रुक्मिणीस्वयंवर' हा एकनाथांचा पहिला आख्यानपर ग्रंथ होय. त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी वाराणसी येथे इ.स. १५७१ च्या राम नवमीस पूर्ण केला. त्यात एकूण १८ अध्यायात १७१२ ओव्यांची रचना केली आहे. एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ कथानकाला आध्यात्मिक रूप दिले आहे. नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत नि‍र्माण झाली. ग्रंथाला लोकमानसातही स्थान मिळाले. आजही विवाहोच्छुक तरुणी ग्रंथाचे पारायण करतात. ग्रंथात गृहप्रवेशाचा विधी आलेला आहे त्या प्रसंगी वधूवरांना भाणवसासी(भांड्यांच्या उतरंड लावण्याच्या जागेपाशी) बसविले जाते. या विधीद्वारे वधूला उपदेश केला जातो. उपदेश करताना रेवती म्हणजे बलरामाची पत्नी रुक्मिणीला म्हणजे नुकत्याच झालेल्या आपल्या जावेला भानवसा -संसारात भान राखण्याचा वसा देते. ती रुक्मिणीला पत्नीची कर्तव्ये कोणती व रीतीभाती कोणत्या ते सांगते. आपण प्रसन्नचित्त राहिले पाहिजे, घरातील जळमटे-खरकटे बाहेर टाकली पाहिजेत, कामक्रोधरूपी उंदीर घर पोखरतात, त्यांच्या येण्याच्या वाटा लिंपल्या पाहिजेत, कस्पटे(मनातील पूर्वग्रह)चाळून पाखडून टाकावीत-म्हणजे पोळ्या कशा चोखट(उत्तम) होतात वगैरे समजावून सांगितले आहे. संसारात कसे वागावे-कशाकशाचे भान राखावे याचा रेवतीने केलेला उपदेश वाचला की उपवर कन्येने हे वाचण्याचा जो संकेत होता त्यामागील संस्कार समजून येतो []. आजपर्यंत अनेक कवींनी रुक्मिणी स्वयंवराची आख्याने लिहिली आहेत परंतु संत एकनाथ महाराजांच्या लिखाणाची सर कोणासही नाही असे अभ्यासक मानतात.

रुक्मिणीस्वयंवर
लेखक एकनाथ
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ग्रंथ

नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर याच नावाचा एक अपुरा राहिलेला काव्यग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ अर्थात एकनाथांच्या काव्यग्रंथाहून वेगळा आहे. कवि सामराजानेसुद्धा रुक्मिणीस्वयंवर नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम विनायक लक्ष्मण भावे यांनी प्रकाशात आणले. सखारामतनय(सखारामसुत) नावाच्या एका कवीनेही आर्याबद्ध रुक्मिणीस्वयंवर लिहिले आहे. रुक्मिणीच्या त्या गाजलेल्या स्वयंवराने अनेक कवींना त्या घटनेवर काव्ये करावीशी वाटली, त्यात आश्चर्य नाही. अशी काव्ये करणारे आणखीही कवी असावेत.

महानुभाव पंथात दाखल झालेल्या नरेंद्र कवीचा हा नऊशे ओव्यांचा अपुरा ग्रंथ महानुभावांनी सांकेतिक लिपीबद्ध केला. हा रुक्मिणीस्वयंवर नामक ग्रंथ, पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. कोलते, प्रा. सुरेश डोळके आदींनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला. महानुभाव पंथाने पवित्र मानलेल्या सात ग्रंथांपैकी नरेंद्र कवीचा हा ग्रंथ आहे.

रुक्मिणीस्वयंवराची मूळ कथा व्यासांनी रचलेल्या महाभारतात आहे. त्यांनी नंतर ती भागवतात आणून फुलवली. पद्मपुराणातही ती आली. आद्य पुराणिक शुकमुनींनी भागवताचे गायन करताना ती कथा जनमानसात नेली. आणि त्याच कथेवर नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर हे रसाळ काव्य रचले.

या आद्य मराठी महाकाव्यावर डॉ.वि.भि. कोलते, डॉ.रा.चिं. ढेरे, डॉ..द.भि. कुलकर्णी आदींनी समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत. कवयित्री आणि लेखिका डॉ.सुहासिनी नेर्लेकर यांनी ’नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य’ हे पुस्तक लिहून या रुक्मिणीस्वयंवर काव्याचे रसग्रहण केले आहे(पद्मगंधा प्रकाशन). आनंद साधले यांनी या काव्याचे गद्य मराठीत केलेले भाषांतर व्हीनस प्रकाशनाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.

रुक्मिणीस्वयंवराची नृत्यनाटिका

संपादन

नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या रुक्मिणीस्वयंवर नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.

सुस्वरूप, गुणवान आणि पराक्रमी श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून त्याच्यावर प्रेम करणारी विदर्भराजकन्या रुक्मिणी, बहिणीचे लग्न चेदीराज शिशुपालाशीच व्हावे या आग्रहाखातर आकाडतांडव करणारा कृष्णद्वेषी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, अंबामाता मंदिरातून रुक्मिणीचे अपहरण करणारा आणि रुक्मीला धूळ चारणारा श्रीकृष्ण या प्रमुख पात्रांच्या नृत्याविष्कारातून पुराणातले स्वयंवर कनक रेळे यांनी या प्रयोगाद्वारे प्रेक्षकांच्या डोळयासमोर हुबेहूब उभे केले होते.

श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली, विरहव्याकूळ आणि पळून जाण्याशिवाय काहीच मार्ग नसल्याचा संदेश, खलित्याद्वारे श्रीकृष्णाला (त्या काळात) धाडणाऱ्या भीष्मकाचीच (नृत्यांगना कल्याणी खातूची) अदाकारी लाजवाब होती. श्रीकृष्णासह इतर कलावंतांचा अभिनयही छान होता, तरीही मुद्राभिनयात रुक्मीनेच बाजी मारली होती. कृष्णाला पाण्यात पाहणाऱ्या पराक्रमी रुक्मीचा युद्धात मात्र टिकाव लागत नाही. अहंकाराचा मेरू ढासळून जातो; कृष्णाने विदूप केलेला चेहरा आणि त्यात पराभवाने पदरी आलेली नामुष्की यांनी हतबल झालेल्या रुक्मीची देहबोली नर्तक वैभव आरेकरांनी अप्रतिम साकारली होती. या नाटिकेतील खलनायक रुक्मी-शिशुपाल आणि कृष्णबंधू बलराम अगदी मांड्या थोपटून लढाई करतात. दणादणा उड्या मारतात, किंचाळतात. त्या वेळी प्रेक्षकांनी खूप टाळ्या वाजवल्या होत्या. त्यामुळे मध्यांतरानंतरच्या प्रयोगाने, अशा मारामाऱ्या आवडणाऱ्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.

कथ्थक, केरळातील मोहिनीअट्टम आणि तामिळनाडूचे भरतनाट्यम, यांशिवाय रास गरबा या नृत्यशैली, प्रसंगाच्या मागणीनुसार नृत्यनाटिकेत योग्य ठिकाणी पेरण्यात आल्या होत्या. दक्षिणी भारतीय संगीत आणि मराठी संतवाङ्मयाच्या समसमा संयोगाने या स्वयंवरनाटिकेचा योग्य परिणाम कनक रेळे यांनी साधला होता. एकनाथांच्या ओवीतला भावार्थ नाटिकेत योग्यपद्धतीने उतरण्यासाठी गायक मराठीच असावेत असा त्यांचा आग्रह होता. नृत्यनाटिकेला सुरेश वाडकर, रवींद साठे, वैजयंती लिमये यांचे पार्श्वगायन आणि नारायण मणी यांचे संगीत दिग्दर्शन होते. सशक्त कथा, उत्तम प्रकाश योजना, वेशभूषा, आभूषणे यांचा योग्य ताळमेळ साधल्याने रुक्मिणी स्वयंवराचा हा थाटमाट रंगमंचावर पाहण्यासारखा होता. अत्यन्त सहितिक् आसे हे सहित्य आहे

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "संत एकनाथ.ऑर्ग - वाङ्‍मयाविषयी". 2013-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-11-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन