बीटल्स
बीटल्स (इंग्रजी: The Beatles, द बीटल्स ;) हा इ.स. १९६०-७० च्या दशकांमध्ये कार्यरत असलेला इंग्लिश रॉक संगीतचमू होता. हा पॉप संगीताच्या इतिहासातील व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी व नावाजला गेलेला चमू इ.स. १९६० साली इंग्लंडातील लिव्हरपूल येथे स्थापन झाला. इ.स. १९६२पासून या चमूत जॉन लेनन (रिदम गिटार, गायन), पॉल मॅकार्टनी (बास गिटार, गायन), जॉर्ज हॅरिसन (लीड गिटार, गायन) आणि रिंगो स्टार (ड्रम, गायन) हे कलाकार होते. स्किफल व इ.स. १९५० सालच्या रॉक अँड रोल संगीतप्रकारांपासून सुरुवात करून या चमूने पुढे पॉप बॅलाड ते सायकिडिलिक रॉक असे अनेक संगीतप्रकार अभिनव पद्धतीने हाताळले. सुरुवातीला त्यांच्या अफाट लोकप्रियतेला 'बीटलमॅनिया' या नावाने खूळ समजले जात होते. हे लोकमत पुढे त्यांची गीतलेखनकला सफाईदार व शिष्टसंमत झाल्यावर बदलले. इ.स. १९६०सालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींतल्या तत्त्वप्रणालीचे ते प्रतीक बनले.
बीटल्स | |
---|---|
बीटल्स | |
संगीत साधना | |
गायन प्रकार | रॉक, पॉप |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९६० - इ.स. १९७० |
सुरुवातीला लेनन, मॅकार्टनी, हॅरिसन, स्टुअर्ट सटक्लिफ (बास) आणि पीट बेस्ट (ड्रम) या पाच बीटल्सांनी लिव्हरपूल आणि हांबुर्ग येथील क्लबांतून आपला जम बसवला. इ.स. १९६१ साली सटक्लिफाने चमू सोडला आणि बेस्टाच्या बदली रिंगो स्टार चमूत सामील झाला. एका संगीतविषयक दुकानाचा मालक, ब्रायन एपष्टाइन याने बीटल्सांचा व्यवस्थापक म्हणून काम करायची तयारी दाखवल्यावर या संगीतचमूला व्यावसायिक स्पर्श लाभला. तसेच निर्माता जॉर्ज मार्टिन याच्या मदतीने 'लव्ह मी डू' या ध्वनिफितीच्या निर्मितीनंतर बीटल्सांना इ.स. १९६२ साली व्यावसायिक स्तरावर चांगले यश मिळाले. इ.स. १९७० साली हा चमू फुटेपर्यंत, देशोदेशी कार्यक्रम करणे आणि इंग्लंडात असताना आपल्या स्टुडिओत नवीन ध्वनिफितींचे ध्वनिमुद्रण करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. यानंतर पाचही बीटल्स स्वतंत्रपणे संगीतक्षेत्रात कार्य करू लागले. इ.स. १९८० साली लेननाचा त्याच्या न्यू यॉर्क शहरातल्या घराबाहेर खून झाला, तर इ.स. २००१ साली हॅरिसनाचे कर्करोगाने निधन झाले. मॅकार्टनी आणि स्टार अजूनही सक्रीय आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)