शबरीचा जन्म शरद पौर्णिमेला झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या आदिवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर आध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना रस्ता दाखवणारी शबरी आठवते.

राम लक्ष्मण शबरीच्या झोपडीत येतात आणि शबरी त्यांना उष्टी बोरे खायला देते

ती शबर राजाची कन्या होती. राजाची कन्या म्हणून लाडा कोडात वाढली. तिला सर्व संपन्नता लाभली. राजकन्या म्हणून शिक्षणही झाले. या शिक्षणामुळे तिला तिचे ध्येय आध्यात्मिक मार्गावर नेण्यासाठी, दृढ राखण्यासाठी उपयुक्त झाले.

आदिवासी भिल्ल समाज वनात राहणारा, निसर्गप्रेमी आणि निसर्गाची काळजी वाहणारा म्हणून ओळखला जातो. पुढील आयुष्यात शबरी वनात राहिली. गुरू मातंगांच्या आश्रयाला गेली. तिच्याही हातून वनवासी भागाचाच उद्धार झाला. आजही भिल्ल समाज रामाबरोबर तिचे नाम घेत निसर्गप्रेम अनुभवत आहे. निसर्गाची काळजी घेत आहे.

राजकन्या म्हणून जन्माला आली. मोठी झाली तरी गुरुपदेश घ्यावा, शिष्यत्व पत्करावे ही समर्पण वृत्ती तिच्यात दिसते. गुरू करणे, शिष्यत्व घेणे याचा अर्थ आपले स्वतःचे सर्व विसरून जाणे. कष्टमय जीवन जगायचे. जग रहाटीपासून दूर वनात रहायचे. गुरू घरी रहायचे. अशा पद्धतीत राजकन्या शबरीने ऋषी मातंगांना गुरू बनविले आणि त्यांच्या उपदेशानुसार रामाची वाट पाहत ती वनवासात राहिली.

रामायणात शबरी कथा काय आहे ? वाट पहात असलेल्या शबरीला भेटण्यासाठी राम लक्ष्मण शबरीच्या झोपडीत येतात आणि पाय धुऊन, रानफुले देऊन शबरी त्यांना उष्टी बोरे खायला देते. तिचे प्रेम राम सहज स्वीकारतात. उष्टी बोरे दिल्ल्याचा व रामाने ती खाल्याचा लक्ष्मणाला राग येतो. राम त्याची समजूत काढून त्यालाही उष्टी बोरे खायला सांगतात. त्यानंतर शबरी योग सामर्थ्याने नश्वर देहाचा त्याग करून आत्म्याला परमात्म्यात विलीन करते, ही कथा आहे.

उष्टी बोरे यावर आपले संत मुरारी बापू यांनी मार्मिकपणे खूप ऊहापोह केला आहे. वर्षानुवर्षे शबरी वनात रहात होती. तिथेच फिरत होती. त्यामुळे वनातील झाड आणि झाड तिच्या परिचयाचे आहे. ती स्वतः फळे आणि कंदमुळे खाते व पाणी पिऊन राहते म्हणजे निसर्ग आहारच झाला. वर्षानुवर्षे बोरे खात असल्ल्याने त्यातील चांगली कोणती ? त्याचे बी काढून वेगळे ठेवणे, पावसाळयापूर्वी त्याचीच लागवड करणे, त्याला खतपाणी घालून त्याची देखभाल करणे हे सर्व शबरीने केले आहे. अशा तऱ्हेने जास्तीत जास्त मधुर व मोठी बोरे निर्माण करण्याचे कार्य ही तिने केले आहे. अशी बोरे तिने श्री रामांना दिली. आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्ट्या बोरातून जातो. आणि म्हणूनच अनेकांना उष्टी बोरे देणारी शबरी भावते.

शबरी राम भेटीमध्ये जो संवाद झाला त्याराम लक्ष्मण यांचे सीता शोधार्थ वनातून हिंडणे शबरी ऐकते. लंकापति रावणाने, राक्षसाने सीतेला पळवून नेले आहे व श्रीराम दक्षिण दिशेला जाणार आहेत. हे सर्व जाणून घेतल्यावर शबरी श्रीरामांना दक्षिण दिशेला असलेल्या हनुमान, वाली, सुग्रीव इ.ची मदत घेण्याच सुचविते. त्यांच्या सैन्याचे साहाय्य घेण्याची सूचनाही करते. त्यामुळे सीता शोध सुकर होईलच त्याचबरोबर रामाकडून असुर, राक्षसी, अधर्मी शक्तीचा नाश होईल हा विश्वास ती रामाला देते. हा दिशासंकेत श्रीरामांना शबरीकडुन मिळतो आणि त्या संकेताचे पालन श्रीराम करतात. त्यातूनच पुढे रावणाचा म्हणजे असुर शक्तीचा नाश होतो व रामराज्य निर्माण होते.

दिशा संकेत करणारी शबरी ही आजच्या काळातही आपली सर्वांची आदर्श व्हावी असे वाटते आणि म्हणूनच शबरी कुंभाचे आयोजन करीत आहोत.

कुंभ म्हणजे काय ? श्री क्षेत्राच्या ठिकाणी होणार कुंभ आपल्ल्याला माहीत आहे. काही जण कुंभाला जाऊन ही आले असतील. भक्तिभाव व पुण्यसंचय करण्यासाठी कुंभाला जाऊन येणे येवढा सीमित अर्थ आपण जाणतो.

जेव्हा जेव्हा सामाजिक नियमांमध्ये परिवर्तनाची आवश्यकता वाटली त्यावेळी कुंभाचे आयोजन समाजधुरीण, साधु संत आदिंनी मिळून केले. अशा कुंभाला नियमीतपणा असावा म्हणून दर 12 वर्षांनी, दर ६ वर्षांनी कुंभाचे आयोजन. या कुंभामध्ये समाजातील सर्व स्तरातले सर्व भागातले लोक तसेच सर्वत्र संचार करणार साधुसंत उपस्थित असतात. कुंभाची पर्वणी साधणे हा भाग आहेच तसेच धर्मचर्चा होणे त्यात काही निर्णय होणे, झालेला निर्णय सर्व समाजापर्यंत पोचणे हे सुलभ होते.

शबरी कुंभ का? शबरीला सर्वमान्यता आहे. पंपा सरोवर, राम लक्ष्मण भेट, उष्टी बोरे व सीता शोधार्थ दिशा संकेत हे सर्व विषय सर्व ठिकाणी उल्लेखिले जातात. भारतातील विभिन्न प्रदेशात शबरी आमची होती असे सर्वजण म्हणतात. याचा अर्थ शबरी सर्वांना पूजनीय आहे. शिवाय असुरी शक्तिंविरूद्धचा लढा रामाने लढावा व त्याचा नायनाट करावा अशी शबरीची इच्छा आहे. म्हणूनच ती दिशासंकेतही करते. असुरी अधर्मी शक्तिविरूद्ध लढण्याचा तिचा दिशासंकेत आजही लागू होणारा आहे.


शरद पौर्णिमेची शबरी मातेची जन्मतिथी साजरी करतांना लोक काय ठरवतात ? शबरी मातेच्या दर्शनाला, या कुंभामध्ये आपण अवश्य जाईन. अनेकांना बरोबर घेऊन जाईन. तसेच धर्माविरूद्ध वागणाऱ्या, धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांच्या कारवायांना आपण प्रतिबंध करेन व आपल्या धर्मात परत येणाऱ्या लोकांना आपलेसे करून सामावून घेईल, अशी प्रतिज्ञाच आज लोक घेतात. दुर्गामातेला ही आम्ही जागृत आहोत हा प्रतिसाद यातूनच दिला जातो.