अनंत हरि गद्रे

वार्ताहर, लेखक, नाटककार, थोर समाजसुधारक, नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक
(अनंत हरी गद्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे (जन्म देवरूख, : १६ ऑक्टोबर, इ.स. १८९०;[] - ३ सप्टेंबर, इ.स. १९६७[]) हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते.

पूर्वायुष्य

संपादन

देवरूख या कोकणातल्या गावातून अनंत हरि गद्रे शिक्षणासाठी पुण्यात आले. येथे त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय अशा नामवंत ठिकाणी झाले. राम गणेश गडकरीश्री.म. माटे हे त्यांचे सहाध्यायी. पुढे अध्यात्माच्या ओढीने त्यांनी हिमालयाची भटकंतीही केली. विवेकानंदांसारखे सिद्ध पुरुष त्यांना तेव्हा आदर्शस्थानी होते. कीर्तनकलेच्याच माध्यमातून अशा पुरुषांची आख्याने लावून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयोगही त्यांनी करून पाहिला.

आद्य नाटिका लेखक

संपादन

अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही असे. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आले आणि लोक नाटके पहायच्या ऐवजी सिनेमे पाहू लागले. तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ’वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्‍न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणाऱ्या नाटकांपेक्षा गद्ऱ्यांनी एकदीड ते तीन तासात संपणाऱ्या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्यास लागणाऱ्या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला. त्यांच्या नाटिकांचे प्रयोग ’नूतन संगीत मंडळी’ आणि गद्रे यांनी स्थापित केलेली ’मुंबई नाटिका संगीत मंडळी’ या अन्य नाट्यसंस्थाही करीत असत.

अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्ऱ्यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.

जहिरातकौशल्य

संपादन

समतानंद गद्ऱ्यांकडे जाहिरात करण्याचे अनोखे कौशल्य होते. मराठी नाट्यसृष्टी संकटात असताना याच कौशल्याचा वापर करून त्यांनी नाटिका लिहिल्या. नाटकाच्या जाहिरातींत वेगळेपणा आणला. त्यांना ‘जाहिरात जनार्दन’ म्हणत. त्यांची जाहिरातक्षेत्रासाठी लागणारी ग्राहकमानसशास्त्रावरील पकड, शब्दांवरची हुकमत, संवादपटुत्व अशी व्यावसायिक कौशल्ये त्याकाळा अभूतपूर्व होती. त्यांच्या या गुणांचा उपयोग मराठी आणि हिंदी नाटक-चित्रपट निर्मात्यांनी पुरेपूर करून घेतला; पण स्वतः गद्रे त्यापासून म्हणजे त्यातून येणाऱ्या लाभापासून अलिप्तच राहिले.

पत्रकारिता

संपादन

गद्रे यांच्या कार्याला दिशा मिळाली, ती लोकमान्य टिळक मंडालेचा कारावास संपून १९१४ मध्ये पुण्यात परतले तेव्हापासून. टिळकांच्या राजकारणात त्यांना आपण मदत करावी असे त्यांना वाटू लागले. दरम्यान, चरितार्थासाठी त्यांनी सुगंधी द्रव्याचे एक दुकानही काढले होते. पत्रकारिता हे टिळकांचे राजकारण चालवण्याचे साधन होऊ शकते याचा साक्षात्कार त्यांना अच्युतराव बळवंतराव कोल्हटकर यांच्यामुळं झाला. अच्युतराव खंदे टिळकभक्त व हाडाचे पत्रकार. त्यांचे ‘संदेश’ हे पत्र तेव्हा चांगलेच गाजत असे. गद्रे यांनी अच्युतरावांना गुरुस्थानी मानलं व ‘संदेश’मधूनच पत्रकारितेचे धडे गिरवले. होमरूलच्या प्रचारासाठी म्हणजेच स्वराज्याच्या मोहिमेसाठी टिळकांनी देशव्यापी दौरा केला. त्यात ‘संदेश’चा विशेष बातमीदार म्हणून गद्रे यांनी टिळकांची ‘कलकत्ता ते कोलंबो’ अशी साथ करून त्यांच्या भाषणांची खास वार्तापत्रं ‘संदेश’मधून प्रसिद्ध केली. वार्तांकन करण्याची स्वतःची शैली त्यांनी विकसित केली, ती त्या काळात चांगलीच लोकप्रिय झाली. भाषणाची बातमी म्हणजे भाषण जसेच्या तसे छापणे अशी मर्यादित कल्पना त्यांची कधीच नव्हती. भाषण करताना टिळक कसे दिसत, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलत जात, आवाजात कसा चढउतार होई आदी गोष्टींचे हुबेहूब वर्णन करून ते वाचकांना जणू सभेच्या ठिकाणी नेत असत. हे त्यांचे वार्तांकन लोकांना खूप आवडे..[].

इ.स. १९२२ साली सुरू झालेल्या मौज ह्या साप्ताहिकातील त्यांची संपादकीयेही लोकप्रिय झाली. इ.स. १९३४ साली सुरू केलेल्या 'निर्भीड' ह्या आपल्या दुसऱ्या साप्ताहिकातून गद्‌ऱ्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली.[].

अनंत हरि गद्रे यांच्या ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही दोन नियतकालिकांमध्ये राजकारणापेक्षा साहित्य, कला आणि संस्कृती यावर भर देण्यात येई.. विशेषतः ‘निर्भीड’च्या बाबतीत तर हिंदुत्ववादी गद्रे आणि काँग्रेस विचारसरणीचे नाना अभ्यंकर या पत्रात राजकीय मजकूर छापायचा नाही या अटीवर एकत्र आले होते. शेवटी ही भागीदारी फुटली हा भाग वेगळा. आपल्या पत्रांतून नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, परीक्षणे प्रसिद्ध करताना त्यांनी ‘अफाट,’ ‘बेफाट,’ ‘दणदणीत,’ ‘घणघणीत,’ ‘तडाखेबंद,’ ‘हाऊसफुल्ल’ हे शब्द दाखल करून पत्रकारिता समृद्ध केली.

प्रचारासाठी नाट्यलेखन

संपादन

टिळकांच्या स्वराज्य मोहिमेचा प्रचार करण्यासाठी गद्ऱ्यांनी ‘स्वराज्यसुंदरी’ नावाचे नाटक लिहिले. स्वराज्याची मागणी करण्यासाठी टिळक इंग्लंडला गेले होते. तेव्हा स्वराज्य ही कोणी सुंदरी असून तिच्या स्वयंवरासाठी टिळक इंग्लंडला जातात अशी कल्पना करून गद्रे यांनी हे नाटक लिहिले. हिंदवीर हा नाटकाचा नायक. त्यांनी या नाटकाला रेव्हरंड ना.बा. टिळक यांची प्रस्तावना घेतली होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकात दादाभाई नौरोजी यांच्या भुताचे पात्र आणून गद्रे यांनी धमाल केली होती. दादाभाई हिंदवीर याला तलवार देतात असा एक प्रसंग नाटकात आहे. मात्र या तलवारीचे नाव सनदशीर तलवार असे असून, तिची मूठ नीती आणि तिची धार सत्यपालन असल्याचे सांगत गद्रे यांनी येऊ घातलेल्या गांधीयुगाची झलकच दाखवली होती.

झुणकाभाकर चळवळ

संपादन

दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी 'झुणका-भाकर चळवळी'सारखे प्रयोग गद्‌ऱ्यांनी केले. 'झुणका-भाकर' चळवळीमध्ये समाज्याच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत [].

समतेसाठी सत्यनारायण

संपादन

अस्पृश्‍यतेची रूढी स्पृश्‍य सवर्णांनीच पाडली. त्यामुळं प्रायश्‍चित्त घेऊन ती दूर करायची जबाबदारीही त्यांचीच आहे असं समजून गद्रे यांनी स्वतःला या कामासाठी जणू वाहूनच घेतले. झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्‍यास्पृश्‍य सत्यनारायण ही दोन तंत्रे त्यांनी त्यासाठी वापरली. हे दोन्ही उपक्रम एकत्रच आले. १९४१ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात पंडित पानसेशास्त्री यांनी पोथी सांगितली. विशेष म्हणजे प्रसिद्ध समाजसुधारक र.धों. कर्वे त्यावेळी उपस्थित होते. या कामात त्यांना आचार्य अत्रे, स्वातंत्रवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा मान्यवरांचा पाठिंबा व सहकार्य होते. सामाजिक क्षेत्रांत सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलांचा पुरस्कार समतानंदांनी केला. ते जिथे नोकरी करीत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण तेवढे पुरेसे नसे. तेव्हा गद्रे यांना पदरमोड करावी लागे. पदरात काही नसल्यामुळे त्यांना त्यासाठी कर्ज काढावे लागे,

एरवी सत्यनारायणाच्या पूजेसाठी सिद्ध करण्यात येणाऱ्या तूपसाखरेच्या शिऱ्याचा प्रसाद (सव्वाच्या प्रमाणात) गोरगरिबांना परवडणार नाही याची कल्पना असलेल्या गद्रे यांनी झुणका-भाकरीचा प्रसाद हरिजनांच्या हातून वाटायची प्रथा पाडली. सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून जोडपे बसविले जाते. गद्ऱ्यांच्या सत्यनारायणात अस्पृश्‍य समाजातल्या पती-पत्‍नींना यजमानपदी प्रतिष्ठित केले जाई. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जोडप्याला लक्ष्मीनारायण मानून त्यांच्या पायांचे तीर्थ गद्रे प्राशन करीत. हे करताना ते
‘समाजमृत्युहरणं जातिद्वेषनिवारणं।
हरिजनपादोदकर्तीर्थम्‌ जठरे धारयाम्यहम्‌’
असा संकल्प करीत..
‘ब्राह्मणादिकांची सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अशी सर्वांगीण प्रतिष्ठा भंग्याला प्राप्त करून देणे’ अशी अस्पृश्‍यतानिवारणाची व्याख्या समतानंद करीत. ‘‘ही समस्या माझ्यासारख्या अनेक सद्‌भावनाशील समाजसेवकांचा बळी घेईल,’’ असा ‘जाहीर अंदाज’ ही त्यांनी व्यक्त केला होता. ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ, पवित्र व शुद्ध मानून त्याच्या पायाचे तीर्थ घेण्याचा धार्मिक विधी तेव्हा प्रचलित होता. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम बुद्धिवादी दृष्टीच्या ब्राह्मणेतर चळवळीने केले होते. पण या रूढीचा व्यत्यास करून उच्चवर्णीयाने अस्पृश्‍याचे पादोदकतीर्थ प्राशन केले तरच ती खरी समता ठरेल असे सांगून ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे एकच व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘समतानंद अनंत हरी गद्रे.’

अनंत हरि गद्रे यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अच्युतराव कोल्हटकर (चरित्र)
  • आई (नाटिका)
  • कर्दनकाळ (नाटक)
  • कुमारी (नाटिका)
  • घटस्फोट (नाटिका)
  • तरुण पिढी (नाटिक)
  • नाटिकानवरत्‍नहार (संपादित)
  • मूर्तिमंत सैतान (नाटक, १९२९)
  • पाहुणा (नाटक)
  • पुणेरी जोडा (नाटिका)
  • पूर्ण स्वातंत्र्य (नाटिका)
  • प्रीतिविवाह (नाटिका)
  • प्रेमदेवता (नाटिका)
  • मुलींचे कॉलेज (नाटिका)
  • स्वराज्यसुंदरी (नाटक, १९१९)

अनंत हरि गद्रे यांच्यावरील पुस्तके

संपादन
  • समतानंद- अनंत हरी गद्रे (भानू काळे)

सन्मान

संपादन
  • झुणकाभाकरफेम अनंत हरी गद्रे यांनी केलेल्या नाट्यसेवेसाठी त्यांना मुंबई येथे इ.स. १९३० साली भरलेल्या २५व्या मराठी नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला.
  • अनंत हरी गद्रे यांना शंकराचार्यांनी समतानंद ही उपाधी बहाल केली. याच उपाधीमुळे ते आजही ओळखले जातात..

पुरस्कार

संपादन

गद्रे यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'समतानंद अनंत हरी गद्रे' नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांना मिळाला होत, तर २०१६ साली ‘प्रहार’च्या संजीव भागवत यांना.

यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले पत्रकार :

  • माधव गडकरी (१९९१)
  • रंगा वैद्य (१९९२)
  • यदुनाथ थत्ते (१९९३)
  • नारायण आठवले (१९९४)
  • मधु नाशिककर (१९९५)
  • कृ.पां. सामक (१९९६)
  • माया चिटणीस (१९९७)
  • रामभाऊ जोशी (१९९८)
  • भा.म. निंबकर (१९९९)
  • भालचंद्र आकलेकर (२०००)
  • दिनू रणदिवे (२००१)
  • पंढरीनाथ सावंत (२००२)
  • स पां. जोशी (२००३)
  • संभा चव्हाण(२००४)
  • दत्ताराम बारस्कर (२००५)
  • वसंत लक्ष्मण गडकर (२००६)
  • मधू रावकर (२००७)
  • लक्ष्मण केळकर (२००८)
  • सुभाष हरड (२००९)
  • सतीश कामत (२०१०)
  • आत्माराम नाटेकर (२०११)
  • मोहन केळुस्कर (२०१२)

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "दिनविशेष: अनंत हरी गद्रे जन्मदिन". ११ जुलै इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  2. ^ "दिनविशेष: अनंत हरी गद्रे स्मृतिदिन". ११ जुलै इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  3. ^ द हिस्टरी अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल, व्हॉल्यूम ११ (भारतीय लोकांचा सांस्कृतिक इतिहास, खंड ११) | लेखक = आर.सी. मजुमदार | भाषा = इंग्लिश }}
  4. ^ a b गोखले,शांता. प्लेराइट अ‍ॅट द सेंटर: मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेझेंट (नाटककार केंद्रस्थानी : इ.स. १८४३पासून आजपर्यंत मराठी नाटकाची वाटचाल) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)