ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (दुसरे महायुद्ध)

Disambig-dark.svg

ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स तथा बीईएफ हे दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९३९-४० दरम्यान पश्चिम युरोपात लढणारे सैन्य होते. जर्मनीने १९३८मध्ये ऑस्ट्रिया बळकावले व चेकोस्लोव्हाकियामधील प्रदेशांवर हक्क सांगितल्यावर युनायटेड किंग्डमने आपले सैन्य बळकट करण्यास सुरुवात केली. त्या योजनेनुसार युनायटेड किंग्डमच्या बाहेर जाउन लढण्यासाठी हे सैन्य उभारले गेले. सप्टेंबर १९३९मध्ये युद्ध सुरू झाल्यावर जनरल लॉर्ड गॉर्टच्या नेतृत्त्वाखाली हे सैन्य युरोपात उतरले आणि बेल्जियम-फ्रान्स सीमेवर फ्रेंच सैन्याच्या डाव्या फळीवर त्यांनी ठाण मांडले.

१९४०च्या मध्यापर्यंत संरक्षक भिंती आणि खंदक खणण्याचे काम केलेल्या या सैन्याला बॅटल ऑफ फ्रांसमध्ये लढण्याची संधी मिळाली. त्यांनी बेल्जियममधून ईशान्येस धडक मारली परंतु सेदानच्या लढाईत सपाटून मार खाल्ल्यावर फ्रेंच सैन्याबरोबर बीईएफने तितक्याच त्वरेने माघार घेतली. त्यांच्या दक्षिणेकडून चाल करीत आलेल्या जर्मन सैन्याने बीईएफ, बेल्जियम आणि फ्रान्सच्या सैन्यांना सॉम नदीच्या उत्तरेस डंकर्कजवळ कोडींत पकडले. ऑपरेशन डायनॅमो मोहीमेंतर्गत बीईएफ आणि फ्रेंच आणि बेल्जियमच्या काही सैनिकांना तेथून उचलून परत ब्रिटनमध्ये आणण्यात आले.