वनराई बंधारा
वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुदा तात्पुरता असतो.याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती,वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात.[१]
याद्वारे,पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते.[१]
जागेची निवड
संपादनकोणत्याही नाला,ओढा अथवा पाण्याच्या प्रवाहात, पाण्याचा साठा जास्तीत-जास्त होऊ शकेल अशा जागेची निवड यासाठी करण्यात येते.प्रवाहाच्या कमी रुंदीच्या ठिकाणाची निवड यासाठी करण्यात येते.हा बंधारा उभारण्याचा खर्च कमीत-कमी असावा व त्याद्वारे जास्तीतजास्त फायदा मिळावा अशी यामागील भूमिका आहे.नाला/ओढा/छोट्या नदीचे पात्र खोल व अरुंद असावयास हवे.तेथील उतार कमी असावयास हवा.निवडलेली जागा प्रवाहाच्या वळणाजवळची असू नये.[१]
कसा बांधतात
संपादनप्रवाहाचा उतार व रुंदी लक्षात घेता या बंधाऱ्याच्या पायव्याची रुंदी सुमारे १.५ ते २ मीटर असावी. हा बंधारा दोन्ही काठापर्यंत बांधणे आवश्यक आहे.सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून त्यांची तोंडे प्लॅस्टिकच्या दोऱ्यांनी शिवून त्या बंधाऱ्यासाठी वापरण्यात येतात. प्रवाहाच्या वाहण्याच्या दिशेस आडवा अशी याची रचना असते. ही भरलेली पोती/गोण्या एकाशेजारी एक व एकमेकास लागून अशा पहिल्या ओळीत ठेवण्यात येतात.पोत्यांची लांबी सहसा प्रवाहाच्या दिशेने असते.पहिला थर तयार झाल्यावर, तसाच दुसरा थर रचण्यात येतो.विटांची भिंत बांधतांना वापरण्यात येणारी सांधेजोड पद्धत यात वापरण्यात येते. पहिल्या थराच्या गोण्यांच्या सांध्यांवर/जोडावर, दुसऱ्या थराचे पोते ठेवण्यात येते.साधारणतः दोन अथवा तीन थरांनंतर, मातीचा एक थर पसरविण्यात येतो. त्याने रचलेल्या पोत्यांच्या मधील फटी बुजून बंधाऱ्याचे सांधे पक्के होतात व पाणी झिरपत नाही.[१]
फायदे
संपादन- पावसाचे वाहून जाणारे पाणी याने अडविण्यात येते व हवे असल्यास अशा प्रकारच्या बंधाऱ्यांची साखळी करून जमिनीत मुरवता येते. त्याने पाण्याच्या भूगर्भपातळीत वाढ होते.
- सक्षम जलस्रोतांची निर्मिती.
- कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी पावसाळी पाण्याचा पुरेपूर वापर.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. दोन-चारच्या संख्येतील शेतकरीही याचे बांधकाम करू शकतात.
- देखभाल, डागडूजी, दुरुस्तीचा नगण्य आवश्यकता.
- लहान गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे खालचे भागास बंधाऱ्याची साखळी तयार केल्यास, विहिरींचे पाणी जास्त काळ टिकते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |