विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २००७

पुणे

पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळामुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे व पुणे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबई नंतरचे सर्वात अग्रेसर शहर आहे. अनेक नामांकित शिक्षणसंस्था या शहरात असल्यामुळे याला पूर्वेचे ऑक्सफोर्ड असे संबोधतात. पुण्याची मराठी ही मराठी भाषेचे 'मानक रुप' (standard) मानली जाते.

शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, आयुका, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, सी-डॅक यासारख्या संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

पुणे हे महाराष्ट्रातील व भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. टेल्को, बजाज ऑटो, भारत फोर्ज यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, सिमँटेक, आयबीएम सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून विकसित होत आहे.

पुढे वाचा...