माधुरी कानिटकर

भारतीय शिशुरोग तज्ञ

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेत्या डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला. []त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या.[]

६ जुलै २०२१ रोजी त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली. []लष्करातून ऑक्टोबर २०२१ मध्ये निवृत्त झाल्यावर त्या हा पदभार स्वीकारतील.

शिक्षण

संपादन

कानिटकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे घेतले. तर वैद्यकीय शिक्षणासाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला. त्यांना मनापासून ए.एफ.एम.सी. या लष्करात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तयार करणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे पुढे त्यांनी तिथे प्रवेश घेतला.एम.बी.बी.एस.च्या तिन्ही टप्प्यात पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. तसेच १९८२ मध्ये अभ्यास आणि शिक्षणेतर क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले.एम.डी.(शिशुरोग तज्ञ) ही पदवी त्यांनी मुंबईमधून घेतली. तर पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण ए.आय.आय.एम.एस., नवी दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी एम.बी.बी.एस., एम.डी.(शिशुरोग तज्ञ), डी.एन.बी.(शिशुरोग तज्ञ), फेलोशिप पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजी असे शिक्षण घेतले आहे.

योगदान

संपादन

लष्करात डॉक्टर म्हणून सामील झालेल्या अधिकारी स्त्रियांपैकी अनेक जणी लग्नानंतर ही नोकरी सोडतात. कायम नोकरी (पर्मंनंट कमिशन) घेणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे. आजही हे क्षेत्र पुरूषप्रधान क्षेत्र मानले जाते. मात्र डॉ.कानिटकर यांनी हॉस्पिटल नसलेल्या ठिकाणी तात्पुरत्या बराकीत राहूनसुद्धा सैनिकांना आरोग्यसेवा दिली. आसाम, अरुणाचल प्रदेश बरोबर दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांनी काम केले.
डॉ.कानिटकर भारतीय लष्करातील पहिल्या प्रशिक्षित पीडीयाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत.पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडांच्या विकारांवर उपचार करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथून त्यांनी या विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
ए.एफ.एम.सी. मध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. कानिटकर यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.

कौटुंबिक माहिती

संपादन

डॉ.कानिटकरांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर हेसुद्धा लष्करात अधिकारी होते. ते परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक विजेते आहेत.

पुरस्कार

संपादन
  • कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेले योगदान यासाठी डॉ.कानिटकरांना २०१४ साली विशिष्ट सेवा पदक मिळाले आहे.
  • २०१८ साली त्यांना अति विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर". Loksatta. 2020-03-02 रोजी पाहिले.
  2. ^ "The New Dean Takes Charge: We need more colleges like AFMC, says Major Gen Kanitkar". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-03-02 रोजी पाहिले.
  3. ^ "MUHS VC ले. ज. डॉ माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू". Maharashtra Times. 2021-07-10 रोजी पाहिले.