विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१६
२०१५ क्रिकेट विश्वचषक ही एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली.
मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील.
साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले.
विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.