विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१५

एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगोजेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.

एके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एअर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एअर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एअर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान कराचीहून अहमदाबादमार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर स्वत: चालवत आणले. टाटा एअरलाइन्सकडे सुरूवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरूवातीच्या काळात कराची ते मद्रासदरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून भारतीय रूपया ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर २६ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत सरकारने एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून कैरोजिनिव्हामार्गे लंडन हीथ्रो ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली नैरोबी सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. एअर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एरलाइन्सकडे वळवली गेली.

पुढे वाचा... एअर इंडिया