शंकरराव मुजुमदार

(शंकर बापूजी मुजुमदार या पानावरून पुनर्निर्देशित)

शंकरराव तथा शंकर बापूजी मुजुमदार (इ.स. १८६२ - २८ नोव्हेंबर, इ.स. १९३८) हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे व्यवस्थापक, अभिनेते, मुद्रणतज्ज्ञ, संपादक आणि चरित्रलेखक होते.

शंकरराव पुण्यात राहत असल्याने तेथे होणाऱ्या प्रत्येक नाटकाला शंकरराव हजर असत.

नाटक कंपनीचे व्यवस्थापन

संपादन

१३ फेब्रुवारी १९०१ रोजी झालेल्या भाऊराव कोल्हटकरांच्या निधनानंतर किर्लोस्कर नाटक कंपनीची जबाबदारी अभिनेते नानासाहेब जोगळेकर व व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांनी सांभाळली. दुर्दैवाने १७ नोव्हेंबर १९११ रोजी नानासाहेब अचानक निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीच्या मालकीचा वाद निर्माण झाला. कंपनीचे जुने जाणते व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांना कंपनीची मालकी हवी होती. पण त्यांचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला. शेवटी गोविंदराव टेंबे यांची सूचना मान्य होऊन १९११ च्या डिसेंबर महिन्यात कंपनीची मालकी बालगंधर्व, गणपतराव बोडस आणि शंकरराव मुजुमदार या तिघांकडे आली.

शंकरराव मुजुमदार यांनी ’शाकुंतल’ आणि ’सौभद्र’ या नाटकांत भूमिका केल्या होत्या. नटांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी नटांना छपाईविषयक कामे शिकवली होती. शंकररावांनी ’रंगभूमि’ नावाचे मासिक सुरू केले होते. शेक्सपियरची अनुवादित-रूपांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी ’भारत नाट्य समाजा’ची स्थापना केली.

शं.बा. मुजुमदारांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अण्णासाहेब किर्लोस्कर (यांचे चरित्र, १९०४)
  • महाराष्ट्रीय नाटककार यांची चरित्रे
  • लक्ष्मण बापुजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र (१९०१)

सन्मान

संपादन

नाटकमंडळ्यांच्या सहवासात हयात घालवून अभिनेत्यांची चरित्रे लिहिणाऱ्या शंकरराव बापूजी मुजुमदारांना, पुण्यात १९१६ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला.