भारतीय तत्त्वज्ञान

भारतीय तत्त्वज्ञान (मूळ संस्कृत संज्ञा 'दर्शन') : भारतीय उपखंडातील संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या तात्त्विक विचारप्रणालींना आणि त्या संबंधीच्या समग्र प्रतिक्रियात्मक विचारविमर्शास भारतीय तत्त्वज्ञान म्हंटले जाते.[१] भारतीय तत्त्वज्ञानास प्राचीन परंपरा आहे. षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असे समीकरण केले जाते, पण हा समज अपुऱ्या माहितीवर आधारलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पना त्यापेक्षा अधिक व्यापक आणि संकीर्ण आहे.

भाषांतराच्या अडचणीसंपादन करा

मराठीतील 'भारतीय तत्त्वज्ञान' हा शब्दसमूह इंग्रजीतील Indian Philosophy या शब्दसमूहाचे मराठी भाषांतर आहे. ही संकल्पना स्पष्ट करणे कठीण आहे. भारतीय संदर्भात तत्त्वज्ञानास 'दर्शन' म्हंटले जाते. डॉ. राधाकृष्णन, एम. हिरियण्णा, टी. एम. पी. महादेवन, कोट्टा सच्चिदानंद मूर्ती , सुरेंद्र बारलिंगे, मे.पुं. रेगे, श्रीनिवास दीक्षित इत्यादी तत्त्वज्ञानाच्या लेखकांच्या लेखनात 'भारतीय तत्त्वज्ञान' हा शब्दप्रयोग आढळतो. तो 'भारतीय दर्शने' या अर्थाने येतो.

भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञानसंपादन करा

'भारतीय तत्त्वज्ञान' ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपणास भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञान (Indian Philosophy and Hindu Philosophy) यांत फरक करणे आवश्यक आहे, असे मत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अभ्यासक-लेखक सतीशचंद्र चॅटर्जी आणि धीरेंद्रमोहन दत्त यांनी व्यक्त केले आहे.[२] त्यांच्या मते, भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे - प्राचीन अथवा अर्वाचीनहिंदू किंवा अहिंदू, ईश्वरवादी अथवा निरीश्वरवादी अशा सर्व भारतीय विचारवंताचे तात्त्विक चिंतन. 'भारतीय तत्त्वज्ञान' या शब्दाला 'हिंदु तत्त्वज्ञान' हा शब्द समानार्थाने वापरला जातो. तथापि 'हिंदू' म्हणजे 'भारतीय' हा अर्थ केवळ भौगोलिकदृष्ट्या घेतला गेला तरच हे म्हणणे खरे ठरेल, असे ते म्हणतात. 'हिंदुत्ववाद' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारसरणीस अनुसरणारे ते 'हिंदू', असे मानले तर तो धार्मिक अर्थ होईल, तत्त्वज्ञानात्मक अर्थ होणार नाही.[३].भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञान यात सकृतदर्शनी फरक केला जात नाही, [४] तथापि संकल्पना स्पष्टीकरणासाठी हा फरक करणे आवश्यक आहे.

सकृतदर्शनी भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञान यात फरक नाही, असे वाटू शकते. पण त्यांच्यात सूक्ष्म फरक करावा लागतो, असे या लेखकांचे प्रतिपादन आहे. त्यासाठी त्यांनी चौदाव्या शतकातील विद्वान तत्त्ववेत्ते आणि पंडित माधवाचार्य यांच्या "सर्वदर्शनसंग्रह" या ग्रंथाचा दाखला दिला आहे. या ग्रंथात एकूण सोळा दर्शनांचा समावेश आहे. त्यांत नास्तिक आणि जडवादी चार्वाक विचारसरणीचा तसेच अवैदिक बौद्ध आणि जैन दर्शनांचाही अंतर्भाव आहे.

या ग्रंथाचे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई यांनी प्रसिद्ध केले आहे. पंडित र. प. कंगले यांनी हे भाषांतर केले आहे.[५]

ग.ना. जोशी यांचे मतसंपादन करा

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास मराठीतून लिहिणारे लेखक प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांच्या नोंदीनुसार आणि मतानुसार "भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे भारतात, हिंदुस्थान या देशात निर्माण झालेले तत्त्वज्ञान ही कल्पना चुकीची नाही. भारतभूमीत प्राचीन काळी व प्राचीन काळापासून निर्माण झालेले, रुजलेले, मान्य झालेले, लोकमानसात व लोकजीवनात स्थिर झालेले; ज्याने या देशाच्या संपूर्ण अंतर्बाह्य जीवनाला व्यापून टाकलेले आहे, असे जे तत्त्वज्ञान ते भारतीय तत्त्वज्ञान." [६]

डॉ. जोशी यांनी "भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास" हा बारा खंडांचा सुमारे चार हजार पानांचा इतिहास लिहिला आहे. "भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे प्रामुख्याने हिंदू तत्त्वज्ञानच आहे", असे स्पष्ट करून किंवा गृहीत धरून डॉ. जोशी यांनी हा इतिहास लिहिला आहे.( [७] तसेच 'हिंदू धर्माबाबत लिहिताना "हिंदू हा 'धर्म' आहे तसेच 'तत्त्वज्ञान' आहे", असेही ते नमूद करतात. [८]

श्रीनिवास हरि दीक्षित यांचे मतसंपादन करा

तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. श्रीनिवास हरि दीक्षित यांच्या मते 'भारतीय तत्त्वज्ञान' या संकल्पनेत आस्तिकनास्तिक असा सर्वच दर्शनांचा समावेश होतो. ते आस्तिक आणि नास्तिक या सज्ञांचा अर्थ पुढीलप्रमाणे करतात. आस्तिक म्हणजे मृत्युनंतर जीवन मान्य करणारे, प्रत्यक्ष जीवनात केलेल्या पापपुण्यानुसार जीवाला गती लाभते, असे समजणारे आणि इहलोकाहून अन्य लोक आहेत, असे स्वीकारणारे ते आस्तिक होत. चार्वाक हे काहीच मानीत नाहीत, म्हणून केवळ चार्वाक हेच एकमेव नास्तिक आहेत आणि बौद्ध व जैन ही दर्शने स्वीकारतात म्हणून ते आस्तिक आहेत. [९] जर आस्तिक म्हणजे आजच्या मराठीतल्या प्रमाणे 'सृष्टीकर्त्या परमेश्वराचे अस्तित्व मानणारे' असा केला तर न्याय, वैशेषिक, योग व वेदान्त या चार दर्शनांना आस्तिक आणि चार्वाक, जैन व बौद्ध, सांख्य व मीमांसा या पाच दर्शनांना नास्तिक म्हणावे लागेल. [१०],पण दीक्षितानी मात्र भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे वैदिक आणि अवैदिक अशीच मांडणी मान्य केली आहे.

सुरेंद्र बारलिंगे यांचे मतसंपादन करा

तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि तत्त्ववेत्ते डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी "भारतीय तत्त्वज्ञान" या संकल्पनेबद्दल मांडलेले मत असे आहे.[११] ते म्हणतात,

" तत्त्वज्ञान कोणत्या अर्थाने भारतीय असू शकते ? तथाकथित भारतीय तत्त्वज्ञान हे आपापल्या खासियतीनुसार शिक्का मारलेल्या इतर तत्त्वज्ञानांपासून, उदाहरणार्थ पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांपासून, मूलभूतरीत्याच ते वेगळे आहे, असे या प्रश्नातून सूचित होऊ शकते. किंबहुना, काहीजण गंभीरपणे तसा विचार करतात, याबाबत मला शंका नाही; पण ते ज्याचा गांभीर्याने विचार करतात, त्याची तेवढ्याच गांभीर्याने नोंद घ्यावयाची असेल तर त्याचा अर्थ असा होईल की ज्या तऱ्हेने काहीएका विशिष्ट प्रकारची वनस्पती ही काहीएका विशिष्ट कटिबंधीय प्रदेशातच उगवते मात्र अन्य ठिकाणी तिची लागवडच होऊ शकतच नाही, तसे काहीएक विशिष्ट प्रकारचे तत्त्वज्ञान काहीएका विशिष्ट प्रदेशातच वाढते, इतरत्र नाही. पुढे जाऊन विस्तारपूर्वक असाही अर्थ व्हावा की तत्त्वज्ञानात प्रकारभेद असून त्यातील कोणताही एक प्रकार इतरांपासून पूर्णपणे वेगळा असतो, शिवाय प्रत्येक प्रकार म्हणजे एक एकात्म जैविक समष्टी बनते; एखाद्या प्रकारातील भागांमध्ये आपण भेद करू शकत असलो तरी ते सर्व भाग मिळून एक समष्टी बनते. एका प्रकारातील भागांचा सारखेपणा आणि दुसऱ्या प्रकारातील भागांचा सारखेपणा यांची हाताळणी या सारखेपणाच्या आधारावर बरोबरीने करता येणार नाही."
"याचा अर्थ असाही होऊ शकेल की प्रत्येक तत्त्वज्ञान प्रकार एखाद्या बीजासारखा असून तो केवळ एका विशिष्ट वातावरणातच वाढतो; एवढेच नव्हे तर विशिष्ट तऱ्हेच्या सांस्कृतिक, वंशीय रचनाबंधानुसारही तो वाढतो. भारतीय हे आर्यवंशीय असल्याने भारतीय तत्त्वज्ञान प्रकार आर्य रचनाबंधाशी बांधिलकी राखेल आणि त्याच रितीने ग्रीक, बार्बर,रोमन, अंग्लो –सॅक्सन आणि मंगोलियन रचनाबंधांमध्ये फरक करता येईल. हाच युक्तिवाद पुढे न्यावयाचा झाला तर असे म्हणता येईल की चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात असेल तिथे एक विशिष्ट प्रकारचे तत्त्वज्ञान असेल आणि तशाच रितीची एकसंध व प्रत्येक वर्णांतर्गत विहित अशी जीवनशैलीही असेल, आणि 'स्वधर्माची' भाषा करणारे तर अतिशय गांभीर्याने तसा विचार करतातही. या साऱ्याचा लक्षितार्थ असाही होईल की तत्त्वज्ञान हे स्वरूपतः अनेक प्रकारचे असले पाहिजे, म्हणजे मानवी समाजातील समूहांच्या अभिवृत्ती आणि गरजा नजरेसमोर ठेवूनच तत्त्वज्ञानाचे विविध प्रकार केलेले असले पाहिजेत आणि अशी विविधता असलीही पाहिजेच."
"असाही विचार करणे शक्य आहे की, जेव्हा आपण भारतीय वा पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, तेव्हा तत्त्वज्ञानाच्या तार्किक रचनाबंधाचा विचार करीत नसतो तर सांस्कृतिक रचनाबंधाचा विचार करीत असतो (असाही विचार करणे शक्य आहे की) 'तत्वज्ञान' असे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे केवळ सांस्कृतिक रचनाबंधाचे प्रगटीकरण असते किंवा अमूर्तीकरण असते. अर्थात त्याचा अर्थ असा असणार नाही की विविध स्वरूपी तत्त्वज्ञान म्हणजे अगदी कप्पेबंद व्यवस्था असते; म्हणजेच एका रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाचा दुसऱ्या रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाशी कसलाही संबंध येत नाही."
"अर्थात असाही विचार करणे शक्य आहे की, अगदी एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील तत्त्वज्ञानांत वैविध्य आढळू शकते आणि विविध सांस्कृतिक रचनाबंधांमधील तत्त्वज्ञानांत साम्ये आढळू शकतात. याचे कारण एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन माणसे एकसारखा विचार करतील असे नाही आणि त्याचवेळी भिन्न सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन व्यक्तींच्या विचारात सारखेपणा असू शकेल आणि त्यांच्या सहानुभूतीचे विषय सामाईक असतील व त्यांचे आकलनही समानधर्मा असू शकेल. (त्यामुळेच आता) आता असा विचार करणे शक्य आहे, उदाहरणार्थ बिटिश तत्त्वज्ञान हे अनुभववादी आहे तर आंग्लेतर- उर्वरीत युरोपीय (continental) तत्त्वज्ञान हे त्याहून वेगळे आहे. म्हणजे बव्हंशी ज्या सहजतेने आंग्लेतर तत्त्ववेत्ते 'जन्मजात कल्पना' स्वीकारतील त्या सहजतेने बिटिश तत्त्ववेत्ते मात्र त्यांवर विश्वास ठेवणार नाहीत. पण आंग्लेतर तत्त्ववेत्त्यांमध्येही कान्टसारखे काही असे विमर्शात्मक (critical) तत्त्ववेत्ते आहेत की जे अनुभववादी परंपरा अंशतः स्वीकारतील आणि त्या आधारे विमर्शात्मक तत्त्वज्ञानाची (critical philosophy) उभारणीही करतील."
"'भारतीय तत्त्वज्ञान' असा शब्दप्रयोग मी काही वेळेस करीन तेव्हा "भारतीय तत्त्ववेत्त्यांनी तपशीलवार मांडलेले तत्त्वज्ञान" असे मला म्हणावयाचे असेल. अशा परिस्थितीत 'भारतीय' हे तत्त्वज्ञानाचे विशेषण नसेल तर लेखकांना उद्देशून केलेले परिवर्तित गुणवाचक विशेषणाचे उदाहरण (epithet) असेल, त्यांच्या विचारांना उद्देशून केलेले (विशेषण) नव्हे. मला तर असेच वाटते की आपण जेव्हा 'भारतीय तत्त्वज्ञान' म्हणतो, तेव्हा बहुतेक वेळा आपल्या मनात हाच रुढार्थ किंवा रूढ शब्दप्रयोग असतो, अर्थात त्याच्या इतरही रुढार्थांकडे किंवा रूढ शब्दप्रयोगांकडे दुर्लक्ष करता येणार नाही."
मला असेही वाटते की, एखादा माणूस 'भारतीय तत्त्वज्ञान' असे म्हणतो, तेव्हा व्यक्तिपरत्वे आणि संस्कृतिपरत्वे उद्भवणाऱ्या विविध विचारांमधील अर्थछटा एकवटणाऱ्या एका विशिष्ट अर्थानेच तो हा शब्दप्रयोग करीत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा माणूस 'मध्ययुगीन ब्रिटिश तत्त्वज्ञानाबद्दल' बोलतो तेव्हा तो अनिवार्यपणे काहीएका विशिष्ट आकृतिबंधाविषयी बोलत नसतो."
"अर्थात संस्कृती, प्रदेश आणि कालपरत्वे एका विशिष्ट दिशेने असा विचार केला जाणे शक्य आहे. मला वाटते की, 'भारतीय तत्त्वज्ञान' या संज्ञाबंधाबाबतच्या विविध रूढ शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी केला असला तरी, 'भारतीय तत्त्वज्ञान' म्हणजे अमुक आहे आणि तमुक नाही, असे काहीही गृहीत धरण्यापेक्षा हे प्रकरण अगदी खुले ठेवावे, हे बरे. कारण 'भारतीय तत्त्वज्ञान' हे पद संदिग्ध आहे आणि त्याचा वापर अनेकार्थसूचक आहे आणि ते खुले आहे."

दयाकृष्ण यांचे मतसंपादन करा

बॉलीवूडमधील तत्त्वज्ञानाचे पदवीधरसंपादन करा

हेही वाचासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ Jitendra N. Mohanty, Indian philosophy, http://www.britannica.com/topic/Indian-philosophy
 2. ^ Satishchandra Chatterjee And Dhirendramohan Datta, "Chapter I, General Introduction", An Introduction To Indian Philosophy, pp. 03, Universitiy of Calcutta, 1968- 7th edition Price Rs. 07.50., Printed and published by Surendranath Kanjilal, Superintedent, Calcutta Universitiy Press, 48, Hazra Rd., Ballygunge, Calcutta, Book No.2124 B, January, 1968-Y.
 3. ^ Satishchandra Chatterjee And Dhirendramohan Datta, "Chapter I, General Introduction", An Introduction To Indian Philosophy, pp. 03, Universitiy of Calcutta, 1968- 7th edition Price Rs. 07.50., Printed and published by Surendranath Kanjilal, Superintedent, Calcutta Universitiy Press, 48, Hazra Rd., Ballygunge, Calcutta, Book No.2124 B, January, 1968-Y.
 4. ^ वाचा व तुलना करा : Indian philosophy : https://en.wikipedia.org/wiki/Indian_philosophy आणि Hindu philosophy : https://en.wikipedia.org/wiki/Hindu_philosophy
 5. ^ "श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)", पंडित र. प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, प्रथम आवृत्ती १९८५, किंमत रु.१२०/-
 6. ^ प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी, प्रस्तावना, भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास, खंड १ : वेद, उपनिषदे व भौतिकवाद, पान (६), शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे ४११००५ (मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे यांचे करिता)ISBN 81-85239-9607(VOL.1)
 7. ^ प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी, प्रस्तावना, भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास, खंड १ : वेद, उपनिषदे व भौतिकवाद, पान (१४), शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे ४११००५ (मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे यांचे करिता) ISBN 81-85239-9607(VOL.1)
 8. ^ प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी, प्रस्तावना, भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहत इतिहास, खंड १ : वेद, उपनिषदे व भौतिकवाद, पान (६), शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे ४११००५ (मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे यांचे करिता)ISBN 81-85239-9607(VOL.1)
 9. ^ श्रीनिवास दीक्षित, 'भारतीय तत्त्वज्ञान (फडके प्रकाशन, कोल्हापूर), दहावी आवृत्ती पान २८
 10. ^ श्रीनिवास दीक्षित, 'भारतीय तत्त्वज्ञान, फडके प्रकाशन,कोल्हापूर, दहावी आवृत्ती पान २९
 11. ^ S.S.Barlingay, Reunderstanding Indian Philosophy, "Reunderstanding Indian Philosophy- Some Glimpeses " ISBN 81-246-0107-0 (D.K.Printworld, New Delhi,1998, page 15-16)