भास्कर लक्ष्मण भोळे

(भा.ल. भोळे या पानावरून पुनर्निर्देशित)

भास्कर लक्ष्मण भोळे (३० सप्टेंबर, इ.स. १९४२:तालखेड, बुलढाणा जिल्हा - २४ डिसेंबर, इ.स. २००९ ) हे महाराष्ट्रातील समाजसेवक होते.


शिक्षण

संपादन

भोळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय मध्ये झाले. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण- राज्यशास्त्र विभाग मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे घेतले. नागपूर विद्यापीठातून पीएच. डी. घेताना भारतीय शेतकरी कामगार पक्ष : एक अभ्यास-स्वातंत्र्य ते संयुक्‍त महाराष्ट्र हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षवाद, विवेकवाद आणि सामाजिक न्याय या तत्त्वांशी बांधिलकी स्वीकारून त्यानी सामाजिक कार्यात उडी घेतली. महाराष्ट्रातील सर्वच पुरोगामी चळवळी, संस्था, उपक्रम आणि व्यासपीठांशी त्यांचा जवळचा संबंध होता. लेखन व भाषणाची शक्ती ओळखून त्यांनी याचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी केला. जे लिहायचे, जे बोलायचे ते मराठीतूनच यावर त्यांचा नेहमी भर असायचा.पत्नी विजयाताई, मुलगा हिरणमय, मुलगी गौरी अप्ता परिवार आहे

अध्यापन कारकीर्द

संपादन
 • डॉ. भोळे यांनी १९६४ ते १९७० या काळात राज्यशास्त्र विभाग, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद, येथे पदवी पातळीपर्यंतचे अध्यापन केले.
 • ५ सप्टेंबर १९७०पासून सेवानिवृत्तीपर्यंत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग नागपूर विद्यापीठ येथे ते विभागप्रमुख होते.

सभासदत्व

संपादन
 • आजचा सुधारक, नागपूर
 • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ, नाशिक यांच्या अभ्यासक्रमनिर्मिती समित्या.
 • नागपूर विद्यापीठ अमृतमहोत्सव स्मरणिका १९९९
 • नागपूर विद्यापीठ पत्रिका (सामाजिक शास्त्रे) विद्यापीठ प्राधिकारिणी
 • नागपूर विद्यापीठ विधिसभा, नागपूर विद्यापीठ विद्वत्‌सभा, राज्यशास्त्र अभ्यासमंडळ, अध्यक्ष, नियुक्‍त विद्यापीठाच्या विविध निवड समित्या, चौकशी समित्या.
 • मराठी विश्‍वकोश मंडळ
 • मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ यांच्या निवड समित्या.
 • मुंबई विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांच्या संशोधन व मार्गदर्शक मान्यता समित्या.
 • बालभारती-इतिहास विषय समिती, नागरिकशास्त्र विषय समिती
 • महाराष्ट्र राज्य व दर्शनिका संपादन समिती.
 • महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ
 • विचार शलाका, लातूर
 • विद्यापीठ परिषद संपादक सल्लागार मंडळ.
 • समाज प्रबोधन पत्रिका, पुणे

भोळे यांच्या सामाजिक कार्यात महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळी, संस्था, उपक्रम आणि व्यासपीठे यांच्याशी त्यांनी जवळचा संबंध बांधला. लिहिण्या, बोलण्यातून मराठीचाच वापर करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्यावर मार्क्‍स, फुले, शिंदे, गांधी, आंबेडकर यांचा प्रभाव होता. त्यांनी मराठी समाज, साहित्य व संस्कृती यावर तसेच सामाजिक चळवळींविषयी चिकित्सक लेखन केले.

विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यशास्त्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. डॉ. भास्कर भोळे यांनी काही ग्रंथ लिहिले आहेत आणि या ग्रंथनिर्मितीचे कारण सांगताना त्यांनी म्हटले आहे की, राज्यशास्त्र विषयावर असंख्य संदर्भग्रंथ आहेत पण ते ९० टक्के विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कुचकामी आहेत; कारण बहुमोल व मूलगामी असूनही विद्यार्थ्यांच्या गरजा व क्षमता, मर्यादा व अवधि लक्षात घेऊन ते ग्रंथ लिहिलेले नाहीत. ही उणीव डॉ. भोळे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गंमत अशी की भोळे यांनी राज्यशास्त्रात स्वतःची अशी जी शब्दावली निर्माण केली ती स्वीकारताना बऱ्याच जणांनी आढेवेढे घेतले.

वाक्यरचना बोजड आणि शब्दसंग्रह उच्चारण्यासही कठीण, अशी या पाठय़पुस्तकांबद्दल अनेक प्राध्यापक हाकाटी पिटत असत पण डॉ. भोळे यांचा आग्रह एवढा की, पुस्तक खपले नाही तरी चालेल पण ‘शब्दावली’शी तडजोड नाही. प्रकाशकांनाही ते ठणकावून सांगायचे की, शब्दावली कठीण असली तरी रुजविलीच पाहिजे. ‘संतुलन प्रतिमान’, ‘परागमन’, ‘अभिजनवर्ग’, ‘विकासलक्षी विश्लेषण’, ‘ संस्थाभवन’, ‘प्राधिकारप्रवण’, ‘आत्मलक्षी’, ‘बहिर्लक्षी’, ‘अतिचारप्रवण’, ‘ छिद्रान्वेषण’, ‘ प्रमाणभिन्नता’, ‘अविष्कार रूप’, ‘ असियुद्ध’, ‘अभिसरण’, ‘मिथक’, ‘अभिमुखजांचा आकृतीबंध’, ‘अभिवृत्ती’, ‘ प्रतिवाद्य’, ‘बौद्धिक विलसिते’, ‘ भ्रांत जाणीव’, ‘समानुभूतीपूर्ण’, ‘ आबंधन’, ‘ विवेकाचे संनिवेशन’ असे यापूर्वी वापरात नसलेले अनेक शब्द डॉ. भोळ्यांनी पाठय़पुस्तकात वापरले. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द रूढ करायला वेळ लागेल, त्रास होईल पण तो आपण घेतलाच पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोण होता.

लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षवाद, विवेकवाद आणि सामाजिक न्याय या तत्त्वांशी बांधिलकी स्वीकारून त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील सर्वच पुरोगामी चळवळी, संस्था, उपक्रम आणि व्यासपीठे यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध हाता. लेखन व भाषण या शक्‍तींचा सामाजिक परिवर्तनाच्या कामासाठी याथायोग्य वापर करण्यावर त्यांचा सदैव भर राहिला. जे लिहायचे, बोलायचे ते शक्‍यतो मराठीतूनच असा त्यांचा निर्धार होता. मार्क्‍स, फुले, शिंदे, गांधी आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाशी त्यांची नाळ जोडली होती. मराठी समाज, साहित्य व संस्कृती हे त्यांच्या आस्थेचे व चिंतनाचे विषय होते. सामाजिक चळवळींविषयी आस्थेवाईक तरीही चिकित्सक लेखन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद

संपादन

महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा मराठवाड्याला हा बहुमान मिळाला, असा अनेकांनी गौरव केला होता आणि डॉ. भोळे म्हणजे मराठवाड्याचे असे म्हणणाऱ्यांचा गोड गैरसमज त्यांनी कायम ठेवला होता. ‘मी विदर्भाचा’ असा खुलासा करण्याच्या भानगडीत भोळे पडले नाहीत.

नागपूर व अमरावती विद्यापीठात त्यांच्या पिढीतील समकालीन असे डॉ. श्री.गो. काशीकर, डॉ. प. सि. काणे, डॉ. सुधाकर भालेराव, डॉ. क्षीरसागर, डॉ. केणी, डॉ. रवी रानडे, प्रा. बी. टी. देशमुख, डॉ. टी. डी. मुदलीयार, डॉ. बाळासाहेब पेशवे, डॉ. पु. गो. कवठाळकर, डॉ. तिजारे, डॉ. प. ल. जोशी, प्रा. भागवत असा नामवंत राज्यशास्त्र प्राध्यापकांचा चमू डॉ. भोळेंबद्दल आदर बाळगून असायचा. मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील डॉ. राजेंद्र बोरांसारखे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. भोळेंना मार्गदर्शक समजायचे.

२६ जून १९७५ला देशात आणीबाणी लागू करण्यात आल्यावर १९७६ मध्ये ४२ वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती व ही दुरुस्ती म्हणजे ‘नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आणि घटनेच्या आत्म्यावरच आघात कसा आहे’ हे डॉ. भोळे यांनी एका लेखातून स्पष्ट केले होते. घटनेच्या उद्देशपत्रिकेत ‘समाजवाद व धर्मनिरपेक्ष’ हे दोन शब्द १९७६ मध्ये जोडण्यात आले पण उद्देशपत्रिकेतील २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी हे शब्द राज्यघटनेत ठेवल्याने कसा गोंधळ होऊ शकतो हे डॉ. भोळेंनी विशद केले होते. उल्लेखनीय म्हणजे, प्रख्यात घटनातज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी याच विषयावर (४२ वी घटना दुरुस्ती) ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’च्या ४ जुलै १९७६ च्या अंकात लेख लिहिला होता. डॉ. भोळे व नानी पालखीवाला यांच्या या लेखात खूप साम्य होते. ‘ग्रेट मेन दे थिंक अलाइक’ म्हणजे वेगवेगळी मोठी माणसे सारखाच विचार करतात, याची अनुभूती यानिमित्ताने आली. मतभेद असले तरी ‘मनभेद’ नसावे, असे डॉ. भोळेंच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते .[१]

व्याख्याने (काही व्याख्याने पुस्तिकारूपात प्रकाशित)

संपादन
 • आकाशवाणीवरील व्याख्याने
 • महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच सार्वजनिक व्यासपीठांवरून व्याख्याने
 • लाड स्मारक व्याख्यानमाला (आकाशवाणीने आयोजित केलेली) अलीबाग व मूर्तिजापूर येथे दिलेली व्याख्याने
 • विविध विद्यापीठांतील अनेक व्याख्यानमाला
 • विविध शहरांतील प्रतिष्ठित व्याख्यानमालांमध्ये भाषणे.

प्रकाशित ग्रंथ

संपादन
 • दुसरे स्वातंत्र्य (अमेय प्रकाशन, नागपूर)
 • डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा (सुगावा प्रकाशन, पुणे)
 • नवी घटनादुरुस्ती अन्वय आणि अर्थ (अमेय प्रकाशन, नागपूर)
 • भारताचे स्वातंत्र्य (पन्नास वर्षांचा मागोवा) (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)
 • महात्मा जोतीराव फुले : वारसा आणि वसा (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)
 • महात्मा जोतीराव फुले (चरित्र, साहित्य अकादमी, नवी दिल्ली)
 • यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)
 • राजकीय भारत (अमेय प्रकाशन, नागपूर)
 • विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण (लोकवाङ्‌मय गृह, मुंबई)
 • विसावे शतक आणि भारतातील समता विचार (बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा)
 • शिक्षण आणि संस्कृती (स्वरूप प्रकाशन, नागपूर)
 • सत्तांतर आणि नंतर (मयूर प्रकाशन, नागपूर)
 • साहित्य प्रत्यय (स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद).

निवडक पाठ्यपुस्तके

संपादन
 • आधुनिक भारतातील राजकीय विचार (महाराष्ट्र विद्यापीठे ग्रंथ निर्मिती मंडळासाठी - कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
 • भारताचे शासन आणि राजकारण (सहलेखक ना. र. देशपांडे) (महाराष्ट्र विद्यापीठे ग्रंथनिर्मिती मंडळासाठी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
 • भारतातील आणि पाश्‍चिमात्त्य राजकीय विचार (पिंपळापुरे ॲन्ड कं. पब्लिशर्स, नागपूर)
 • भारतीय राज्यव्यवस्था ((पिंपळापुरे ॲन्ड कं. पब्लिशर्स, नागपूर)
 • राजकीय सिद्धान्त आणि विश्‍लेषण ((पिंपळापुरे ॲन्ड कं. पब्लिशर्स, नागपूर).

संपादित ग्रंथ

संपादन
 • जमातवाद, राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता (वसंत पळशीकर यांचे लेख) (साकेत प्रकाशन, औरंगाबाद)
 • संशोधनाची क्षितिजे (डॉ. वि. भि. कोलते अमृत महोत्सव गौरवग्रंथ) (अमेय प्रकाशन, नागपूर).

भाषांतरित ग्रंथ

संपादन
 • इस्लामसंबंधी एक आधुनिक दृष्टिकोन (मूळ लेखक - आसफ ए. ए. फैजी) (महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई)
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर-अनुभव आणि आठवणी (मूळ लेखक- नानकचंद रत्तू), (साकेत प्रकाशन, १९८८, औरंगाबाद)
 • महादेव गोविंद रानडे (मूळ लेखक - प्र. ज. जहागीरदार) (नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली).

काही पुस्तिका

संपादन
 • अध्यक्षीय भाषण, महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषद, ११वे अधिवेशन, नाशिक
 • आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला (एकूण तीन व्याख्याने)
 • कर्मवीर, भारत ज्ञान-विज्ञान समिती, पुणे, जून, १९९७
 • जातीपातींचे राजकारण, ठिय्या प्रकाशन, नागपूर १९९८
 • जोतीरावांची समता संकल्पना, लोकवाङ्‌मय गृह, मुंबई दुसरी आवृत्ती १९९८
 • नवहिंदुत्वाची व्याघ्रमुद्रा (शिवसेनेचा उदय आणि विकास) (छात्र युवा संघर्ष वाहिनी मुंबई व राष्ट्र सेवादल)
 • नवसाक्षरांसाठी उपयुक्‍त विषयांवर पाच पुस्तिकांचा संच (साकेत प्रकाशन, १९९२२-९३, औरंगाबाद )
 • महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार आणि सद्यःस्थिती, फुले स्मृती व्याख्यानमाला, अमरावती विद्यापीठ, अमरावती.
 • महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे राजकीयीकरण-स्वरूप आणि परिणाम, सेनापती बापट स्मृती व्याख्यानमाला, १९९७ (मुंबई विद्यापीठ मुद्रणालय)
 • मूलभूत हक्‍काचाही मूलाधार माहितीचा हक्‍क (प्रबोधन प्रकाशन, १९९७, ईचलकरंजी).

=अन्य लेखन=: महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांतून, त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या गौरवग्रंथांतून प्रकाशित झालेले विविध विषयांवरील सुमारे पाचशे लेख.

मानसन्मान

संपादन
अध्यक्षपदे
 • महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद, नाशिक, नोव्हेंबर १९९०
 • जनसाहित्य संमेलन, अमरावती
 • विचारवेध संमेलन, सोलापूर १९९८.

पुरस्कार

संपादन
 • डॉ. भोळे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथाकरिता राज्य पुरस्कार
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव व आठवणी या ग्रंथाला उत्तम अनुवादित वाङमय पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक
 • नागपूरच्या जिजामाता सावित्री स्मृति ट्रस्टतर्फे दिला जाणारा फुले शाहू आंबेडकर स्मृति पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. भास्कर लक्ष्णम भोळे यांचे २४ डिसेंबर २००९ रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास नागपुरात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षांचे होते. सायंकाळी अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[२]

संदर्भ

संपादन