रामशास्त्री प्रभुणे

(रामशास्त्री प्रभूणे या पानावरून पुनर्निर्देशित)

राम विश्वनाथ प्रभुणे तथा रामशास्त्री प्रभुणे (जन्म :माहुली-महाराष्ट्र, इ.स. १७१८; - [[माहुली[[, मृत्युदिन अज्ञात) हे १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी रघुनाथराव पेशवे तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यास जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली होती.

बालपण संपादन

राम बालपणी अतिशय उनाड, दांडगे होता आणि सतत मारामाऱ्या करीत फिरत. आईवडील लहानपणीच वारले असल्याचे रामशास्त्रींचा सांभाळ त्यांचे चुलते विनायकभट यांनी केला. पण त्याचे शिक्षणात काही मन लागेना आणि दुर्गुंण वाढतच चालले हे पाहून विनायकभटांनी त्यांनी घरातून हाकलून दिले. पंधरा वर्षाचे राम साताऱ्याला अनगळ सावकाराकडे ब्राह्मणगडी म्हणून कामाला लागले. ते दिवसभर पाणक्याचे आणि आचाऱ्याच्या हाताखाली काम करीत. मालकांच्या पायांवर घागरीने पाणी ओतत असताना रामचे लक्ष सावकारांच्या भिकबाळीकडे गेले, आणि पाण्याची धार चुकली. रामला सावकाराची बोलणी खावी लागली. विद्वत्तेचे लक्षण असलेली अशी भिकबाळी आपल्याला कधीना कधी कानात घालायला मिळावी अशी आस रामच्या मनी निर्माण झाली.

एकदा अनगळ सावकाराने एका श्रावण महिन्यात रामशास्त्रींना इतर ब्राह्मण शागिर्दांबरोबर देकार घेण्यासाठी पुण्याला पाठविले. नाइलाजाने ते तेथे गेले आणि पेशव्यांसमोर उभे राहिले. पण त्या सत्यवचनी मुलाला ती दक्षिणा घेववेना. कुठलीच विद्यायेत नसलेल्या ब्राह्मणाने दक्षिणा स्वीकारणे पाप आहे. ती दक्षिणा मी घेणार नाही, असे सांगून रामशास्त्री तेथून बाहेर पडले. पेशव्यांच्या दक्षिणेला नकार देणारा हा ब्राह्मण मुलगा पेशव्यांच्या नजरेत भरला. साताऱ्याला परतल्यावर अनगळ सावकारांनी त्याची खरडपट्टी काढली. या अपमानाचे रामशास्त्रींना अतिशय दुःख झाले, आणि शिक्षणासाठी आपल्याला काशीला पाठवावे असा हट्ट त्यांनी सावकाराकडे धरला. अनगळ सावकारांनी स्वखर्चाने रामला काशीला पाठविले. तेथे वयाच्या विसाव्या वर्षी रामने अध्ययनाला सुरुवात केली.

पुण्याला परत संपादन

इ.स. १७५० मध्ये, म्हणजे वयाच्या अडतिसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून महापंडित रामशास्त्री प्रभुणे अशी प्रतिष्ठा संपादन करून राम पुण्यास आले. लगेचच नानासाहेब पेशवे यांनी त्यांची पांडित्य परीक्षा घेतली आणि ते पेशव्यांच्या शास्त्रीमंडळीत दाखल झाले. रामशास्त्रींच्या स्वभावातील न्यायाधीशाला आवश्यक ते अनेक गुण ओळखून नानासाहेबांनी त्यांना पुणे दरबारचे न्यायाधीश म्हणून नेमणूक दिली. रामशास्त्रींनी अनेक खटल्यांचे योग्य ते न्यायनिवाडे केले. नानासाहेबांनंतर आलेले माधवराव पेशवे रामशास्त्रींच्या न्यायदानावर प्रसन्‍न होते. माधवारावांनी त्यांना सरन्यायाधीश केले.

न्यायविषयक कारकीर्द आणि समाजकार्य संपादन

पेशवाईत सुरू असलेली वेठबिगारीची प्रथा रामशास्त्रींनी बंद करविली. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर रघुनाथराव पेशवे बळजबरीने करीत असलेल्या कारभाराला विटून रामशास्त्रींनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि ते माहुलीस परतले. सवाई माधवराव पेशवे यांच्या जन्मानंतर नाना फडणीस आणि सखारामबापू यांनी रामशास्त्रींना परत बोलावून सरन्यायाधीशपदावर बसविले. पण हेच सखारामबापू जेव्हा रघुनाथराव आणि इंग्रजांशी संधान बाधू लागले, तेव्हा बापूंचे वय आणि प्रतिष्ठा हे सर्व विसरून फितुरीबद्दल रामशास्त्रींनी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.

पुण्यात असताना रामशास्त्रींनी समाज सुधारणेचे काम हाती घेतले. सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांची विधवा कन्या बयाबाई हिला त्यांनी पुनर्विवाहाची परवानगी दिली, पण समाजाच्या दडपणाला घाबरून पटवर्धनांनी तिचा पुनर्विवाह केला नाही आणि बालविधवांना पुन्हा संसारसुख देण्याचे रामशास्त्रींचे प्रयत्‍न फसले. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला असे वाटल्यावर त्यांनी आपल्या पत्‍नीस त्यांच्या शवाबरोबर सती न जाण्याचा उपदेश केला, आणि सतीची माणुसकीविहीन प्रथा संपविण्याचा आपल्या परीने प्रयत्‍न केला.

रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील पुस्तके/चित्रपट संपादन

  • न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे (पुस्तक -रमाकांत देशपांडे)
  • न्यायमूर्ती (कादंबरी -पंडित गजानन वासुदेव वाईकर)
  • प्रभात फिल्म कंपनीचा ‘रामशास्त्री’ चित्रपट (प्रकाशनाची तारीख - ३० जून १९४४)
  • रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (सदाशिव आठवले)