मांडूक्य उपनिषद हे छोट्या उपनिषदांपैकी एक असून त्याचे वर्गीकरण अथर्ववेदासोबत केले जाते.

मांडूक्य उपनिषद, मंत्र १-३, अथर्ववेद, संस्कृत, देवनागरी
ॐ ह्या अक्षराच्या अर्थाची व महत्त्वाची चर्चा करणाऱ्या अनेक उपनिषदांपैकी मांडूक्य हे एक आहे.

मुक्तिकोपनिषदात दिलेल्या १०८ उपनिषदांच्या यादीमध्ये या उपनिषदाचा क्रमांक सहावा आहे. हे गद्यात्मक असून यात एकूण १२ मंत्र आहेत. यापैकी काही मंत्रांचा संबंध ऋग्वेदाशीही जोडला जातो. हे उपनिषद् ओम्‌ (ॐ) या अक्षराची चर्चा करते, चेतनेच्या चार अवस्थांचा सिद्धांत मांडते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे प्रतिपादन करते.

मांडूक्य उपनिषदाचे खास वैशिष्ट्य असे की मुक्तिकोपनिषदातील श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील संवादानुसार मोक्षप्राप्तीसाठी हे एकच उपनिषद् पुरेसे आहे असे प्रभू श्रीरामांनी म्हटलेले आहे. मुक्तिकोपनिषदातील ११ मुख्य उपनिषदांमध्ये मांडूक्य उपनिषदाचा पहिला क्रमांक आहे. या उपनिषदावर गौडपादाचार्य यांच्या कारिका आहेत. हिंदू तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञान यांच्यामधील परस्परसंबंध दाखवण्यासाठी ज्या संहितांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांपैकी मांडूक्योपनिषद एक आहे.

व्युत्पत्तीसंपादन करा

मांडूक्य या या शब्दाची उत्पत्ती ‘मंडूक’ या शब्दापासून झाली असावी असे मानले जाते. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. बेडूक, घोड्याची एक विशिष्ट प्रजाती, घोड्याच्या खुरांचे तळ किंवा अध्यात्मिक तणाव असे याचे काही अर्थ होतात. काही लेखकांनी मांडूक्य उपनिषदाच्या नामाभिधानामागे बेडूक हा अर्थ असल्याचे सुचविलेले आहे.

‘मन’ याचा अर्थ हृदय किंवा मन आणि ‘डूक’ याचा दुःख याचा अर्थ तणाव किंवा दुःख निर्माण करणाऱ्या अडचणी. परमेश्वराबाबतचे आकलन चुकीचे असल्यास किंवा असे आकलनच नसल्यास दुःख किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, अशीही व्युत्पत्ती मांडली जाते.