मुस्लिम मराठी साहित्य परिषद
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तेराव्या आणि चौदाव्या शतकापासूनच मुस्लिम-मराठी संतांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे अनेक पुरावे आढळतात. त्यांनी मराठी प्रांतातच ‘दखनी’तूनदेखील मोठ्या प्रमाणावर लिखाण केले. पेशव्यांच्या काळात शाहिरी, काव्य आणि वेदिक काव्य निर्मिती केली. जवळजवळ ५० मुस्लिम-मराठी संत, कवी होऊन गेले आहेत. अनेक ‘रियासतकार’ झाले. डझनांनी मोजता येईल एवढे शाहीर घेऊन गेले. विशेष म्हणजे मराठीतून लिहणे ही केवळ मध्ययुगातील किंवा अठराव्या शतकातील मराठी मुस्लिम साहित्यकारांची कामगिरी नव्हती. कारण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात मुस्लिम-मराठी साहित्य लिहिले जात होते.
१९३६ सालापासून सांगलीचे सय्यद अमीन यांनी ‘मुस्लिम मराठी साहित्य’ हा शब्द प्रयोग केला होता. कोकण विभागातील डझनावारी मुस्लिम लेखकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके लिहिली आहेत. महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ग्रामीण भागांतून मराठीतून भक्तिगीते, ओव्या आणि अभंग लिहिणारे ४९ मुस्लिम मराठी कवी होऊन गेले होते. कोकणात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी मुसलमान मराठीतून लिहीत होते. कॅप्टन फकीर महंमद जुळवे, हुसेनमियॉं माहिमकर, अबू काझी, परवेज नाईकवडे, बशीर सावकारपासून ते कवी खावर, अजीज हसन, मुक्री इत्यादींचे लिखाण प्रकाशित होते.
सन १९८०नंतर हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. मुस्लिमांचे प्रश्न कठीण होऊ लागले होते. शाहबानो प्रकरणात मुस्लिम धर्मगुरूंचे वागणे-बोलणे चुकीचे होत चालले होते. परिणामी सर्वसामान्य मुसलमान जास्त अडचणीत आला होता. संघ परिवाराने राम जन्मभूमीचे राजकारण हाती घेतले. १९८०नंतर वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना यांनी राजकीय स्वार्थासाठी सर्वसामान्य मुसलमानांविरुद्ध अतिरेकी प्रचार केला. वातावरण पेटविले आणि सातत्याने दंगली घडविल्या.
बाबरच्या नावाने येथील भारतीय वंशाच्या, वंश, सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय मातीचा असलेल्या मुस्लिमांचे शत्रूकरण सुरू झाले होते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य असणाऱ्या अशरफ वर्गाच्या उलेमा, इमाम बुखारी, जमियत उल-उलेमा, देवबंद मधील उलेमा यांनी कर्मठ, शब्दवादी धर्माचे चष्मे लावले असल्याने संघाची ही रणनीती कळतच नव्हती. काय करावे, हा प्रश्न होता. मुस्लिमांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा वेळी मुस्लिमांची खरी ओळख पटवून ती अधोरेखित करणे गरजे झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत १९८५-८६पासून प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, अजीज नदाफ, इक्बाल मिन्ने, ए. के. शेख,मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार यासारख्या लेखकांनी सामाजाची दाहक व्यथा शब्दबद्ध केली आणि त्यातूनच मुस्लिम मराठी साहित्याची ही चळवळ उभी राहिली.[३]
एकोणीसशे नव्वद साली दलित साहित्याने सामाजिक बदलांचे वारे निर्माण केले होते, मुस्लिमांनीदेखील अशा प्रकारे साहित्यातून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करावा, असा विचार पुढे येत होता. त्यातून मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची संकल्पना पुढे आली. 1989 साली प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे,डॉ. अजीज नदाफ, डॉ इक्बाल मिन्ने, ए.के.शेख ,कवी मुबारक शेख, ‘कासिद’चे संपादक लतीफ नल्लामंदू यांनी केली. अध्यक्ष - ए.के.शेख, फकरूद्दीन बेन्नूर- कार्यकारी अध्यक्ष, डॉ इक्बाल मिन्ने, प्रा. मीर इसहाक शेख-उपाध्यक्ष, डॉ. अजीज नदाफ-महासचिव, शाहीर फाटे-सदस्य, लतीफ नल्लामंदू-खजिनदार, मुबारक शेख, प्रा. आय. जी. शेख सदस्य हे सुरुवातीची परिषदेची कार्यकारिणी होती.[४]
नंतरच्या काळात मुस्लिम साहित्य परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘मुस्लिम मराठी साहित्याच्या मुळ्यांचा (Roots) शोध लागला. नवनवे मुस्लिम तरुण लिहू लागले. संमेलनामधून समाजाच्या वेवेगळ्या समस्यावर विचारमंथन होऊ लागले. त्यातूनच सुफी संताच्या कार्याची ओळख झाली. वेगवेगळे ग्रंथ लिहिले जाऊ लागले. (मुस्लिम मराठी साहित्यः परंपरा, स्वरूप आणि लेखकसूची- संपादन फ.म. शहाजिंदे- 2013) मुस्लिम मराठी साहित्य परिषदेमुळे मराठी मुसलमानांचे अस्तित्त्व अधोरेखित झाले. अनेक मुस्लिम मराठी संतांचे मराठी साहित्य प्रकाशात आले. आमच्या साहित्य परिषदेने फक्त इस्लामवर लिहिलेले नाही, धर्मावर लिहिण्याचे उदिष्ट नव्हते. तो कुरआन आणि हदीसवर आदर्शावर आधारलेला आहे. महाराष्ट्रातील मुसलमानांचे नैसर्गिक अस्तित्त्व, त्यांचे जगणे, त्यांच्या बोली भाषा, त्यांच्यातील जाती, त्यांचे आर्थिक, सामाजिक प्रश्न, दंगली, स्त्रियांचे प्रश्न हे मराठी सारस्वतासमोर मांडणे हे होते. महाराष्ट्रातला मराठी मुसलमान कोण आहे, काय आहे हे सांगणे आवश्यक होते. आजपर्यंत तब्बल 500 पेक्षा जास्त मुस्लिम लेखकांनी मराठीत लेखन प्रक्रिया चालवली आहे.
- “सांप्रदायिकतेपासून मुक्त, दाहक अनुभवांनी होरपळणाऱ्या समाजाशी समरस आणि आक्रोशी भाषणाबाजीपेक्षा शांत संयत आविष्कारावर भर देणारे लेखन म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय” –भा. ल. भोळे
- “मुस्लिम म्हणून मराठी प्रदेशात जगत असताना आणि त्याचप्रमाणे धर्माने निर्माण केलेले मुस्लिमपण आणि इथल्या सामाजिक वास्तवातून परंपरेने चालत आलेले भारतीय समाजातील गुणविषेश या दोन्हीमुळे इथल्या संवेदनक्षम लेखकांच्या मनात ज्या जाणीवा निर्माण होतात जो संघर्ष उभा राहतो, त्याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय” – प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
- “मुस्लिमांच्या जीवनातील सुख-दुख व समस्यांचे चित्रण मुस्लिम मराठी साहित्यिकांनी उभे केले पाहिजे. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, जैन साहित्य, मुस्लिम साहित्य, हे साहित्यातील विविध प्रवाह आहेत.” -यू. म. पठाण
- “सर्वांगिण असे मुस्लिम समाजजीवनाचे जिवंत चित्रण मुस्लिम मानसिकतेसह ज्या लेखनात वास्तवाच्या पातळीवर आढळते, ते ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय” -फ. म. शहाजिंदे
- “मुस्लिम मराठी साहित्य म्हणजे मुस्लिमांतील धर्मंतरित शुद्र-अतिशूद्रांचे व्यवस्थेद्वारा होणाऱ्या सर्वांगीण शोषणाच्या विरोधातील विद्रोह होय, ज्यात समता पायाभूत असून, माणूस केंद्रस्थानी आहे” - प्रा. जावेद कुरैशी
- “मराठी लिहिणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि जाणीव असणाऱ्या मुस्लिमांनी साहित्यासारखे प्रभावी साहित्य निर्माण करणे म्हणजे ‘मुस्लिम मराठी साहित्य’ होय” -प्रा. जेमिनी कडू
मुस्लिम मराठी साहित्य संमेलने
संपादन- पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन (24-25 मार्च1990) अध्यक्ष- प्रा फ. म. शहाजिंदे
- दुसरे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूर, (1992) अध्यक्ष- डॉ. अजीज नदाफ
- तिसरे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, रत्नागिरी, 5-6 फेब्रुवारी 1994 अध्यक्ष- ए. के. शेख
- चौथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे, (1995) अध्यक्ष- प्रा फकरुद्दीन बेन्नूर
- पाचवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, मुंबई, अध्यक्ष- डॉ जुल्फी शेख
- सहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, नाशिक, (2000) अध्यक्ष- खलील मोमीन
- सातवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, कोल्हापूर (2002), अध्यक्ष : बशीर मुजावर
मुस्लिम मराठी लेखक व कवी
संपादनडॉ. यू. म. पठाण, (औरंगाबाद) प्रा फकरुद्दीन बेन्नूर, (सोलापूर) प्रा. फ. म. शहाजिंदे, (लातूर) डॉ. अजीज नदाफ, (सोलापूर) डॉ. बशारद अहमद, (उस्मानाबाद) नसीमा पठाण, कवी खावर बदिउज्मा, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, (बीड) प्रा. जावेद कुरेशी, (नागपूर) इब्राहीम खान, मुबारक शेख, बाबा महंमद अत्तार, (कोल्हापूर) अलीम वकील(नाशिक) बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी), एहतेशाम देशमुख (जळगांव) एतबार खान पठाण, अंमळनेर, मिर्झा अढकली, महंमद दळवी, सलीम शेख, रफिक शेख, अशरफी शिकलगार, अमन तांबोळी, हिदायत खान, अम्मान मोमीन, खलील मोमीन, बशीर मुजावर, इलाही जमादार, आय. बी. मिन्ने, ए. के. शेख, जहीर शेख, के. टी. काझी, प्रा. शकील शेख, अब्दुल कादर मुकादम, हमीद दलवाई, बशीर मोमीन (कवठेकर),अनवर राजन, डी.के. शेख, श्रीमती आशा शेख, श्रीमती तमण्णा इनामदार, प्रा. डॉ. तसनीम पटेल, निझाम शेख गवंडगावकर, शेख हसीना बानू, जहीर अली, शमसुद्बीन तांबोळी, सरफराज अहमद (सोलापूर), हबीब भंडारे, प्रा. ताहेर पठाण, (जालना) युसूूफ बेन्नूर (औरंगाबाद) जब्बार पटेल, शफी बोल्डेकर, प्रा. शेख अब्दुल सत्तार (माजलगाव), अमर हबीब (अंबाजोगाई), शहाजहान मगदूम, नौशाद उस्मान, कलीम अजीम (पुणे), साहील कबीर (कुरुंदवाड), समीर दिलावर (पुणे), साजिद इनामदार (दिल्ली) आदी..
मुस्लिम मराठी साहित्याकडे अभ्यासकांचे दुर्लक्ष
संपादनमुुुुस्लिम मराठी लेखकांनी मराठीत लिहायला सुरुवात करून 300 वर्षांपेक्षा जास्त कालखंड लोटला आहे. तरी परंतु मराठी सारस्वतातील लेखकांना आणि समीक्षकांना आणि साहित्याचा इतिहास लिहिणाऱ्या मराठीच्या अभ्यासकांना मुस्लिम मराठी साहित्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. मुख्य प्रवाहातील साहित्य चर्चेत देखील मुस्लिम मराठी साहित्यासंबंधी चर्चा होत नाही. तिथे मराठी साहित्यातील विविध ‘वादावर’ आणि ‘सिद्धांतावर’ चर्चा होते. संमेलनात दलित साहित्यांवर काहीशी चर्चा होते. परंतु दलितांपेक्षाही देखील जास्त उपेक्षित असणाऱ्या, मुस्लिम समाज जीवनासंबंधी असणाऱ्या, मुस्लिम मराठी साहित्याची दखल घेण्यात येत नाही. या तथाकथित अभ्यासकांना मुस्लिम मराठी साहित्यात पाश्चात्याकडून घेतले गेलेले साहित्यविषयक सिद्धांत “मुस्लिम मराठी साहित्यात आढळले तरी नसावेत किंवा त्यांनी ते कदाचित वाचले ही नसावे” मराठी साहित्यात वास्तवाचे चित्रण नाही, अशी टीका करणाऱ्यांना मुस्लिम मराठी साहित्य हे किती वास्तवांशी निगडित आहे हे माहीत नसावे.
प्रा. अ. ना. देशपांडे यांचा प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास भाग-३ हा ग्रंथ, रा. चिं. ढेरे यांचा ‘मुसलमान मराठी संत कवी’ हा परिचयात्मक ग्रंथ ही स्वतंत्रपणे केलेल्या लिखाणाची उदाहरणे ठरतील. महाराष्ट्रात एकूण ५०पेक्षा जास्त मुस्लिम मराठी संतकवी होऊन गेले. तरी त्यावर नागपूरच्या डॉ. जुल्फी शेख यांचा अपवाद सोडला तर, त्यावर स्वतंत्रपणे लिहिले गेलेले नाही. विशेष म्हणजे मराठीच्या अभ्यासकाने, मुस्लिम मराठी साहित्य म्हणजे केवळ पंधराव्या शतकानंतर मुस्लिम संत कवींनी लिहिलेले काव्य एवढेच गृहीत धरलेले दिसून येते. मुख्य प्रवाहातील मराठीच्या अभ्यासकांनी किंवा समीक्षकांनी आता तरी या मुस्लिम मराठी साहित्याकडे थोडेसे लक्ष द्यायला काही हरकत नसावी.
भारतात अनेक मुस्लिम बादशहांनी सत्ता केली. ते भारतातल्या जाती-जमातींतून उदयाला आलेले ते राज्यकर्ते नव्हते.त परकीय राज्यकर्ते होते. या परकीय सत्ताधाऱ्यांचा इतिहास हा येथील वंश-सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय असलेल्या मुसलमानांचा इतिहास कसा होऊ शकतो? तो इतिहास ब्रिटिश ख्रिस्ती साम्राज्यवादी इतिहासकारांनी आम्हाला चिटकविला आहे. महंमद बिन कासीम, बाबर, औरंगजेब यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ते वंश-सांस्कृतिकदृष्ट्या परकीय होते. त्यांचा इतिहास हा आमचा इतिहास नाही. हा आमच्या मानगुटीवर बसविला गेलेला इतिहास आता नाकारावा लागेल. त्यांचे समर्थन बंद करावे लागेल. हे एकविसाव्या शतकातील साहित्यिक-विचारवंत यांच्यापुढील आव्हान आहे.
भारतातल्या धर्मांतरित वंश-सांस्कृतिक मुसलमानांचा इतिहासच लिहिला गेलेला नाही. तसा प्रयत्न प्रा. जावेद कुरेशी, प्रा. शहाजिंदे, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी केला आहे. अलीकडच्या काळात सरफराज अहमद यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. महंमद बिन कासीमपासून ते औरंगजेबपर्यंतचा इतिहास अनेक खोट्या गोष्टींनी भरला आहे. ती वस्तुस्थिती आजच्या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी स्पष्ट करावी लागणार आहे. या बादशहांचा अराजकिय इतिहास मांडावा लागणार आहे, खान-पान, वास्तुसास्त्र, परिधान त्यांची सांस्कृतिक अधिष्ठाने अधोरेखित करावी लागणार आहे. तरच येथील मुस्लिमांना तथाकथित मुळाकडे (Roots) जाता येईल.
भारताची जीवनपद्धती संमिश्र नसून विविध धर्मातील संयुक्त प्रवाहांनी बनलेली आहे. महाराष्ट्राचे संत बाबा शेख महंमद वारकरी संप्रदायाचे भक्त होते. शाह मुंतोजी ब्राह्मणी एकाच वेळी मुसलमान आणि स्वामी सहजानंदांचे शिष्यत्व पत्करणारे आनंद संप्रदायी होते. ते वीरशैवी धर्माचे अभ्यासक होते. या सर्व संप्रदायात वावरून ज्ञान आत्मसात करून घेऊन ते मुसलमानच राहिले. त्यांच्या लिखाणावर इस्लाम आणि महाराष्ट्रातील हिंदू म्हणविणाऱ्या सर्व संप्रदायांचा प्रभाव आहेत. शहागडचे शहामुनींचे वैशिष्ट्य म्हणजे जसे आलमखान हे नागेश पंथीय झाले होते. तसे शहामुनी हे महानुभावी झाले होते. हा डॉ. इम्तियाज अहमद यांच्या शब्दात जगण्यातला इस्लाम होता. या संयुक्त प्रवाहात कोणत्या मुळाचा शोध घेणार? 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या ग्रामीण शैलीतील गीतांनी लोकप्रिय झालेले लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी अनेक देवी देवतांची भक्तिगीते लिहिले आहेत. मराठी मुस्लिम समाजाचे हेच खरे प्रतिबिंब आहे. परंतु ब्रिटिश वसाहतवादाने येथील संयुक्त प्रवाही संस्कृती नष्ट करून भारतातल्या ‘इंडीजिनस’ संस्कृती कनिष्ठ ठरविल्या आणि ब्राह्मणी विचारांचे मानक भारतीय संस्कृती म्हणून विकसित करायला मदत केली.[७] हाच मुद्दा पकडून ब्राह्मणी अभिजनांनी वेदांवर आधारित ब्राह्मणी संस्कृतीची पायाभरणी केली. ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ सोशॉलॉजीप्रमाणे संस्कृती हा शब्दप्रयोग कलेच्या योगदानासंबंधी केला जातो.[८]
संयुक्त जीवनपद्धतीचे घटक असणाऱ्या वंश-सांस्कृतिक मुसलमानांना तशा प्रकारचे सांस्कृतिक राजकारण करता येणार नाही. मुसलमानांनी सांस्कृतिक राजकारण करायचे म्हणजे काय करायचे? अरबी शब्दवादी इस्लाम आणि भारतातला सूफींनी विकसित केलेला धर्माधर्मांचे संयुक्त प्रवाह असणारा इस्लाम, यापैकी एक गृहीत धरावे लागेल. मुस्लिम मराठी साहित्यिकांना बंदिस्त धर्माच्या चौकटीबाहेर येऊन जमालुद्दीन अफगाणी यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातले इतर सांस्कृतिक प्रवाह आपले म्हणून स्वीकारावे लागतील.[९]
समस्या कठीण आहे परंतु या संस्कृतीच्या तिढ्याला हात घालावा लागेल. त्यासाठी भावनिक लेखनाच्या बाहेर यावे लागेल. सध्या मुस्लिमांच्या अनुययाच्या प्रचाराचा जो प्रकल्प राबविला जात आहे, त्याचा कथा, कादंबऱ्या, कविता, गझला यांमधून समाचार घ्यावा लागेल. मुख्य प्रवाही साहित्य संमेलनाचे अनुकरण काही उपयोगाचे नाही. तू मोठा की मी मोठा? तू आधी का मी आधी? हा प्रकार बालिश आहे. इतिहास आपल्या गतीने चालला आहे. तो नोंद घेतच असतो. मुसलमानांचे एकविसाव्या शतकातील असे समस्याप्रधान प्रश्न घेऊन उतरणे हाच पर्याय आहे.[१०]
संदर्भ
संपादन- ^ Mourya, dr. Kalpana (2017-06-02). "दलित चेतना एवं साहित्य". Anusanadhan: A Multidisciplinary International Journal (In Hindi). 2 (1): 25–38. doi:10.24321/2456.0510.201704. ISSN 2456-0510.
- ^ सिंह, बीरपाल (2018-03-25). "संस्कृत साहित्य में मानवाधिकार का स्वरूप". Scholarly Research Journal for Humanity Science & English Language. 6 (26). doi:10.21922/srjhsel.v6i26.11434. ISSN 2348-3083.
- ^ "Calendar 2018". Research World. 2018 (69): 58–60. 2018-03. doi:10.1002/rwm3.20652. ISSN 1567-3073.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Mourya, dr. Kalpana (2017-06-02). "दलित चेतना एवं साहित्य". Anusanadhan: A Multidisciplinary International Journal (In Hindi). 2 (1): 25–38. doi:10.24321/2456.0510.201704. ISSN 2456-0510.
- ^ Singh, Pradeep (2016-06-01). सामाजिक सरोकार बनाम गैर-सरकारी संगठन:एक विमर्श. MRI PUBLICATION PVT. LTD. pp. 67–102. ISBN 9788193139233.
- ^ "मुस्लिमांच्या आजच्या भयानक परिस्थितीला 'सो कॉल्ड' साहित्यिकही जबाबदार". www.aksharnama.com. 2018-05-23 रोजी पाहिले.
- ^ Mourya, Dr. Kalpana (2017-06-02). "नागार्जुन के काव्य के विविध आयाम". Anusanadhan: A Multidisciplinary International Journal (In Hindi). 2 (1): 16–24. doi:10.24321/2456.0510.201703. ISSN 2456-0510.
- ^ "Calendar 2018". Research World. 2018 (69): 58–60. 2018-03. doi:10.1002/rwm3.20652. ISSN 1567-3073.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "सद्य:स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यापुढील आव्हाने!". www.aksharnama.com. 2018-05-23 रोजी पाहिले.
- ^ "Calendar 2018". Research World. 2018 (69): 58–60. 2018-03. doi:10.1002/rwm3.20652. ISSN 1567-3073.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)