रंकाळा तलाव
रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील तळे आहे.
यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. ते कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. पूर्वी येथे एक मोठी दगडांची खण होती. जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी ३६० जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली.इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
पुराण कथांनुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्रामदैवत काळभैरव म्हणजेच काळभैरवनाथ हे शेषाची कन्या जोगुबाई ( जोगेश्वरी ) हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते कोल्हापुरला अंबाबाईला भेटावयास आले . कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त अंबाबाईला माहित होता . जेव्हा अंबाबाई काळभैरवनाथाला भेटण्यास आली व तिला त्याच्या येण्याचा उद्देश् कळाला . अंबाबाईने त्याला घोडा आणावयास सांगितले व रिंगणात डाव करावयास सांगितले . घोड्याच्या टापांनी तिथे भला मोठा खड्डा तयार झाला . व या खड्यातून काळभैरवाने पाताळात जाऊन जोगुबाईशी विवाह केला . व पाताळातून परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला . व कालांतराने त्या खड्यात पाणी साचून पुढे त्याचे तळे निर्माण झाले .या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्यांच्या नावावरूनच या तलावास रंकाळा हे नाव पडले. शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलले.विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती व सूर्यास्त पाहण्यास लोकांची गर्दी असते.
गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सॅंडविच, भेळ, वडा, शीत पेये आदींची उपहारगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचे स्वरूपच असते. विविध ठिकाणांहून पर्यटक येथे भेट देण्यास येतात.
राज्य महामार्ग ११५ या तलावाच्या काठावरून गगनबावड्याकडे जातो.
रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा "मरीन ड्राईव्ह" असा केला जातो. रंकाळा तलाव शहराच्या नैर्ऋत्य टोकाला आहे. त्याचे क्षेत्र सुमारे २०२ हेक्टर असून खोली जवळजवळ ११ मीटर आहे. हल्ली तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाते. तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे.
तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. पूर्व बाजूला आणि थोड्याफार अंशी खुद्द तळयामध्ये एक संध्यामठ आहे. हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. मठाची वास्तू हल्ली सुस्थितीत नाही. पावसाळयामध्ये तलाव जेव्हा भरून वहातो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो. रंकाळयाजवळ पद्माराजे उद्यान आहे. एकेकाळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोट्याछोट्या नावांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या तलावामध्ये मासे पकडण्याचा हक्क फक्त राजांचा होता. आता तलावात विहार करण्यासाठी महानगरपालिकेने सोय केली आहे.
हल्ली या तळयाला उत्तरेकडे असलेल्या दोन ओढ्यांतून पाण्याचा पुरवठा होतो. १८८३ पासून रंकाळा तलावाच्या पाणीपुरवठ्यात बरीच सुधारणा झाली. शहराच्या दिशेने जो जुना बंधारा होता त्यापेक्षाही अधिक मजबूत बंधारा नव्याने बांधण्यात आला. हा बंधारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. परंतु त्याला लागून असलेल्या रस्त्यावर वारंवार भर टाकली गेल्यामुळे बंधाऱ्याची उंची तुलनेने कमी झाल्यासारखी वाटते. रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतीपैंकी एक असून तेथे वर नमूद केलेला संध्यामठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे. कोल्हापुराशी संबंध नसलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते. या भागाला पूर्वी नवा बुधवार असे नाव होते. शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापुरात समाविष्ट झाला.
प्रदूषण
संपादनरंकाळ्यातील संध्यामठ परिसरात मार्च महिन्यापासून पाणी कमी होत जाते. याच ठिकाणी काठावर एप्रिल २०१७ मध्ये मोठया प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला. संध्यामठ परिसरातील रंकाळयाचा काठ अशा मृत माशांमुळे पांढरा शुभ्र होतो. हजारो मासे काठावर मरून पडतात, तसेच संध्यामठ पासून रंकाळा टॉवरपर्यंत मृत मासे पाण्यावर तरंगत असतात.[ संदर्भ हवा ]
रंकाळा हा कोल्हापूर शहराला लाभलेला सगळ्यात सुंदर असा हिरा आहे. अतिक्रमण व वाढत्या लोकसंख्येने तलावाचे पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यातील जलचर, वनस्पती सुद्धा आपोआप नष्ट होत आहेत.[ संदर्भ हवा ]
काही मानवी हस्ताक्षेपामुळे रंकाल्याचे पाणी दूषित होत चालले आहे. (Ref: www.kolhapurphoto.com Archived 2013-06-03 at the Wayback Machine.)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |