विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर (जन्म : कशेळी, १८ मे, इ.स. १८८५ - कशेळी, १९ सप्टेंबर, इ.स. १९६२) हे मराठी लघुकथा लेखक होते. यांनी लघुकथा लेखनात एक स्वतंत्र कालखंड सुरू केल्याचे समजले जाते.[१]

वि.सी. गुर्जर
जन्म नाव विठ्ठल सीताराम गुर्जर
जन्म १८ मे, १८८५ [१]
कशोळी, रत्नागिरी
मृत्यू १९ सप्टेंबर, १९६२ (वय ७७)[१]
कशोळी, रत्नागिरी
शिक्षण बी.ए. अपूर्ण
धर्म हिंदू
भाषा मराठी
साहित्य प्रकार लघु कथा, कादंबरी
प्रभाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
वडील सीताराम गुर्जर

शिक्षण

संपादन

मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर गुर्जर एल्फिन्स्टन कॉलेजात दाखल झाले, मात्र आजारपणामुळे ते बी.ए.पूर्ण करू शकले नाहीत. मात्र त्यांचे ’द्राक्षांचे घोस’ हा कथासंग्रह एम.ए.च्या अभ्यासक्रमात नेमला होता.

लघुकथांचे वैशिष्ट्य

संपादन

इ.स. १९१०पर्यंत नियतकालिकांमध्ये होणाऱ्या कथांवरती बहुधा लेखकाचे नाव नसे, असलेच तर त्याचे टोपण नाव असे. १९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने वि.सी. गुर्जर यांच्याकडे जाते. गुर्जरांची कथा ही संपूर्ण गोष्ट म्हणून ओळखली जाते. याचे कारण ह्या कथा मुख्यतः दीर्घकथाच होत्या. गुर्जरांनी कथालेखनाला १९१० च्या आसपास सुरुवात केली. १९६२ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे कथालेखन अव्याहत चालू होते. त्यांनी सुमारे ८००हून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या कथालेखनाचा काळ जरी १९६२ पर्यंत असला, तरी १९२० पर्यंतचे त्यांचे क्षेत्रातील कार्य महत्त्वाचे आहे. मनोरंजन मासिकातून प्रकाशित होणारी गुर्जरांची कथा हे त्या वेळी वाचकांचे प्रमुख आकर्षण होते. गुर्जरांनी वयाच्या ५१व्या वर्षापर्यंत एकूण ३०,००० छापील पृष्ठे भरतील इतके लिखाण केले.

गुर्जरांनी मराठी कथेची दृष्टी बदलली. मराठी कथा तोपर्यंत बोधप्रधान होती, ती त्यांनी रंजनप्रधान केली, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. त्यामुळे त्यांच्या कथांतून आपोआप रहस्याला व घटनांना प्राधान्य मिळू लागले. कथानकांमध्ये वाचकांची उत्कंठा वाढविण्यासाठी कोणतेना कोणते तरी रहस्य निर्माण करायचे. त्यातील गुंतागुंत वाढवून वाचकांचे कुतूहल शेवटपर्यंत जागृत ठेवावयाचे व शेवटी कथानकाला अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकांना विस्मयाचा धक्का द्यावयाचा, या तंत्राचा गुर्जरांनी आपल्या गोष्टींतून अवलंब केला होता. त्याच्या जोडीला त्यांनी कथांतून चुरचु्रीत संवाद आणले; नर्म विनोद आणला; खेळकर भाषाशेलीही आणली. त्यामुळे त्यांच्या कथांना तत्कालीन वाचकवर्गांच्या मनाची चांगलीच पकड घेतली.

गुर्जरांचा कालखंड

संपादन

मध्यमवर्गीय नवविवाहित पतिपत्‍नींच्या संसारातील गोड वादळे हा त्यांच्या बऱ्याच कथांचा विषय होता. गुर्जरांनी रंगविलेली प्रणयाची सृष्टी मोहक होती. त्यातील रंग भडक नव्हते; पण त्याबरोबरच ती जीवनात खोलवर गेलीही नव्हती. संसारात होणाऱ्या. गैरसमजांचे व चहाच्या पेल्यातून निर्माण झालेल्या वादळांचे गोड पर्यावसान करण्याच्या भरात त्यांना अनेकदा योगायोगाचा आश्रय घ्यावा लागे. त्यामुळे त्यांची कथा मधुर स्वप्नरंजनात्मक वाटते. प्रणयाखेरीज इतरही विविध प्रकारच्या घटना त्यांच्या कथांतून येतात; पण कथेचे रचनातंत्र ठरलेले असल्याने त्या ठराविक वळणानेच जातात. ‘पुरुषांची जात’, ‘बायकांची जात’, ‘लाजाळूचे झाड’ , ‘इलम-इ-हिंद’ इ. अनेक कथांतून गुर्जरांचे हे गुणदोष स्पष्ट दिसतात. त्यांच्या कथांचे हे रचनातंत्र त्यांनी आपले आवडते बंगाली लेखक प्रभातकुमार मुखर्जी यांच्या कथांवरून उचलेले आहे. त्यांनी प्रभातकुमार मुखर्जीच्या पुष्कळशा कथांचा मराठीत अनुवाद पण केला आहे. त्यांच्या कथांची या रचनातंत्रामुळे जशी लोकप्रियता वाढली, तसेच त्यांच्या कथांना त्यामुळे मर्यादाही पडल्या. त्यांच्या संपूर्ण गोष्टींमधील जीवनदर्शन त्यामुळे उथळ झाले. योगायोग व रहस्य यांचाच आश्रय त्यांना सतत घ्यावा लागल्याने व्यक्तीपेक्षा घटनांनाच त्यांच्या कथातून महत्त्व मिळू लागले; पण चतुर निवेदनशैलीमुळे व रचनेच्या त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमुळे त्यांची कथा कल्पनारम्य असूनही (किंबहुना त्यामुळेच) विशेष लोकप्रिय झाली. १९१०-२५ पर्यंतच्या कालखंडावर गुर्जरांचे अधिराज्य चालले म्हणून हा कालखंड गुर्जरांचा कालखंड किंवा ‘संपूर्ण गोष्टी’चा कालखंड म्हणून ओळखला जातो.

गुर्जरांनी स्वतंत्रपणे लिहिलेली आणि बंगालीतून मराठीत आणलेली पुस्तके

संपादन
 • चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९) - मूळ बंगाली, लेखक : शरत्‌चंद्र चतर्जी
 • जीवनसंध्या (१९०९) - मूळ बंगाली, लेखक : रमेशचंद्र दत्त
 • देवदास (१९३७) - मूळ बंगाली, लेखक : शरत्‌चंद्र चतर्जी
 • द्राक्षांचे घोस (कथासंग्रह, १९३६)
 • नागमोड (१९४६) - मूळ बंगाली, लेखक : प्रभातकुमार मुखर्जी
 • पौर्णिमेचा चंद्र (१९२०) - मूळ बंगाली, लेखक : प्रभातकुमार मुखर्जी
 • मराठी व्याकरण एकदम सोपे (स्वतंत्र)
 • शशांक : मूळ बंगाली, लेखक : राखालदास बॅनर्जी
 • शेवटचा परिचय (१९४९) - मूळ बंगाली, लेखक : शरत्‌चंद्र चतर्जी
 • संगम (१९३५) - मूळ बंगाली, लेखक : रवींद्रनाथ टागोर
 • संसार असार (१९१४) - मूळ बंगाली, लेखक : प्रभातकुमार मुखर्जी
 • स्वप्नभंग (१९३७) - मूळ बंगाली, लेखक : प्रभातकुमार मुखर्जी[२]

गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली. गुर्जरांचे संगीत नंदकुमार हे नाटक त्यातल्या संगीतासाठी गाजले. गंधर्व नाटक मंडळीने या नाटकांचे प्रयोग केले. हे नाटक आकाशवाणीच्या पुणे केंद्राने जतन केले आहे. गडकऱ्यांच्या एकच प्याला ह्या नाटकासाठी गुर्जरांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली.

राम गणेश गडकरी यांच्या शिफारसीवरून बळवंत नाटक मंडळीने वि.सी. गुर्जर यांचे ‘राजलक्ष्मी’ नावाचे नाटक बसवले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग सोलापूरमध्ये इ.स. १९२१ सालच्या जानेवारीमध्ये झाला. त्यात काम करणारे नट (आणि त्यांच्या भूमिका) अशा होत्या : चिंतामणराव कोल्हटकर (शीलधवल); शंकरराव मोहिते (संजीवनी); दामुअण्णा मालवणकर (शेखर); अरुणधवल (पुरुषोत्तम बोरकर); मास्टर दीनानाथ मंगेशकर (वारुणी), वगैरे. नाटकातली पदे सहज गुणगुणण्यासारखी आणि लोकप्रिय होण्यासारखी होती. दीनानाथ मंगेशकर यांनी ती अतिशय मोहक रीतीने गायिली होती. असे असले तरी, हे ‘राजलक्ष्मी’ नाटक फार चालले नाही.

चरित्र

संपादन

म.ना. अदवंत यांनी वि.सी. गुर्जरांचे चरित्र लिहिले आहे. साहित्य अकादमीतर्फे ते प्रकाशित झाले आहे.

पुरस्कार

संपादन

गुर्जरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक साहित्य संस्था त्यांच्या नावाचा पुरस्कार देतात.[३][४]

असेच काही पुरस्कार :-

 • कोकण मराठी साहित्य परिषदेचा वि. सी. गुर्जर स्मृती कथासंग्रह पुरस्कार : २०१० साली हा पुस्कार श्रीकांत वर्तक यांच्या ‘ऑर्गन फार्मिंग’ या पुस्तकाला मिळाला, तर २०१५ साली तो अशोक समेळ यांच्‍या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कथासंग्रहाला मिळाला.

संदर्भ

संपादन
 1. ^ a b c "गुर्जर विठ्ठल सीताराम". ४ मे २०२१ रोजी पाहिले.
 2. ^ "Catalog". ४ मे २०२१ रोजी पाहिले.
 3. ^ "'कोमसाप'चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर". ४ मे २०२१ रोजी पाहिले.
 4. ^ "कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर". ४ मे २०२१ रोजी पाहिले.