विनायक लक्ष्मण भावे

लेखक

विनायक लक्ष्मण भावे (जन्म : पळस्पे (कोंकण), ६ नोव्हेंबर १८७१; - पुणे, १२ सप्टेंबर १९२६]]) हे मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.

विनायक लक्ष्मण भावे
विनायक लक्ष्मण भावे
जन्म ६ नोव्हेंबर १८७१
पळस्पे
मृत्यू १२ सप्टेंबर १९२६
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी

त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली.

इ.स. १८८७ मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, १ जून १८९३ रोजी ठाणे शहरातल्या या ग्रंथालयाची निर्मिती केली. १८९५ मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌.सी. झाले, नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.

इ.स. १८९८ पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.

वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७ साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या अफजलखानाच्या पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला. त्यांनी ‘विद्यमान’ नावाचे मासिकही काढले होते.

महाराष्ट्र सारस्वत हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. नेपोलियनचे चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.

सारस्वतकार वि.ल. भावे यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
  • अज्ञानदासाचा अफजलखान वधावरचा पोवाडा (१९२४ मध्ये संपादित)
  • चक्रवर्ती नेपोलियन (चरित्र-१९२१-२२)
  • तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ला, १९१९; भाग २रा, १९२०)
  • दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
  • नागेश कविंचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
  • महानुभावीय महाराष्ट्र ग्रंथावली-कविकाव्यसूची (१९२४)
  • महाराष्ट्र सारस्वत
  • वच्छाहरण (महानुभावीय काव्य, संपादन १९२४)
  • शिशुपालवध (महानुभावीय काव्य, संपादन १९२६)
  • भावे, विनायक लक्ष्मण (१९१७). मराठी दफ्तर, रुमाल पहिला, लेखांक १ - श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (शेवगावकर बखर). ठाणे: विनायक लक्ष्मण भावे.
  • भावे, विनायक लक्ष्मण (१९२२). मराठी दफ्तर, रुमाल दुसरा , लेखांक १ ते ४. ठाणे: विनायक लक्ष्मण भावे.
  • श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम (५३पृष्ठांचा निबंध)
  • सामराजाचे रुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)

बाह्य दुवे

संपादन