केळवे

(शितलादेवी यात्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

केळवे किंवा केळवा हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव पालघरपासून १२ किमी दक्षिणेस आहे. येथील पुळण प्रसिद्ध असून तेथे पर्यटकांसाठीच्या सोयी आहेत.

  ?केळवे

महाराष्ट्र • भारत
Map

१९° ३६′ ५३.४९″ N, ७२° ४४′ ०९.९७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या १६,२८९ (२०११)
भाषा मराठी
सरपंच/उपसरपंच भावना किणी /सदानंद राऊत.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०1
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: goo.gl/maps/qzV5jFzuJMH2

तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि तारापूर औद्योगिक वसाहत तसेच रिलायन्सचे औष्णिक विद्युत केंद्र येथून ३० किमी अंतरावर आहेत.

इथे असलेल्या केळीच्या बागांमुळे ह्या गावाला केळवे नाव पडले आहे.

इतिहास

संपादन

महिकावतीउर्फ केळवा-माहीम गावाचा भाग असलेला हा गाव कालांतराने लोकसंख्या वाढल्याने वेगळा केला गेला व केळीच्या बागायती पिकांमुळे केळवा केळवे म्हणून ओळखला जाऊ लागला.

हे गाव शितलादेवी मंदिरासाठी फार प्रसिद्ध आहे आणि हे मंदिर पुरातन आहे. गावात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या सुरूच्या बागेत एक भुईकोट आहे. गेली अनेक वर्षे हा किल्ला वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला होता. हल्ली काही दुर्गमित्रांच्या सहकार्याने हा किल्ला वाळूचे ढिग उपसून बाहेर काढण्यात यश मिळालेले आहे.

भुगोल

संपादन

केळवे गावाच्या दक्षिणेस भादवे, दांडा,मधुकरनगर,भवानगड,चटाळे,एडवण, मथाणे, दातिवरे,उसरणी,आगरवाडी तर्फे माकुणसार, कोरे, गावे तर पूर्वेस माकुणसार, रामबाग गावे व केळवा रोड रेल्वे स्थानक आहे.

शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया हा स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[]

लोकजीवन

संपादन

येथील शेतकरी केळीच्या पिकाबरोबर पानवेलीचे पीकही भरपूर प्रमाणात घेतात. आले, हळद,कोनफळ, अनेक प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या ह्यांचे उत्पादन ही येथे रब्बी हंगामात घेतले जाते. केळवे भुमी कवींची व लेखकांची म्हणून ओळखली जाते.येथे मुख्यतः मराठी प्रमाणभाषेबरोबर वाडवळी, भंडारी, आगरी,मांगेली बोलीभाषा बोलल्या जातात.

शितलादेवी यात्रा

संपादन

भारतीय कालमानानुसार चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीपासून तीन दिवस शितलादेवी उत्सव येथे साजरा केला जातो.पालघर, ठाणे, मुंबई येथील असंख्य भाविक या उत्सवात सहभागी होतात.यात्रेत खेळण्यांची दुकाने, पाळणे, विविध खाद्यपदार्थ व मिठाईची दुकाने थाटली जातात.केळवे ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता, भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळ, दिवाबत्ती सुविधा,आपत्कालीन सुरक्षा, समुद्रकिनारी जीवरक्षक, वाहतूक व्यवस्था इत्यादी पुरवली जाते.[]

लोकसंस्कृती

संपादन

दरवर्षी येथे केळवे किनारा पर्यटन उत्सव साजरा केला जातो. लोकपरंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती सहजपणे जपल्या जातात आणि त्यांचा पुढील पिढीत प्रचार व प्रसार होतो. समुद्राला लागूनच असलेल्या भव्य पटांगणात महोत्सवाचे आयोजन केले जाते.विविध प्रकारची दुकाने, पर्यटनसंबंधी व सर्व सामान्यांना लागणारी चीजवस्तू,तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ मंडपात सजवले जातात.स्थानिक खाद्यपदार्थ पोतेंडी, उकडहंडी, ओतवलीरोटी, अळुवडी, पातवडी, मुठे,दुधलाडू, रवळीचीरोटी,खीररोटी,तसेच आगरी-वाडवळी मटण, रस्सा, कोंबडीवडे,ताज्या माश्यांचे विविध प्रकार,गावठी कोंबडी, आणि मुस्लिम, भंडारी, मच्छीमार, आदिवासी समाजातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात खवैयासाठी उपलब्ध असतात.विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन परिसंवाद,लोकनृत्य, लोकगीते,पारंपरिक लग्नगीते असा विविधरंगी कार्यक्रमाने महोत्सव उत्साहपूर्ण आणि जोशात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी केळवे-माहीम किल्ले विजय दिनसुद्धा साजरा केला जातो.दरवर्षी येथे शितलादेवी यात्रा भरते.[]

नागरी सुविधा

संपादन

इथे ग्रामपंचायत द्वारे सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा,सार्वजनिक प्रकाशव्यवस्था केली जाते. केळवे बाजार ते केळवे रोड रेल्वे स्थानक तसेच पालघर रेल्वे स्थानक जाण्यासाठी नियमित बससेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत.येथे बँकेतील पैसे काढण्यासाठी स्वयंचलित टेलर मशीनची सोय आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

भवानगड किल्ला

दांडा किल्ला/जंजिरा

संदर्भ

संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

३. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

५. http://tourism.gov.in/

६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

७. https://palghar.gov.in/ ८. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३
  2. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार ३० मार्च २०२३
  3. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३.