शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकर (२७ जानेवारी, इ.स. १८९६) हे एक मराठी नाटकांतून प्रामुख्याने स्त्रीभूमिका भूमिका करणारे गायक नट होते. चाफेकर हे मूळचे पुण्याचे होते. रस्त्यावरून दारोदार भटकत भीक मागत फिरणाऱ्या जंगमाचे गाणे ऐकून त्यांना लहानपणापासूनच गाणे शिकायची व म्हणायची इच्छा झाली. त्यांच्या गाणे ऐकण्याच्या सवयीला घरातून प्रोत्साहनच मिळाले.लहान वयात पाहिलेल्या ’हरिश्चंद्र’, शाकुंतल’ ’कीचकवध’ सारख्या नाटकांचा त्यांच्यावर परिणाम झाल.

शं.नी. चाफेकरांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक केले. शाळेत असताना स्नेहसंमेलनांमध्ये होणाऱ्या नाटकांत काम करण्याच्या आलेल्या संधी त्यांनी नाकारल्या. आपल्याला एकदम व्यावसायिक नाटकामध्येच काम करावयाचे आहे, आणि तेही बी.ए. झाल्यानंतर, असे ते म्हणत. पुढील आयुष्यात त्यांनी नाटकांत कामे केली, पण ते शेवटपर्यंत बी.ए होऊ शकले नाहीत. स्त्रीभूमिका करणारे हे शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकर, हे कवी आणि समीक्षक श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर यांचे वडील बंधू होत

संगीत शिक्षण आणि नाट्यसंस्थांमध्ये प्रवेश संपादन

नाटकांतील भूमिकांसाठी आवश्यक म्हणून शंकररावांनी स्वतःच्या स्वतःच पेटी शिकायला सुरुवात केली. पेटीबरोबर ते नाट्यसंगीतही गाऊ लागले. व्यावसायिक नट होण्यासाठी ते पुण्यातील अनंत हरी गद्रे यांच्या हिंदू नाटक मंडळीत नोकरी करू लागले. २८ ऑक्टोबर १९२८ रोजी शं.नी. चाफेकरांनी किर्लोस्कर रंगामंदिरात झालेल्या ’स्वराज्य सुंदरी’ या नाटकात आयुष्यातली पहिली भूमिका केली. नंतर गद्ऱ्यांच्याच ’वीरकुमारी’ आणि ’माझा देश’ या नाटकांतल्या नायिकेच्या भूमिका त्यांना मिळाल्या. शंकररावांनी १९१८ सालापासून ते १९५३ सालापर्यंत अनेकानेक नाटकांतोन स्त्री आणि पुरुष भूमिका केल्या. पुढे त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले.

१९ एप्रिल १९२१ रोजी शंकरराव केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या नाट्यसंस्थेत दाखल झाले आणि मामा वरेरकर आणि इतर अनेक नाटककारांच्या नाटकांत स्त्रीभूमिका केल्या.

इ.स. १९२मध्ये शं.नी. चाफेकरांनी स्वतःची नाटक कंपनी काढली आणि जुन्याच नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नाटके रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली. या कंपनीचे अप्पासाहेब टिपणिसांनी लिहिलेले ’राजरंजन’ हे नाटक खूप चालले. ही नाटक कंपनी मात्र थोड्या काळातच बंद पडली.

चित्रपटात भूमिका आणि वृत्तनिवेदन संपादन

आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकरराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.

चाफेकर हे दिल्ली आणि पुणे येथील आकाशवाणी केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..

मानापमान आणि सौभद्र संयुक्त प्रयोग संपादन

मराठी संगीत रंगभूमीच्या उतरत्या काळात रंगमंचावर झालेले ’मानापमान’ आणि ’सौभद्र’ या नाटकांचे संयुक्त प्रयोग हे त्या काळचे आश्चर्य होते. बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोनही नटश्रेष्ठांनी या नाटकांत कामे केली होती. संयुक्त ’मानापमान’मध्ये अक्काची महत्त्वाची भूमिका करण्याचे भाग्य शंकराव चाफेकरांना मिळाले होते. संयुक्त ’सौभद्र’मध्येही त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती.

श.नी. चाफेकर यांनी कामे केलेल्या नाटकांची नावे आणि त्यांतील त्यांच्या भूमिका संपादन

 • तुरुंगाच्या दारात (नायिका)
 • माझा देश (नायिका)
 • मानापमान (भामिनी)
 • मूकनायक (सरोजिनी)
 • मृच्छकटिक (वसंतसेना)
 • विद्याहरण (देवयानी)
 • वीरकुमारी (नायिका)
 • शहाशिवाजी (सईबाई)
 • शाकुंतल (शकुंतला)
 • सत्तेचे गुलाम (नायिका)
 • संन्याशाचा संसार (नायिका)
 • सोन्याचा कळस (नायिका)
 • स्वयंसेवक (नायिका)
 • स्वराज्य सुंदरी (नायिका)
 • हाच मुलाचा बाप (मंजिरी)

पुरस्कार आणि सन्मान संपादन

 • शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते तात्यासाहेब केळकरांनी. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
 • ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून लोकमान्य टिळकांनीही चाफेकरांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
 • शं.नी. चाफेकरांच्या ’स्मृतिधन’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट ग्रंथलेखनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रकाशित केले होते.
 • १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान शंकरराव नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकरांना मिळाला.