लडाखी गाय
लडाखी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः अति उंच आणि रुक्ष डोंगराळ प्रदेशात, जिथे पाण्याचा मुख्य स्रोत डोंगरावरील हिवाळ्यातील बर्फवृष्टी आहे अशा ठिकाणी आढळतो. ही गुरे मूळची जम्मू आणि काश्मीर जवळील लेह आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील आहेत. हा गोवंश लेह, लडाख आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला वंशपरंपरागत रित्या आढळतो. लडाखी गुरे हे एक असे अद्वितीय अनुवांशिक उदाहरण आहे ज्यांचे उच्च आणि कठीण वातावरणीय परिस्थितीशी उत्कृष्ट अनुकूलन होते.[१]
हिमालयाच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते. वर्षातील जास्तीत जास्त महिने हा भाग देशाच्या इतर भागांपासून अक्षरशः तुटलेला असतो. येथे उन्हाळा तसा लहान परंतु पिके घेण्यास पुरेसा असतो. येथे वनस्पतींच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरीसुद्धा, हा गोवंश अत्यंत थंड हवामान आणि हायपोक्सिक (ऑक्सिजनचा पुरवठा कमी) परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतो.
इतर मूळ जातींप्रमाणे ही जात रोग प्रतिकारशक्ती आणि कमी इनपुट सिस्टमवर भरभराट करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते.
या गुरांचे दूध, मशागत आणि खताच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात (संख्येने) संगोपन केले जाते. ही गाय ए २ दुधाचा एक उत्तम स्रोत आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान, निकृष्ट दर्जाचे खाद्य आणि पाण्याची कमी उपलब्धता असूनही, ते दररोज सुमारे २ ते ५ किलो दूध तयार देतात.
या जातीचे दूध स्थानिक लोकांसाठी, विशेषतः हाडे गोठवणाऱ्या हिवाळ्यात एक महत्त्वाचा प्रथिनांचा स्रोत म्हणून काम करते. दुधात चरबीची टक्केवारी जास्त असल्याने, ते लोणी आणि चुरपी तयार करण्यासाठी वापरले जाते; जो स्थानिक पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
वैशिष्ट्ये
संपादन- ही लहान, लहान आकाराची आणि लहान-लहान अंग असलेली गुरे आहेत.
- ते बहुतेक काळ्या रंगाचे गुरे आहेत, परंतु तपकिरी रंगाचे देखील दिसतात.
- शिंगे किंचित वक्र, वर आणि पुढे, टोकदार टिपांसह समाप्त होतात.
- कपाळ सरळ, लहान आणि केसाळ आहे आणि थोडा लांब चेहरा आहे.
- कासेचा आकार लहान आणि वाटीच्या आकाराचा असतो.
- नर आणि मादी दोघांच्या शरीराची लांबी सरासरी ८८ ते ८९ सें.मी.
- नर आणि मादी दोघांची उंची सरासरी ९३ सें.मी.
- नर आणि मादी दोघांच्या छातीचा घेर सरासरी ११७ ते ११९ सेमी दरम्यान असतो.
- बाळंतपणाचा कालावधी सरासरी ३५० दिवसांचा असतो.
- पहिल्या बछड्याचे वय सरासरी ४८ महिने असते.
- दुधाचे फॅट सरासरी ४.६ % आणि दररोजचे दूध उत्पादन १.५ ते ५ किलो प्रतिदिन असते.[१][२]
'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[३]
भारतीय गायीच्या इतर जाती
संपादनभारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Ladakhi" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
- पशुपालन से कमाई करना है तो इन बातों का रखें हमेशा ध्यान