स्तन

सस्तन प्राण्याच्या शरीरावर पुढील बाजूस असलेला, दूध स्रवणारी ग्रंथी म्हणून विकसित झालेला अवयव
(वक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

स्तन ही सस्तन प्राण्याच्या शरीरावर असलेली दूध स्रवणारी ग्रंथी आहे.

स्तन
मानवी स्तनाची रचना areola, स्तनाग्र, आणि inframammary fold सह
विवरण
लॅटिन mamma (mammalis "of the breast")[]
internal thoracic artery
internal thoracic vein
अभिज्ञापक
टी ए A16.0.02.001
एफ़ एम ए साचा:FMA
शरीररचना परिभाषिकी

पाठीचा कणा असलेल्या (पृष्ठवंशी) प्राण्यांमधील एका वर्गात शरीराच्या खालच्या किंवा पुढच्या भागावर (अनुक्रमे चार पायांचे किंवा दोन पायांचे प्राणी) फुगीर उंचवटे आढळतात. त्यांना स्तन असे म्हणतात आणि या वर्गातील प्राण्यांना स्तनी, स्तनधारी किंवा सस्तन प्राणी असे म्हणतात. या प्राण्यांच्या नर आणि मादी दोघांतही स्तन आढळत असले तरी नरांत त्यांचा विकास होत नाही. माद्यांत त्यांचा दुग्धग्रंथी म्हणून विकास होतो आणि नवजात अर्भकाला मातेकडून पोषण मिळण्यासाठी (दूध पाजण्यासाठी) यांचा उपयोग असतो.

सस्तन प्राण्यांच्या या वर्गात[] देवमासा (व्हेल) व डॉल्फिन हे जलचर; वटवाघूळ; हरीण, शेळी, घोडा, गाय यांसारखे खूर असणारे शाकाहारी प्राणी; उंदीर, घूस, चिचुंदरी यांसारखे कुरतडणारे प्राणी; मांजरे, कुत्री, वाघ, सिंह, यांसारखे मांसाहारी शिकारी प्राणी आणि माकडे वानरे, चिंपांझी, गोरिला यांसारखे व मानवासहित वानर-कपी-नर गणातील सर्व फलाहारी किंवा मिश्र आहारी प्राणी अशा विविध सजीवांचा समावेश होतो.

काही अपवादात्मक सस्तन प्राणी सोडल्यास इतर सर्व सस्तन प्राण्यांच्या भ्रूणांची वाढ मातेच्या गर्भाशयात होते व या काळात भ्रूणांचे वारेमधून (अपरा) पोषण होत असते. गर्भाशयातून बाहेर आलेल्या नवजात अर्भकाने स्वतंत्रपणे अन्नग्रहण करून ते पचविण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होईपर्यंत या प्राण्यांची बालके स्तनातील दुधावर अवलंबून असतात.

कुत्री, मांजरे यांसारख्या प्राण्यांच्या छाती व पोटावर स्तनांच्या ४ ते ५ जोड्या असतात. गायी-म्हशींच्या पोटाच्या खालच्या बाजूला २ जोड्या असतात. माकडे-वानरे व कपीकुळातील प्राण्यांच्या छातीवर एक जोडी असते. माणूसही सस्तन प्राणी असून त्याच्या छातीवर पुढे डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन स्तन त्वचेखाली निर्माण होतात.

भ्रूणावस्थेत एकाच प्रकारच्या ऊतीपासून स्त्री व पुरुषाच्या स्तनांची निर्मिती होते. नवजात बालकांमधे दोघांच्याही स्तनांची वाढ दिसत नाही. पौगंडावस्थेत स्त्री-संप्रेरकांच्या (ईस्ट्रोजेनEstrogen) प्रभावामुळे स्त्रीच्या स्तनांची व दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथींची निर्मिती व वाढ सुरू होते. पुरुषांत स्त्री-संप्रेरक अगदी कमी प्रमाणात निर्माण होतात आणि पुरुष-संप्रेरकाच्या (टेस्टोस्टेरॉनTestosterone) विरोधी प्रभावामुळे स्तनांचा विकास होत नाही.

स्तनांचं मुख्य काम दूध निर्मिती आणि बाळाला अंगावर पाजणे हे आहे आणि त्यांची रचनाही त्यानुसारच असते. गर्भारपणात गर्भरक्षक संप्रेरकाच्या (प्रोजेस्टेरॉनProgesterone) प्रभावामुळे दुधाच्या ग्रंथींची अधिक वाढ होते आणि मुख्यतः प्रसूतीनंतर त्यांत दुधाची निर्मिती सुरू होते. बाळाने चोखायला सुरुवात करताच दूध पाझरायला सुरुवात होते आणि दुधाच्या अधिक निर्मितीलाही उत्तेजन मिळते. मासिक पाळी बंद झाल्यावर अतःस्रावांच्या प्रभावाविना या ग्रंथी सुकू लागतात आणि स्तनांचा आकार लहान होत जातो.

दूध निर्मिती व बाळाला अंगावर पाजणे या मुख्य कार्यांशिवाय स्तनांना लैंगिक आणि सामाजिक संदर्भ, अर्थ, उपयुक्तता आणि महत्त्वही आहे.

अनेक कारणांसाठी स्तनांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने त्यांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. स्तनांची काळजी स्तनांना अनेक रोगही होऊ शकतात. त्यांचा प्रतिबंध, निदान आणि उपचार हेही महत्त्वाचे आहे. स्तनांचे रोग, स्तनाचा कर्करोग

स्तनांची वाढ आणि विकास

संपादन

सर्व सस्तन प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत नर आणि मादी, दोघांच्याही शरीरावर छाती आणि पोटाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला, पुढच्या पायांपासून मागच्या पायांपर्यंत, बाह्य आवरणाच्या दोन जाडसर घड्या किंवा उंचवटे निर्माण होतात. त्यांना दुधाच्या ओळी असं म्हणतात. त्यांच्यापासून पुढे स्तन आणि स्तनाग्रे निर्माण होतात.

निरनिराळ्या सस्तन प्राण्यांच्या माद्यांत या ओळींतील विशिष्ट भाग स्तनांत व स्तनाग्रांत विकसित झालेला दिसतो. उदा. – कुत्र्यां-मांजरांमधे स्तनांच्या चार-पाच जोड्या पुढच्या पायांपासून मागच्या पायांपर्यंत असतात, गायी-म्हशींत दोन जोड्या पोटावर मागच्या पायांमधे असतात आणि शेळीत एक जोडी मागच्या पायांमधे दिसते.

माणसाच्या भ्रूणावस्थेत सातव्या आठवड्यात दुधाच्या ओळी दिसायला लागतात. लैंगिक विभेदनाआधी हे घडल्यामुळे पुरुष गर्भांतही या ओळी दिसतात. माणसामधे स्तनांची एकच जोडी छातीवर दिसते. क्वचित दोनापेक्षा जास्त स्तनाग्रे निर्माण होतात. मोठा तीळ किंवा छोटी काळपट-तपकिरी गाठ दुधाच्या ओळीवर दिसल्यास ते अविकसित स्तनाग्र असण्याची शक्यता असते.

वय आणि विकासाच्या टप्प्यांबरोबर स्त्रीच्या स्तनांत होणारे बदल

संपादन
 
Five-stage Tanner Scale

जन्मापासून कुमारवयापर्यंत स्तन अविकसित असतात. तोपर्यत मुलगा आणि मुलगी यांच्या स्तनाची रचना आणि आकार यांत काहीच फरक दिसत नाही. किशोरवयात मात्र स्त्री-संप्रेरक (मुख्यतः ईस्ट्रोजेन - स्त्रीमदजन) आणि वाढ-संप्रेरकाच्या (Growth Hormone) प्रभावाखाली मुलींच्या स्तनांची वाढ आणि विकास (Breast Development) एकदम सुरू होतो .

पौगंडावस्था

संपादन
 
किशोरवयापासून तरुण स्त्रीपर्यंतच्या स्तनांच्या वाढीचे टप्पे दर्शवणारी आकृती

पौगंडावस्थेच्या सुरुवातीला, वयाच्या साधारण आठ वर्षांनंतर, स्त्री-संप्रेरक ईस्ट्रोजेनची रक्तातली पातळी वाढायला लागण्यामुळे मुलींच्या स्तनाग्राच्या खाली घट्ट गाठ दिसायला लागते. तिला स्तनाची कळी असे म्हणतात. बऱ्याच मुलींमधे वयात यायला लागण्याचे ते पहिले चिन्ह असते. नंतर स्तनाग्र, त्याभोवतालची चकती (स्तनाग्र-परिवलय) आणि त्याखालच्या गाठीची वाढ होते. या वेळी या गाठींच्या आकारात फरक असू शकतो. प्रत्यक्ष स्तनांची वाढ त्यानंतर सुरू होते आणि स्तनांचे आकारमान झपाट्याने वाढते. त्यात मुख्यतः दुधाच्या ग्रंथींच्या नलिकांचे जाळे, प्राथमिक अवस्थेतील ग्रंथी, भोवतालची चरबी आणि आधारभूत ऊतींची वाढ होऊन साधारण 18 ते 20 वर्षांपर्यंत स्तनांना त्यांचा पूर्ण आकार मिळतो[]. स्तनांची पूर्ण वाढ होईपर्यंत स्तनाग्र आणि भोवतालच्या चकतीचा फुगीरपणा स्तनापेक्षा वेगळा दिसतो. नंतर तो स्तनाच्या आकारात मिळून जातो.

मासिक पाळीचे चक्र

संपादन

मासिक पाळीच्या चक्रात पाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यात स्तनांच्या आकारमानात थोडी वाढ होते आणि पाळी सुरू झाल्यावर ती ओसरते.

गर्भारपणा, प्रसूती व स्तनपान

संपादन

गर्भारपणाच्या काळात गर्भरक्षक प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाच्या प्रभावामुळे दुधाच्या ग्रंथींचा पुढील विकास होतो. यामुळे स्तनांचे आकारमान आणखी वाढते. त्यामुळे स्तनांच्या कातडीवर ताणल्याच्या रेषा दिसू लागतात. स्तनाग्रांचाही आकार वाढतो. स्तनाग्रे आणि भोवतालच्या चकतीचा रंगही जास्त गडद होतो.

 
Breast with visible stretch marks

प्रसूतीनंतर स्तनांचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे आणि दुधाची निर्मिती सुरू झाल्यामुळे स्तनांचे आकारमान आणखी वाढते. पहिले 3-4 दिवस ते दुधाने भरून आल्यामुळे जास्त घट्ट लागतात. त्यानंतर बाळाला पाजण्याच्या कालावधीत बाळाच्या चोखण्याप्रमाणे दूध पाझरत असल्यामुळे हा घट्टपणा कमी होतो.

बाळ अंगावर प्यायचे बंद झाल्यावर दोन गर्भारपणांच्या मधल्या काळात दूधनिर्मिती थांबते आणि स्तनांचा आकार बराचसा पूर्ववत होतो. पण प्रत्येक गर्भारपणात तो थोडा थोडा वाढत राहातो, स्तनाग्रे जास्त गडद होत जातात आणि ताणल्याच्या रेषाही वाढतात.

रजोनिवृत्ती

संपादन

पाळी गेल्यानंतर (रजोनिवृत्ती) स्त्री-संप्रेरकांचा (ईस्ट्रोजेनप्रोजेस्टेरॉन) प्रभाव कमी होत गेल्याने दुधाच्या ग्रंथी सुकत जातात आणि हळूहळू नष्ट होतात. त्यामुळे स्तनांच्या आकारात घट होत जाते, त्यांचा टचटचीतपणा कमी होतो, ते मऊ-विसविशीत होतात आणि ओघळू लागतात. स्तनाग्रेही लहान होतात. त्यांचा आणि चकत्यांचा रंगही फिकट होत जातो. वयाबरोबर स्तन शिथिल होणे, ओधळणे आणि खाली झुकणे नैसर्गिक आहे.

याशिवाय गर्भप्रतिबंधक गोळ्या, संप्रेरकांचा उपयोग करून उपचार, वजनातले मोठे बदल, धूम्रपान, यांमुळे स्तनांच्या आकारमानात चढ-उतार होत राहातात.

स्तनांची किशोरवयातील वाढ हा दुय्यम लैंगिक गुणधर्मांच्या (पौगंडावस्था) विकासाचाही एक भाग आहे. या काळात काही वेळा स्तन असमान आकाराचे असणे नैसर्गिक असले तरी ते तात्पुरते असते. काही वेळा ही असमानता नंतरही टिकून राहिल्यास ते अनैसर्गिक असते. तसेच काही वेळा या वयात मुलींच्या स्तनांची खूप जास्त किंवा खूप कमी वाढही होऊ शकते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वेळीच योग्य माहिती दिली नसेल तर पहिल्या पाळीच्या सुरुवातीप्रमाणेच स्तनाच्या कळीच्या वाढीसाठीही मुली मानसिक दृष्ट्या तयार नसतात आणि त्यांना ते अनैसर्गिक वाटून धक्का बसू शकतो. त्यांच्या मनातल्या स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेवर याचा परिणाम होऊन त्यांना भीती किंवा लाज वाटू शकते किंवा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.

एकूणच स्त्रीच्या आयुष्यात किशोरावस्था, तारुण्य, गर्भारपणा, अंगावर पाजण्याचा काळ आणि रजोनिवृत्तीनंतरचा काळ यांमधे स्तनांचा आकार, आकारमान आणि वजन बदलत राहाते. हे बदल बाळाला अंगावर पाजल्यामुळे होतात असा सर्वसाधारण लोकांचा आणि बऱ्याच वैद्यकीय व्यावसायिकांचाही समज आहे तो चुकीचा आहे.

स्तनांच्या आकारमानातील बदलांबरोबरच त्यांवरील ताणल्याच्या रेषा वाढत जातात. या रेषा म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील स्तनांच्या विकासक्रमाचा आणि आकारमानात झालेल्या चढ-उतारांचा आलेखच असतात.

पुरुषाच्या स्तनांत होणारे बदल

संपादन

पुरुषांच्या स्तनांमधे आयुष्यभर काही बदल होत नाहीत. स्तनाच्या कळीची वाढ काही वेळा किशोरवयातील मुलांमधेही दिसते. नंतर ती बसते आणि पुढे टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावामुळे नैसर्गिक परीस्थितीत स्तनांचा विकास होत नाही. पण या वयात काही वेळा स्त्री-संप्रेरक आणि पुरुष-संप्रेरकांच्या असंतुलनामुळे मुलाच्या स्तनांचीही मुलीप्रमाणे वाढ होते. क्वचित प्रसंगी खूप उतार वयात टेस्टोस्टेरॉन या पुरुष-संप्रेरकाचा प्रभाव कमी झाल्यामुळे स्तनांची थोडी वाढ होऊ शकते (Gynecomastia) आणि दूधही पाझरू शकते. वाढ जास्त व नकोशी वाटल्यास काही भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करता येते[].

 
स्तनाची रचना स्पष्ट करणारे चित्र

स्त्रीच्या छातीच्या पुढच्या भागावर, डाव्या आणि उजव्या बाजूला एक-एक असे 2 स्तन असतात. ते त्वचेखाली आणि छातीच्या स्नायूवर साधारण दुसऱ्या फासळीपासून सहाव्या फासळीपर्यंत आणि मध्यरेषेपासून काखेपर्यंत पसरलेले असतात[]. ही साधारण शंकूच्या आकाराची रचना असते. तिचा पाया छातीवर आणि शिखर स्तनाग्राच्या ठिकाणी असते. स्तनांमधे प्रामुख्याने दुधाच्या ग्रंथी आणि चरबीयुक्त संयोजी ऊतीचा समावेश असतो(Breast: Anatomy).

दुधाच्या ग्रंथी

संपादन
 
किशोरवयातील स्तन - दुग्धग्रंथींतील नलिकांची रचना
 
किशोरवयातील स्तन - दुग्धग्रंथींची रचना
 
तारुण्यातील पूर्ण विकसित स्तनातील दुग्ध ग्रंथींची खंडात्मक रचना - समोरून व बाजूने
 
तारुण्यातील पूर्ण विकसित स्तनाची रचना - बाजूने
चित्र:दूध स्रवणाऱ्या पूर्ण विकसित स्तनाची रचना - Lactating Breast Structure.jpg
प्रसूतीनंतर दूध स्रवणाऱ्या पूर्ण विकसित स्तनाची रचना

किशोरवयात स्त्री-संप्रेरक ईस्ट्रोजेन आणि गर्भारपणात ईस्ट्रोजेनबरोबरच गर्भरक्षक संप्रेरक प्रोजेस्टेरॉनच्याही प्रभावाखाली दुधाच्या ग्रंथींची अधिक वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या स्तनाच्या मुख्य ग्रंथीयुक्त भागात दुधाच्या ग्रंथींचे 14 ते 18 खंड/गुच्छ आढळतात. हे खंड स्तनाग्राच्या केंद्राभोवती फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे पसरलेले असतात. या ग्रंथींतून निघणाऱ्या नलिका एकमेकींना मिळत मिळत एका खंडातून एक अशा 14-18 मुख्य नलिका स्तनाग्रावर वेगवेगळ्या उघडतात.

दुधाच्या ग्रंथी या केसांच्या मुळाशी असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या घर्मग्रंथींचेच (Sweat gland: Types, Apocrine Sweat gland) बदललेले व सुधारित स्वरूप आहे. त्यातून बाळाच्या पोषणाकरता स्निग्ध पदार्थप्रथिनयुक्त दूध स्रवते. ते नलिकांमधून स्तनाग्रांपर्यंत येते व स्तनाग्रांतून बाहेर पाझरते. पूर्ण वाढ झालेल्या स्तनातील २/३ भाग या ग्रंथींनीच व्यापलेला असल्यामुळे स्तनांचे मुख्य काम दूधनिर्मिती व बाळाला दूध पाजणे हेच आहे.

स्तनाग्र बोंडल्याप्रमाणे असून बाळ दूध पिताना त्याला तोंडात धरण्यासाठी सोयिस्कर आकाराचे असते. स्तनाग्राभोवती त्वचेवर कमी-अधिक व्यासाची गडद रंगाची चकती (स्तनाग्र-परिवलय) असते. या चकतीत बदललेल्या स्वरूपातील घर्मग्रंथी असतात. बाळाला पाजताना स्तनाग्राला सुरक्षितता देण्यासाठी त्यांतून एक तेलकट पदार्थ पाझरतो. त्याच्या विशिष्ट वासामुळे बाळाची भूक वाढते अशीही एक शक्यता आहे.

संयोजी ऊती

संपादन

ग्रंथींव्यतिरिक्त स्तनांचा उरलेला १/३ भाग मुख्यतः चरबी आणि संयोजी ऊतकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे ग्रंथी आणि नलिकांना आधार मिळतो. स्तनांवर त्वचेखालीही चरबीचे आवरण असते. शिवाय कॉलरबोन आणि छातीच्या स्नायूंवरील आवरणापासून, ग्रंथी आणि चरबीमधून स्तनांवरील त्वचेच्या आवरणापर्यंत स्तनांचे आधारबंध (कूपरचे बंध) पसरलेले असतात. त्यांच्यामुळे स्तनांना छातीवर धरून ठेवण्यासाठी आधार मिळतो आणि उभारी येते. ही ग्रंथींची रचना आणि त्याभोवतीच्या चरबीमुळे स्तनांना विशिष्ट आकार येतो.

रक्तपुरवठा

संपादन

स्तनांना अंतस्थ स्तन-रोहिणी (Internal mammary artery), छातीतील इतर रोहिण्या आणि तिसऱ्या ते आठव्या बरगड्यांमधल्या जागेतून जाणाऱ्या रोहिण्यांच्या शेवटच्या शाखा यांतून भरपूर रक्तपुरवठा असतो[]. यातील जवळजवळ ६०% रक्तपुरवठा अंतस्थ स्तनरोहिणीतून होतो. अंतस्थ स्तन-नीलेतून या रक्ताचा निचरा होतो.

किशोरवयात स्तनांची वाढ होते त्यावेळी तो वाढतो. मासिक पाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यात तो थोडा वाढतो व पाळी सुरू झाल्यावर कमी होतो. तसेच लाज वाटण्याच्या प्रसंगी आणि मुख्यतः कामोत्तेजनेच्या वेळी नाक, गाल, कानाची पाळी यांच्याबरोबरच स्तन आणि स्तनाग्रांचा रक्तपुरवठा वाढल्यानं ते लालसर, गरम आणि जडही होतात. गर्भारपणाच्या काळात रक्तपुरवठा हळूहळू वाढतच जातो. बाळंतपणानंतरच्या काळात दूधनिर्मितीसाठी तो आणखीनच वाढतो. त्यामुळे बाळंतपणनंतरचे काही दिवस स्तन जास्त लाल आणि गरम असतात आणि त्यावर फुगलेल्या नीलांचे जाळे दिसते.

लसीचा निचरा

संपादन

स्तनात तयार झालेल्या लसीपैकी जवळजवळ 75% लस त्या त्या बाजूच्या काखेतील लसिका ग्रंथींकडे वाहून नेली जाते आणि उरलेली छातीच्या मधल्या हाडाच्या दोन्ही बाजूंच्या लसिका ग्रंथींकडे जाते. हे विशेषतः स्तनांच्या कर्करोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते कारण त्याचा प्रसार प्रामुख्याने लसिका वाहिन्या आणि लसिलाग्रंथीच्या द्वारे होतो.

संवेदनक्षमता

संपादन

परीघवर्ती चेतातंतूंच्या (Peripheral nerves) जाळ्यामुळे स्तन संवेदनक्षम बनतात. विशेषतः स्तनांवरील त्वचा, स्तनाग्रे आणि त्याभोवतालच्या चकत्या अतीसंवेदनक्षम असतात. त्यामधे चेतातंतूंचे दाब आणि थरथरीला संवेदनक्षम पापुद्रेयुक्त गोलक (Lamellar corpuscle) आणि स्पर्षसंवेदक गोलक (Bulboid corpuscle) आढळतात. दुधाच्या ग्रंथी, नलिका आणि त्याभोवतीच्या अनैच्छिक स्नायूंभोवतीही (Smooth muscle) चेतातंतू एकवटलेले आढळतात. बाळानं चोखायला सुरुवात करताच बाळाच्या स्पर्षामुळे दुधाच्या निर्मितीला आणि पाझरण्याला चालना देण्यासाठी ही संवेदनक्षमता असते. ही एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. नंतर तर बाळाचा आणि त्याला पाजण्याचा नुसता विचारही छाती भरून यायला कारणीभूत ठरतो.पण या चेतातंतूंच्या टोकांशी कामोत्तेजनासाठी अतीसंवेदनक्षम विशेष पेशी आणि गोलकांचीही निर्मिती किशोरवयात होते. या कामोत्तेजक संवेदनांमुळे माणसाच्या कामजीवनातही स्तन हा महत्त्वाचा अवयव आहे.

कार्य

संपादन
 
स्तनपान करणारे मूल

स्त्रीयांमधे पूर्ण वाढ झालेल्या स्तनातील २/३ भाग दूध-निर्मितीच्या ग्रंथींनीच व्यापल्यामुळे स्तनांचे मुख्य काम दूध निर्मिती आणि बाळाला दूध पाजणे (स्तनपान देणे) हेच आहे.

मुलगा किंवा मुलगी, दोघांच्याही स्तनांची थोडी वाढ आणि थोडे चिकट दूध पाझरणे जन्मानंतर एक-दोन दिवस शक्य असते. कारण गर्भावस्थेत बाळ आईच्या दूध पाझरण्यास उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांच्या प्रभावाखाली असते. किशोरवयात दुधाच्या ग्रंथींच्या मुख्यतः नलिकांच्या जाळ्याची आणि अनुषंगिक चरबीची वाढ होते.

गर्भारपणात स्तनांचा आणि मुख्यतः दुधाच्या ग्रंथींचा विकास प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होतो. प्रोलॅक्टीन (Prolactin) या संप्रेरकाची रक्तातील पातळीही गर्भारपणात वाढत जाते. त्यामुळे दुधाच्या ग्रंथींचा आणखी विकास होऊन गर्भारपणाच्या अगदी शेवटी शेवटी त्या दूध निर्मितीसाठी तयार होतात आणि मुख्यतः बाळंतपणानंतर दुधाच्या ग्रंथींत दुधाची निर्मिती सुरू होते. बाळंतपणानंतर बाळाने चोखायला सुरुवात करताच स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे प्रोलॅक्टीन आणि ऑक्सीटोसिन (Oxytocin) या संप्रेरकांच्या निर्मितीला चालना मिळून त्यांच्या निर्मितीत झपाट्याने वाढ होते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली अनुक्रमे दूध-निर्मिती आणि दूध पाझरणे या गोष्टी घडतात. फक्त स्त्रीमधेच आणि बाळाला पाजण्याच्या वेळीच फक्त दूध निर्मिती आणि दूध पाझरण्याची क्रिया व्हावी हा यामागचा हेतू आहे. पण काही वेळा संप्रेरकांचे असंतुलन, अंतःस्रावी ग्रंथींचे विकार, काही औषधांचा दुष्परिणाम, अतीतणाव इत्यादी कारणांमुळे गर्भारपण नसतानाही दूधनिर्मिती होऊन दूध पाझरू शकते. स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे निर्माण होणाऱ्या ऑक्सिटोसिनमुळे गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणालाही चालना मिळते. यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी होण्याला आणि गर्भाशय पुन्हा मूळ स्थितीत येण्याला मदत होते.

बाळंतपणानंतर पहिले तीन ते चार दिवस स्तनांचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे आणि दुधाने भरून आल्यामुळे ते जास्त घट्ट लागतात. त्यानंतर बाळाला पाजण्याच्या कालावधीत बाळाच्या चोखण्याप्रमाणं दूध पाझरत असल्यामुळे हा घट्टपणा कमी होतो आणि बाळाच्या गरजेप्रमाणे दूधनिर्मिती आणि पाझरणे चालू राहाते. दुधाच्या निर्मितीसाठी थोड्या जास्त तापमानाची गरज असते. दूध-निर्मितीच्या काळात जास्त रक्तपुरवठ्यामुळे स्तनांचे तापमान वाढते. त्यांतील उष्णता टिकून राहाण्यास मदत व्हावी, बाळाला अंगावर पिण्यासाठी सोयिस्कर व्हावे आणि पिताना त्याचे नाक स्तनावर दाबले जाऊन श्वास घ्यायला अडचण पडू नये म्हणून स्तनांचा वैशिष्ट्यपूर्ण गोल आकार विकसित झाला आहे.

नंतर बाळ अंगावर प्यायचे बंद झाल्यावर दोन गर्भारपणांच्या मधल्या काळात दूधनिर्मिती थांबते आणि स्तनांचा आकार जवळजवळ पूर्ववत होतो. पण प्रत्येक गर्भारपणात तो पूर्वीपेक्षा थोडाथोडा वाढतो. याप्रमाणे प्रत्येक गर्भारपण आणि बाळंतपणानंतर हे दूधनिर्मिती आणि दूध पाझरण्याचे कार्य आणि स्तनांतील बदल चालू राहातात.

पुरुषांमधे नैसर्गिक परीस्थितीत स्तनांची वाढ आणि दूधनिर्मिती होत नाही.

स्तन आणि लैंगिकता

संपादन

मनुष्यप्राण्यात स्तन लैंगिक उद्दीपनात महत्त्वाचे काम करतात. हे महत्त्व दोन प्रकारे आहे. एक म्हणजे पुरुष आणि स्त्रीच्या शरीरावरील अनेक लैंगिक उद्दीपक क्षेत्रांपैकी ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यांना केलेल्या स्पर्षामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक पातळीवर कामोद्दीपन होते. दुसरे म्हणजे स्त्रीचे स्तन दिसणे किंवा त्यांचा स्पर्ष पुरुषाला आणि विशिष्ठ पुरुषाने ते बघणे स्त्रीला कामोद्दीपक वाटते. पुरुषाची उघडी, भरदार आणि केसाळ छाती आणि त्यावरील स्तनाग्रे बघणे स्त्रीलाही कामोद्दीपक वाटते. हे कामोद्दीपन मानसिक पातळीवर होते[]. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत लैंगिकता प्रामुख्याने मानसिक पातळीवरील असल्याने हे महत्त्वाचे आहे.

स्तनाग्रे आणि त्याभोवतालची चकती यांवरील त्वचा चेतातंतूंनी समृद्ध असते. त्यामधे चेतातंतूंचे दाब आणि थरथरीला संवेदनक्षम पापुद्रेयुक्त गोलक; स्पर्षसंवेदक गोलक; जननेंद्रियांवर आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण तापमानसंवेदक गोलक आणि काही सुसंघटित चेतातंतूंची टोकेही विखुरलेली आढळतात.

दुधाच्या ग्रंथी, नलिका आणि त्याभोवतीच्या अनैच्छिक स्नायूंभोवतीही चेतातंतू एकवटलेले आढळतात. स्तनाग्राभोवतालच्या चकतीजवळच्या केसांची मुळेही या संवेदनक्षमतेत भर घालतात. संपूर्ण स्तनामधेही दाब आणि वेदनेला संवेदनक्षम चेतातंतूंच्या टोकांचे जाळे आढळते.

जननेंद्रीयांपासून जाणाऱ्या संवेदना मेंदूच्या ज्या क्षेत्रात पोचतात त्याच क्षेत्रात स्तनाग्रांपासून निघालेल्या संवेदना पोचतात. याशिवाय स्तनाग्रांना उत्तेजित केल्यावर ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टीन या हॉर्मोन्सच्या निर्मितीत झपाट्यानं वाढ होते. त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणाला चालना मिळते. ही एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. या आकुंचनांची संवेदनाही मेंदूत त्याच क्षेत्रात पोचते.

पुरुष आणि स्त्री, दोघांतही याचा जननेंद्रीयांवर मोठा परिणाम होतो. छाती, स्तन, स्तनाग्रे आणि त्याभोवतालची चकती यांना स्पर्षाने उत्तेजित केल्यावर दोघांतही एक प्रकारची कामोत्तेजक आणि सुखद भावना निर्माण होते[]. त्याचबरोबर हात, बोटे, ओठ, जीभ, इत्यादी इतर कामोत्तेजक क्षेत्रांना स्तनांचा स्पर्ष झाल्यासही सुखद भावना निर्माण होते.

याप्रमाणे स्तन कामभावनेने उत्तेजित झाले असताना त्यांचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे त्यांच्या आकारमानात थोडी वाढ होते, त्यावरील शिरा दिसू लागतात, ते थोडे जास्त गरम होतात आणि स्तनाग्रे मोठी होऊन पुढे येतात आणि जास्त टचटचीत होतात.तसेच लैंगिक संबंधाच्या वेळी स्तन आणि स्तनाग्रे स्पर्षानं उत्तेजित केल्याने जननेंद्रीयेही संभोगासाठी तयार व्हायला मदत होते. काही व्यक्तींत तर केवळ स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे संतृप्तीची भावनासुद्धा येते.

यामुळे स्तन हा शारीरिक कामोत्तेजक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचा अवयव आहे.

पुरुषांच्या बाबतीत स्त्रीचे स्तन दिसणे किंवा त्यांचा स्पर्षही पुरुषांना कामोद्दीपक वाटतो. यामागे उत्क्रांतीजन्य, शारीरिक आणि मानसिक कारणांबरोबरच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत. हे उद्दीपन स्तनांच्या आकारावर अवलंबून असू शकते[]. पण स्त्रीयांचे बाबतीत उद्दीपन आकारावर अवलंबून नसते.

पण सामाजिक परीस्थितीत स्त्री-पुरुष इतर अनेक कारणांनी एकत्र येण्याची परीस्थिती निर्माण झाल्यावर असे कामोत्तेजन होणे परवडणारे नाही आणि योग्यही नाही. म्हणून सामाजिक परीस्थितीत स्तन दिसण्यावर आणि एकूणच नग्नतेवर जास्त बंधने येत गेलेली दिसतात. त्यांतही, स्त्री लैंगिक दृष्टीने आणि एकूणच जास्त असुरक्षित आहे अशा समाजांत आणि संस्कृतींत ही बंधने जास्त जास्त कडक असलेली आढळतात.

आरोग्य

संपादन

विकार

संपादन

इतिहास

संपादन

सामाजिक - सांस्कृतिक महत्त्व

संपादन

स्तन आणि स्त्रीसौंदर्य

संपादन

स्तनांचा आकार, आकारमान, छातीवरील स्थान, उभारी, दोन स्तनांतील अंतर, स्तनाग्रांचा आकार आणि भोवतालच्या चकतीचा आकार अशा अनेक घटकांवर स्तनांचं सौंदर्य अवलंबून असतं. या घटकांची एकमेकांबरोबर आणि संपूर्ण स्त्रीच्या आकृतीबरोबर प्रमाणबद्धता आणि संतुलन यांवरही सौंदर्य अवलंबून असतं.

स्तनांची ठेवण

संपादन

स्तन छातीवर साधारण दुसऱ्या फासळीपासून सहाव्या फासळीपर्यंत आणि मध्यरेषेपासून काखेपर्यंत पसरलेले असतात. त्यांची ठेवण छातीवर पुढे समोर वाढलेले, बाकदार, दोन्ही बाजूंना झुकलेले, खाली झुकलेले किंवा लोंबणारे अशी असू शकते. दोन स्तनांतील अंतरही प्रत्येक स्त्रीत वेगवेगळे असते.

स्तनांचा आकार आणि आकारमान

संपादन

वैय्यक्तिक रंग-रूपातील फरकांप्रमाणेच स्तनांच्या आकारातही नैसर्गिकपणेच खूप विविधता आढळते. शंकूप्रमाणे किंवा घुमटाप्रमाणे; बसके किंवा लांबट; टोकदार किंवा फुगीर; असे सर्व स्तनांचे आकार नैसर्गिकपणेच आढळतात. स्तनांच्या आकाराप्रमाणेच आकारमानातही नैसर्गिकपणेच मोठा बदल आढळतो. स्तनातील दुधाच्या ग्रंथी आणि भोवतालची चरबी यांचे प्रमाण निरनिराळ्या स्त्रीयांत वेगवेगळे असते. या प्रमाणांवर स्तनाचे वजन आणि घट्टपणा अवलंबून असतो. स्तनाचे वजन अंदाजे ५०० ते १००० ग्रॅम्सपर्यंत असू शकते (Breast: Anatomy). वय आणि आयुष्यातील टप्प्याप्रमाणेही स्तनांचे आकारमान आणि वजनात बदल होतात.

पण सर्वसाधारणपणे स्तनाच्या लहान-मोठेपणावरून त्यांच्यातील चरबी आणि दुधाच्या ग्रंथींचं प्रमाण आणि त्यांची दूधनिर्मितीक्षमता यांसंबंधी अंदाज बांधता येत नाहीत.

स्तनांची असमानता

संपादन

जवळजवळ २५% स्त्रियांच्या दोन्ही स्तनांत लक्षात येण्याइतकी असमानता नैसर्गिकपणेच असते. किशोरवयात हे तात्पुरतं असतं. तसंच काही वेळा या वयात मुलींच्या स्तनांची खूप जास्त किंवा खूप कमी वाढही होऊ शकते. डावा स्तन मोठा असण्याचे प्रमाण सहसा जास्त असते. स्तनांची ठेवणही असमान असू शकते.

५ ते १०% स्त्रियांत ही असमानता जास्त प्रमाणात असू शकते. अशा वेळी किंवा असमानता नंतर निर्माण झाल्यास ते एखाद्या रोगाचे लक्षण आहे का याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे आहे. अनैसर्गिक असमानतेची किरकोळ कारणांपासून स्तनांच्या कर्करोगापर्यंत अनेक कारणे आहेत.

स्तन झाकणारे कपडे वापरले जात असल्यास नैसर्गिक असमानतेचा फारसा प्रश्न येत नाही. पण स्तनाकार दिसणारे कपडे वापरात असल्यास योग्य किंवा एका बाजूला पॅडिंग केलेल्या ब्रेसियरच्या किंवा इतर अंतर्वस्त्रांच्या वापराने असमानता लक्षात येत नाही. स्तनांतील असमानतेमुळे सौंदर्याला बाधा येत असेल तर स्तनाकारांतील तफावत दूर करणाऱ्या स्तनांचे रोपण किंवा पुनर्रचना शस्त्रक्रियांची जरूर पडते. कोणत्या प्रकारची शत्रक्रिया करायची आणि एकाच स्तनावर का दोन्ही ते असमानतेच्या प्रमाणावर आणि प्रकारावर अवलंबून असते.

आधार, उभारी आणि हालचाल

संपादन

स्तनांच्या आधारबंधांमुळे स्तनांना छातीवर धरून ठेवण्यासाठी आधार मिळतो आणि उभारी येते.किशोरवयात आणि अगदी तरुण वयात स्तन छातीच्या वरच्या भागात जास्त घट्ट चिकटलेले असतात. अशा वेळी त्यांचे वजन छातीवर समप्रमाणात विभागलेले असते आणि ते पुढे वाढलेले आणि उभार दिसतात. स्तन जास्त मोठे असल्यास, विशेषतः बाळंतपणानंतर आणि उतारवयात (उभे असलेल्या अवस्थेत) ते जास्त खाली झुकतात, लोंबतात आणि छातीच्या खालच्या बाजूवर विसावतात.

स्तनाचा पाया छातीवरच्या स्नायूवरच्या लवचीक आवरणावर आधारलेला आणि चिकटलेला असल्यामुळे हालचाली करताना व चालताना या पायावर स्तनांची मर्यादित हालचाल होऊ शकते. हालचालीचे प्रमाणही वयाबरोबर व स्तन ओघळण्याबरोबर वाढते.

सौंदर्यवृद्धी

संपादन

स्तन हे स्त्रीचे महत्त्वाचे सौंदर्य-लक्षण मानले गेले असल्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारांनी प्रयत्न केले जातात. परंतु स्तन दिसणे कामोत्तेजकही असल्याने ते दाखवण्यावर सामाजिक बंधने असतात. अशा वेळी त्यांच्या बाह्य रेषेवरून किंवा समाजमान्य मर्यादेनुसार दाखवलेल्या उघड्या भागावरून त्यांच्या सौंदर्याविषयी अनुमान करणे बघणाऱ्यावर सोपवलेले असते. उघडे स्तन किवा उघडी छाती फारच कमी वेळा दिसणार असते. म्हणून उघड्या स्तनांची वर्णने, चित्रे, शिल्पे, फोटो, छित्रफीती यांना महत्त्व प्राप्त झालेले दिसते. तसेच ते झाकण्याच्या प्रकारांना आणि ते किती आणि कसे झाकलेले आहेत यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी कंचुकी, ब्रेसियर, स्लिप, कोर्सेट, इ अंतर्वस्त्रे; पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक कपडे; स्तन झाकणाऱ्या कपड्यांचे लक्ष वेधून घेणारे रंग, इत्यादींचा उपयोग केलेला आढळतो.

स्तन प्रामुख्यानं चरबीयुक्त असल्याने कपड्यांच्या सहाय्याने त्यांना दाब देऊन मर्यादित प्रमाणात त्यांना हवा तसा आकार देता येतो. कपड्यांमुळे स्तनांना आधारही मिळतो. तसेच चालताना होणाऱ्या स्तनांच्या हालचालीमुळेही त्यांच्यकडे लक्ष वेधले जात असल्याने त्यांची हालचाल कपड्यांच्या सहाय्याने कमी अधिक प्रमाणात मर्यादित करता येते. याचा उपयोग वस्त्रं बनवताना, निवडताना आणि वापरताना केला जातो.

स्तनांचे सौंदऱ्य वाढवणारी वस्त्रे स्तनांना उभारी देणारी, आकार देणारी, आकारमान वाढवणारी, सामाजिक संकेतांनुसार पुरेसे झाकणारी पण अस्तित्त्व ठळकपणे दर्शवणारी अशी असतात. पण स्तनांचा उठाव दाखवणं समाजमान्य नसेल तर त्या ठिकाणी खूप सैल कपडे किंवा उभार दाबून टाकणारी घट्ट वस्त्रे वापरली जातात (Breast: Clothing).

या पलीकडे आकार आणि आकारमानात बदल हवा असेल तर आकार देणारी, वाढवणारी, कमी करणारी, ओघळलेपणा कमी करून उभारी देणारी, इत्यादी प्रकारच्या शस्त्रक्रीया आता उपलब्ध आहेत. पण स्तनांच्या सौंदर्यवृधीसाठी प्रयत्न करताना एखादी गोष्ट आपल्याला शोभणे आणि ती समाजमान्य असणे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

सुस्तनी स्त्री आदर्श माताही असणार – आपल्या मुलांची आई म्हणून ही योग्य असणार – अशी उपजत भावना पुरुषांच्या मनात जोडीदार-निवडीचे वेळी असते. स्त्रीयांच्याही मनात स्तनांच्या आकाराचा आणि सौंदर्याचा संबंध मुख्यतः मातृत्वाशीच असतो. त्यामुळे मोठ्या स्तनांची आवड आणि निवडही उपजत प्रवृत्तीमुळेच असते असे म्हणता येईल.

स्तन-सौंदर्य आणि गर्भारपण-स्तनपान

संपादन

बाळाला पाजण्यामुळे स्तन ओघळतात, त्यांचा आकार बिघडतो आणि त्यांचे सौंदर्य कमी होते हे सर्वसाधारण गैरसमज असले तरी वाढते वय हे स्तन ओघळण्याचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय धूम्रपान, अनेक वेळा गर्भधारणा, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आणि वजनातील चढ-उतार ही स्तन ओघळण्याची कारणे आहेत असे संशोधकांना आढळले आहे (Breast: Shape, texture, and support).

अधिक वाचन

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

स्तन ग्रंथी

बाह्य दुवे

संपादन
  • Images of female breasts
  • Breast Cancer Treatment and Facts Archived 2009-04-30 at the Wayback Machine.
  • “Are Women Evolutionary Sex Objects?: Why Women Have Breasts". १६ मार्च २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित.

संदर्भ

संपादन
  1. ^ "mammal – Definitions from Dictionary.com". Dictionary.reference.com. 31 October 2011 रोजी पाहिले.
  2. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/component/content/article?id=10149
  3. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/23-2015-02-10-05-01-37/10147-2015-11-03-04-52-35?showall=&limitstart=
  4. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/23-2015-02-10-05-01-37/10147-2015-11-03-04-52-35?showall=&start=1
  5. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/23-2015-02-10-05-01-37/10147-2015-11-03-04-52-35?showall=&limitstart=
  6. ^ "Breast Anatomy: Overview, Vascular Anatomy and Innervation of the Breast, Breast Parenchyma and Support Structures". reference.medscape.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-24 रोजी पाहिले.
  7. ^ Wolchover, Natalie; Pappas, Stephanie. "New Theory on Why Men Love Breasts". Livescience (English भाषेत). 7 ऑगस्ट 2018 रोजी पाहिले. This article was first published on Sept. 26, 2012; it was updated to include more research and information on theories behind men's love of breasts.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ Levin, Roy; Meston, Cindy. "Nipple/Breast stimulation and sexual arousal in young men and women" (Abstract). The Journal of Sexual Medicine (English भाषेत). pp. 450–454. doi:10.1111/j.1743-6109.2006.00230.x. 7 ऑगस्ट 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ Pape Møller, Anders; Soler, Manuel; Thornhill, Randy. "Breast asymmetry, sexual selection, and human reproductive success" (Abstract). Science Direct (English भाषेत). pp. 207–219. doi:10.1016/0162-3095(95)00002-3. 7 ऑगस्ट 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)