बोरिस निकोलायेविच येल्त्सिन फेब्रुवारी १ १९३१ एप्रिल २३ २००७ हे सोवियेत संघाच्या विघटनानंतर वेगळा देश झालेल्या रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा दोन वेळचा राष्टाध्यक्ष पदाचा कार्यकाळ १० जुलै १९९१ ते ३१ डिसेंबर १९९९ असा होता.

बोरिस येल्त्सिन

१९३४ साली बोरिस केवळ तीन वर्षांचे असतांना त्यांचे वडील निकोलायेविच येल्त्सिन यांना सोवियेत संघाच्या विरुद्ध निदर्शने करण्याच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे कालावधीची शिक्षा झाली. आई क्लावदिया येल्त्सिनाने शिवणकाम करून आपले घर सांभाळले. बोरिसला लहानपणापासून शिक्षणासह विविध खेळांमध्ये आवड होती, वॉलीबॉल, बॉक्सींग आणि कुस्ती हे खेळ त्यांना जास्त आवडत, स्किइंग आणि जिम्नॅस्टीक्स मध्येही ते आवडीने भाग घेत.

१९५५ साली उरलच्या विश्वविद्यालयातून बोरिस येल्त्सिन यांनी बांधकाम क्षेत्रातील आपली पदवी संपादन केल्यावर एका कंपनीत काही काळ फोरमॅन म्हणून काम केले. या कंपनीतच त्यांना बढती मिळत गेली आणि ते १९६३ मध्ये ते मुख्य इंजिनियरच्या पदावर काम करू लागले. दरम्यान १९६१ पासून ते सोवियेत समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कामे करू लागले. १९७५ साली त्यांना पार्टीच्या स्वर्दलोवस्क ओब्लास्ट विभागाचे अध्यक्ष पद बहाल करण्यात आले तर १९७६ साली त्यांना पार्टीच्या पॉलिटब्युरोचे सदस्य बनविण्यात आले. हळूहळू येल्त्सिन यांच्या सोवियेत सत्तेत ओळखी वाढू लागल्या, पार्टीतील महत्त्वाची पदे त्यांना मिळू लागली. १९८५ ते १९८७ या काळात येल्त्सिन मॉस्को शहराचे महापौर होते.