धोंडो केशव कर्वे
धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे, (जन्म : १८ एप्रिल १८५८; - ९ नोव्हेंबर १९६२) यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. भारतामध्येच्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली. सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता काळाची पावले ओळखणारे असे हे समाजसुधारक होते. भारत सरकारने त्यांना १९५८ मध्ये त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
धोंडो केशव कर्वे | |
---|---|
धोंडो केशव कर्वे | |
टोपणनाव: | अण्णासाहेब |
जन्म: | १८ एप्रिल १८५८ शेरवली-मुरूड (कोकण) |
मृत्यू: | ९ नोव्हेंबर १९६२ हिंगणे आश्रम (पुणे) |
चळवळ: | स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा |
पुरस्कार: | भारतरत्न |
प्रमुख स्मारके: | हिंगणे पुणे |
वडील: | केशव बापूराव कर्वे |
आई: | लक्ष्मीबाई केशव कर्वे |
पत्नी: | राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे |
अपत्ये: | रघुनाथ ,भास्कर , दिनकर ,शंकर |
बालपण आणि तारुण्य
संपादनरत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
पुनर्विवाह
संपादनत्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाह साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.
कार्य
संपादनइ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या
पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचेच नाव पुढे '`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' (थोडक्यात, कर्वे शिक्षण संस्था) असे झाले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे झाले.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषतः महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाची स्थापना
संपादनत्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९१० मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.
आज २०१९ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.
चरित्रे
संपादन- महर्षी धोंडो केशव कर्वे (डॉ. नीला पांढरे)
- भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे (प्रा. शैलेश त्रिभुवन)
- महर्षी धोंडो केशव कर्वे (लेखक - विलास खोले)
नाटक
संपादनमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी 'हिमालयाची सावली' नावाचे नाटक लिहिले आहे.
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |