. [१०]
श्रीअरविंद यांचे ग्रंथात्मक लेखन
संपादनश्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. ते सारे लेखन The Complete Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यातील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे. दिव्य जीवन या ग्रंथात त्यांनी अतिमानसाचा जाहीरनामा मांडला आहे, तर मानवी एकतेचा आदर्श आणि The Human Cycle या ग्रंथांमध्ये त्यांनी भावी मानवता आणि भावी समाज यांची रूपरेषा मांडली आहे. आत्म-पूर्णत्व आणि विश्व-रूपांतरण घडवून आणणाऱ्या पूर्णयोगाचे विविध पैलू त्यांनी योग समन्वय या ग्रंथात उलगडवून दाखविले आहेत. [११]
खंड क्र. | नाव | मराठी नाव | अनुवादक | ग्रंथाचा तपशील/आशय |
---|---|---|---|---|
०१ | Early Cultural Writings | प्रारंभिक सांस्कृतिक लिखाण | - | यामध्ये साहित्य, शिक्षण, कला आणि तत्सम इतर सांस्कृतिक विषयांवरील लेखन समविष्ट करण्यात आलेले आहे. यातील बहुतांशी लेखन सन १८९० ते १९१० या कालावधीत झालेले आहे. काही थोडे लेखन १९१० ते १९२० दरम्यान झालेले आहे. |
०२ | Collected Poems | संकलित कविता | - | या ६८७ पानी पुस्तकामध्ये त्यांच्या बहुतांशी काव्यरचनांचे संकलन करण्यात आलेले आहे. सन १८८३ मध्ये, म्हणजे श्रीअरविंद १० वर्षांचे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली होती. आणि पुढे ६० वर्षे ते काव्यलेखन करीत होते. त्या कविता येथे संकलित करण्यात आल्या आहेत. |
०३-०४ | Collected Plays and Stories | संकलित नाटके आणि कथा | - | सन १८९१ ते १९१५ या कालावधीत श्रीअरविंद यांनी लिहिलेली नाटके आणि कथात्मक साहित्य येथे संकलित करण्यात आले आहे. |
०५ | Translations | अनुवाद | - | श्रीअरविंद यांनी संस्कृत, बंगाली, तमिळ, ग्रीक, फ्रेंच आणि लॅटिन या भाषांमधील निवडक साहित्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यांनी वेद आणि उपनिषदांमधील निवडक साहित्याचाही अनुवाद इंग्रजीत केला आहे. त्यांनी संस्कृतमधील निवडक साहित्याचे बंगालीमध्येही भाषांतर केले आहे. इ.स. १९८३ ते इ.स.१९४० या दरम्यान त्यांनी हे अनुवादाचे कार्य केले आहे. |
०६-०७ | Bande Mataram | वंदे मातरम् | - | सन १८९० ते १९०८ या कालावधीतील श्रीअरविंद यांची राजकीय लिखाण आणि भाषणे या खंडांमध्ये संग्रहित करण्यात आली आहेत. हे लिखाण वंदे मातरम् या वृत्तपत्रात प्रथमत: प्रकाशित झाले होते. |
०८ | KarmaYogin | कर्मयोगिन् | - | सन १९०९ ते १९१० या कालावधीतील श्रीअरविंद यांची राजकीय लिखाण आणि भाषणे या खंडामध्ये संग्रहित करण्यात आली आहेत. |
०९ | Writings in Bengali | बंगाली भाषेतील लेखन | - | श्रीअरविंद लिखित बंगाली आणि संस्कृत साहित्य या खंडामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. |
१०-११ | Record of Yoga | योगसाधनेच्या नोंदी | - | सन १९०९ ते १९२७ या कालावधीमध्ये श्रीअरविंद यांनी जी साधना केली होती त्याच्या नोंदी यामध्ये आहेत. यामध्ये 'सप्तचतुष्टय' याचा समावेश आहे. |
१२ | Essays - Divine and Human | ईश्वरी आणि मानवी निबंध | - | सन १९१० ते १९५० या दरम्यान श्रीअरविंद यांनी वेळोवेळी जे गद्य स्फुट लेखन केले ते येथे समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या हयातीमध्ये हे साहित्य प्रकाशित झालेले नव्हते. |
१३ | Essays in Philosophy and Yoga | तत्त्वज्ञान आणि योगमार्गावरील निबंध | - | सन १९१० ते १९५० या दरम्यान श्रीअरविंद यांनी वेळोवेळी जे गद्य स्फुट लेखन केले आणि ते त्यांच्या हयातीमध्ये प्रकाशितही झाले होते, ते येथे समाविष्ट करण्यात आले आहे. |
१४ | Vedic and Philological Studies | वैदिक आणि भाषाविज्ञानासंबंधी अभ्यास | - | यामध्ये वेदवाङ्मयावर श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या नोंदी आहेत, त्यांनी केलेला अनुवाद आहे. अग्निव्यतिरिक्त इतर वैदिक देवतांसंबंधीच्या ऋचांवरील भाष्य, आणि भाषाविज्ञानासंबंधीच्या नोंदी या खंडामध्ये आहेत. श्रीअरविंद यांच्या हयातीमध्ये हे लिखाण प्रकाशित झालेले नव्हते. |
१५ | The Secret of the Veda | वेद-रहस्य | ना.स.पाठक, स्वर्णलता भिशीकर | यामध्ये ऋग्वेदाचे श्रीअरविंद कृत भाषांतर आणि ऋग्वेदावरील त्यांनी केलेले लिखाण याचा समावेश होतो. 'आर्य' या मासिकामध्ये १९१४ - १९२० या दरम्यान हे लिखाण प्रकाशित झाले होते. |
१६ | Hymns to the Mystic Fire | गूढ अग्नीचे पूजन | यामध्ये ऋग्वेदातील अग्नि-सूक्ते आणि त्याचे
श्रीअरविंद कृत भाषांतर आणि ऋग्वेदावरील त्यांनी केलेले लिखाण याचा समावेश होतो. | |
१७ | Isha Upanishad | ईश-उपनिषद | ईश-उपनिषदाचे श्रीअरविंद कृत भाषांतर
आणि त्यावरील भाष्य याचा समावेश या ग्रंथामध्ये करण्यात आला आहे. लेखनकाळ - १९०० ते १९१४ (पूर्वतयारी.) १९१४ मध्ये अंतिम मसुदा लिहिण्यास सुरुवात. | |
१८ | Kena and other Upanishads | केन आणि अन्य उपनिषदे | प्रश्न, मांडुक्य, ऐतरीय आणि तैत्तरीय उपनिषदांवरील अपूर्ण भाष्य या खंडात समविष्ट करण्यात आली आहेत. | |
१९ | Essays on the Gita | गीतेवरील निबंध | सेनापती बापट | ऑगस्ट १९१६ ते जुलै १९१८ या कालावधीमध्ये गीतेवरील निबंध (इंग्रजी) आर्य या मासिकातून प्रकाशित झाले. त्याची सुधारित पुस्तक रूपातील आवृत्ती १९२२ साली प्रकाशित झाली. १९२८ साली या ग्रंथाची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. |
२० | The Renaissance in India and other essays on Indian Culture | भारतातील पुनरुत्थान | आंशिक अनुवाद - सेनापती बापट | यातील काही प्रकरणांचा अनुवाद भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ) यामध्ये झालेला आहे. |
२१-२२ | The Life Divine | दिव्य जीवन | सेनापती बापट | यामध्ये द्विखंडात्मक रचना आहे. पहिल्या खंडात एक तर दुसऱ्या खंडात दोन भाग आहेत. |
२३-२४ | The Synthesis of Yoga | योग-समन्वय | सेनापती बापट | प्रारंभिक भाग धरून एकूण पाच भागात या ग्रंथाचे लिखाण झाले आहे. आजवर प्रचलित असलेल्या सर्व योग-मार्गांचा समन्वय या ग्रंथात करण्यात आला आहे. |
२५ | The Human Cycle, The Ideal of Human Unity, War and Self-Determination | मानवी विकास चक्र | आंशिक अनुवाद -
सेनापती बापट |
मानवी विकास चक्र या नावाने केलेला अनुवाद अप्रकाशित स्वरुपात उपलब्ध आहे. |
२६ | The Future Poetry with on quantitative Metre | भविष्यकालीन काव्य | - | काव्याची समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र अशा स्वरूपाचे हे लिखाण आहे. प्रामुख्याने इंग्रजी काव्यावर आधारित आहे. |
२७ | Letters on Poetry and Art | काव्य आणि कला यांवरील पत्रे | - | इ.स. १९३० ते १९४० या दरम्यान आश्रमवासियांना लिहिलेली ही पत्रे आहेत. |
२८ | Letters on Yoga - I | योगमार्गाबाबतची पत्रे - भाग ०१ | - | पूर्णयोगाचे अधिष्ठान स्पष्ट करणारी ही पत्रे आहेत. |
२९ | Letters on Yoga - II | योगमार्गाबाबतची पत्रे - भाग ०२ | - | पूर्णयोगाचे आचरण कसे करावे हे स्पष्ट करणारी ही पत्रे आहेत. |
३० | Letters on Yoga - III | योगमार्गाबाबतची पत्रे - भाग ०३ | - | पूर्णयोगात येणारे अनुभव, होणारे साक्षात्कार यांचे स्वरूप स्पष्ट करणारी ही पत्रे आहेत. |
३१ | Letters on Yoga - IV | योगमार्गाबाबतची पत्रे - भाग ०४ | - | पूर्णयोगान्तर्गत अभिप्रेत असणारे मानवी प्रकृतीचे रूपांतरण कसे करावे हे स्पष्ट करणारी ही पत्रे आहेत. |
३२ | The Mother with the letters on The Mother | माता आणि त्या ग्रंथाबाबतची पत्रे | - | इ.स. १९२७ मध्ये श्रीअरविंद यांनी माता हा सहा प्रकरणे असणारा छोटेखानी पण आशयगर्भ ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ, त्यावरील पत्रव्यवहार आणि श्रीमाताजीकृत काही प्रार्थना यांचा समावेश या खंडात करण्यात आला आहे. |
३३-३४ | Savitri - the Legend and the Symbol | सावित्री (महाकाव्य) | ०१) सौ.शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधि
०२) कवी नृसिंहाग्रज |
श्रीअरविंद लिखित महाकाव्य |
३५ | Letters on Himself and The Ashram | स्वतःसंबंधी आणि आश्रमासंबंधी पत्रव्यवहार | - | श्रीअरविंद, त्यांचे जीवन, त्यातील तथ्ये, खुलासे, त्यांचे कार्य, त्यांची साधना आणि आश्रमवासीयांची साधना यासंबंधीची पत्रे येथे देण्यात आली आहेत. |
३६ | Autobiographical Notes and other writings of Historical Interest | आत्मचरित्रात्मक टिपणे | - | श्रीअरविंद यांच्या चरित्रकारांनी चरित्रात जो भाग लिहिला होता, त्याचे स्पष्टीकरण, त्याचे तथ्य यासंबंधीच्या नोंदी यामध्ये आहेत. त्यांनी राजकीय जीवनात असताना केलेली विधाने, जाहीर निवेदने इ.चा समावेश या खंडात आहे. |
श्रीअरविंद यांचे स्फुट लेखन
संपादनभवानी भारती - श्रीअरविंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेली ही एकमेव काव्यरचना. सन १९०४ ते १९०८ या दरम्यान तिचे लेखन झाले आहे. त्यामध्ये ९९ कडवी आहेत, उपजाती या वृत्तामध्ये भवानी भारतीचे लिखाण करण्यात आले आहे. भारतमातेचा म्हणजे शक्तिदेवतेचा अज्ञान आणि अंधकार यांच्यावर झालेला विजय हा या काव्यरचनेचा विषय आहे. रोमन, हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, गुजराती, ओडिया, इंग्रजी आणि कानडी भाषेमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. मराठी अनुवाद दत्तानंद नंदापुरे, यवतमाळ यांनी केला आहे.[१२]
सावित्री (महाकाव्य)
संपादनश्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री: एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. मराठीतील उपलब्ध प्रकाशित अनुवाद पुढीलप्रमाणे -
- सावित्री (एक आख्यायिका आणि एक प्रतीक) - मराठी अनुवाद - सौ.शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधि - (ISBN 81-7058-334-9) - हा काव्यानुवाद आहे.
- श्रीअरविंद सावित्री - कवी नृसिंहाग्रज - मूळ सावित्रीतील ओळींबरहुकूम केलेला हा अनुवाद आहे.
- संक्षिप्त सावित्री - लेखक श्री.माधव पंडित - अनुवाद - सुहास टिल्लू
- सावित्री - एक दर्शन, अभीप्सा मासिक, जानेवारी २०२२
- सावित्री महाकाव्याचा सारांश - अभीप्सा मासिक, जानेवारी २०२३.
श्रीअरविंद यांच्या साहित्याचा मराठी अनुवाद
संपादन- The Life Divine - दिव्य जीवन- ( खंड १, भाग १) अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-618-6)
- The Life Divine - दिव्य जीवन- (खंड २, भाग १) अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-630-5)
- The Life Divine - दिव्य जीवन- (खंड २, भाग २) अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-631-3)
- The Foundations of Indian Culture - भारतीय संस्कृतीचा पाया (१९७१) - अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-102-8)
- The Synthesis of Yoga - योग समन्वय - अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-379-9)
- Essays On The Gita - गीतेवरील निबंध (१९७२) - अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-359-4)
- The Ideal of Human Unity - मानवी एकतेचा आदर्श - अनुवादक - सेनापती बापट
- पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार - अनुवादक - सेनापती बापट
- पथ-प्रदीप - अनुवादक - सेनापती बापट (ISBN 81-7058-478-7)
- The Secret Of The Veda - वेद-रहस्य (भाग २-३-४) - अनुवादक - ना.स.पाठक, (ISBN 81-7058-178-8)
- योगाची मूलतत्त्वे - अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे (ISBN 81-7058-168-0)
- The Mother - माता - अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे
- The Mother - जगदंबा - अनुवादक भाई कोतवाल, इंदूर, प्रकाशक - रामचंद्र नारायण कुलकर्णी, प्रकाशन वर्ष - अंदाजे इ.स. १९३०
- सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, प्रज्ञा सुखटणकर, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.
संदर्भ
संपादन- ^ G.D. Gupta (1989) Glossary and Index of Proper Names in Sri Aurobindo’s Works, Sri Aurobindo Ashram Trust. p. xv. ISBN 978-8170581703
- ^ "THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO". www.sabda.in.
- ^ a b THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO: Volume 05, Publisher's Note
- ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO: Vol 05
- ^ Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande
- ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO: Vol 05
- ^ The Complete works of Sri Aurobindo. 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO: Vol 05
- ^ K.R.Shrinivas Iyengar (1945). Sri Aurobindo - A biography and a history. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-813-8.
- ^ Sri Aurobindo (2003). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. Volume 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ A survey of Savitri by K.R.Shrinivasa Iyengar
- ^ Ghosh, Sri Aurobindo (2017). Collected Works of Sri Aurobindo : Volume 09. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Trust.