मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र (येरवडा, पुणे)

(मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)

स्थापना

संपादन

विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेची येरवडा, पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. याची स्थापना दि.२९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयातील एका वॉर्डमध्ये डॉ.अनिता अवचट व डॉ.अनिल अवचट यांनी केली. पु.ल.देशपांडे यांनी सुरुवातीची आर्थिक मदत दिली. मुक्तांगण हे नावही त्यांनीच सुचविले.

मुक्तांगणची उपचारपद्धती

संपादन

व्यसन हा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. हा गुंतागुंतीचा व जन्मभराचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्‍न आपण करू शकतो. ती ओढ निर्माण होण्याची कारणे समजल्यास त्यावर मात करून माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो.

मुक्तांगणच्या उपचार पद्धतीत पुढील काही पायऱ्या आहेत :

  1. केंद्रात दाखल झाल्यावर अंमली पदार्थ न मिळाल्याने जो त्रास होतो (विथ्ड्रॉल सिम्प्टम्स किंवा टर्की) तो कमी करण्यासाठी करावे लागणारे उपचार
  2. व्यसनी माणसाच्या पूर्वेतिहास जाणून घेणे व या अंमली पदार्थ सेवनाची सुरुवात कुठून व कशी झाली, ते वाढत कसे गेले, त्याचे त्याच्यावर व कुटुंबियांवर काय व कसे दुष्परिणाम झाले याविषयीची माहिती त्याच्याकडून व कुटुंबियांकडून गोळा करणे. ते वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्न कसे सोडवता येतील याचे अनेक पर्याय त्याच्यापुढे ठेवणे.
  3. व्यसन हा आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची जबाबदारी इतर कोणाची नसून आपलीच आहे, याची जाणीव व्यसनी माणसास उत्स्फूर्तपणे झाली तरच या सर्व उपचाराचा फायदा होतो. अशी जाणीव लवकरात लवकर, परिणामकारकरित्या निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरण मुक्तांगणमध्ये निर्माण केले आहे. इथे सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक उपक्रम चालू असतात. उदा. योग, ध्यान, खेळ, समूह उपचार, संगीत उपचार, मनोनाट्य, व्यवसाय शिक्षण, महिन्याचे हस्तलिखित मासिक, खेळांच्या स्पर्धा, व्यसनमुक्तीचे वाढदिवस, कुटुंबियांच्या सभा, अपत्यांच्या सभा, कलाकुसर वर्ग, निसर्गात जाऊन झाडे, पक्षी, प्राणीनिरीक्षण, फिल्म शो इ. या सर्वांचा रोख व्यसन या प्रश्नाशी असतो.
  4. व्यसन सुटल्यावर पोकळी निर्माण होते, ती उत्तमरितीने भरून काढण्यासाठी या विविध उपक्रमांचा फायदा होतो.
  5. पुनर्वसन - येथील वास्तव्याच्या शेवटच्या भागात त्याला झेपेल असा कार्यक्रम तयार केला जातो. पूर्वीची देणी मिटविणे, आपण केलेल्या जखमा भरून काढणे, गेलेले काम परत मिळविणे, मोडलेले लग्न परत जमवून आणणे इ. गोष्टींचा समावेश यात होतो.

‘मुक्तांगण’ मॉडेल

संपादन

भारत सरकारने ‘मुक्तांगण’ मॉडेलला स्वीकारून विस्तार करण्यासाठी मान्यता दिली. सन १९९९ मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरात या पाच राज्यांतील व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ‘मुक्तांगण’वर सोपवली. त्यातूनच ‘रीजनल रिसोर्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेंटर्स’ तयार झाली. आज पाच राज्यांमध्ये १००हून अधिक केंद्रे आहेत. एखाद्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल, तर मार्गदर्शक होईल असं ‘मिनिमम स्टॅण्डर्ड ऑफ केर’ नावाचं मॅन्युअल सरकारनं करायला सांगितलं. ते करण्यातही ‘मुक्तांगण’चा मोठा वाटा होता. भारतात जी ४००हून अधिक केंद्रे व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत, त्यांना ते वापरणं बंधनकारक आहे.

शाखा व विस्तार

संपादन

पुणे येथे जानेवारी २००७ला महिलांसाठीचं वेगळं व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले. महिलांसाठी स्वतंत्र असं हे भारतातलं पहिलं केंद्र आहे. पंजाबमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप वाढत असून तिथे एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. त्यामुळं तिथल्या ‘डॉर्स कॅटल’ या कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून फत्तेह फाऊंडेशन या स्थानिक संस्थेच्या मदतीने केंद्र सुरू झाले. पंजाबमध्येच इन्फोसिसच्या सहाय्याने ‘इन्फोसिस- मुक्तांगण डीअ‍ॅडिक्शन सेंटर’ची सुरुवात झाली आहे. हे केंद्र म्हणजे ‘मुक्तांगण’ची पहिली शाखा आहे.

बाह्य दुवे

संपादन
  1. संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-06-19 at the Wayback Machine.