बीजिंग

(बिजींग या पानावरून पुनर्निर्देशित)


बीजिंग, उच्चारी नाव पैचिंग, (लेखनभेद: पेइचिंग, पेकिंग, बैजिंग; चिनी: 北京市 ; फीनयीन: Běijīng ;) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानीचे महानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.

बीजिंग
北京市
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : थ्यॅनान्मन, थ्यॅन थान - अर्थात स्वर्गमंदिर, राष्ट्रीय ललित कला केंद्र, बीजिंग नॅशनल स्टेडियम
बीजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 39°54′50″N 116°23′30″E / 39.91389°N 116.39167°E / 39.91389; 116.39167

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४७३
महापौर ग्वाओ जिन्लॉंग
क्षेत्रफळ १६,८०१ चौ. किमी (६,४८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४३ फूट (४४ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०६,९३,०००
  - घनता १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.beijing.gov.cn/

बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे सिनोपेक, चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत. चीनमधील बहुतेक सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग, द्रुतगती रेल्वेमार्ग बीजिंगमधून जातात. प्रवाशांच्या संख्येनुसार येथील बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

बीजिंगला अनेक सहस्रकांचा इतिहास असून गेल्या सात शतकांहून अधिक काळ हे चीनचे राजकीय केंद्र राहिले आहे. बलबाहूने बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले. बीजिंग परिसरामध्ये प्रतिबंधित शहर, उन्हाळी राजवाडा, मिंग राजवंशाची थडगी इत्यादी अनेक युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने आहेत. चीनच्या भिंतीचा काही भाग बीजिंगमधून जातो. इ.स १४२० मध्ये बीजिंग शहर मिंग साम्राज्याची अधिकृत राजधानी म्हणून जाहीर झाले.

२००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले बीजिंग नॅशनल स्टेडियम

बीजिंगमध्ये आजवर इ.स. २००८ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा, इ.स. १९९० च्या आशियाई क्रीडास्पर्धा, तसेच इतर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बीजिंगमध्ये आधुनिक आणि पारंपरिक वास्तुकला आहेत. हे शहर जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांमधील एक आहे. बीजिंगचा इतिहास समृद्ध आहे. हे शहर चीन देशाचे राजकीय केंद्र म्हणून मागील ८ दशकांपासून ओळखले जात आहे. बीजिंग हे शहर आपल्या भव्य वास्तूंमुळे प्रसिद्ध आहे.

बीजिंगमधील ९१ विद्यापीठांमधील अनेक विद्यापीठे चीनमधील उत्तम विद्यापीठांमध्ये गणली जातात. यातील पेकिंग विद्यापीठ आणि कविंगु विद्यापीठ पहिल्या ६०मध्ये आहे. बीजिंग सीबीडी हे बीजिंगचे आर्थिक विस्ताराचे केंद्र आहे. बीजिंगचा झोंग गुआन कुंग हा भाग चीनची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो.

संस्कृती

संपादन

बीजिंग किंवा पेकिंग ऑपेरा हा चिनी नाटकाचा पुरातन प्रकार आहे, हा प्रकार संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पेकिंग जेवण हे सामान्य पद्धतीने बनविले जाते, पेकिंग रोस्ट डक हे इथले सुप्रसिद्ध पक्वान्न. फिलिंग जिओबिंग ह इथला पारंपरिक पद्धतीचा नाश्ता. हा गोल चपटा (पोळी सारखा) असतो व एका फुलिंग नावाच्या भुईछत्रापासून बनविला जातो. भुईछत्रे ही ही पारंपरिक चिनी औषधांमध्येसुद्धा वापरली जातात.

क्लोईसोन हे धातूंवर काम करण्याचे तंत्र आहे,हे येथील वैशिष्ट्य आहे, ही पद्धती फार मोठी आणि किचकट आहे.

पेकिंग येथील लाकडावर केलेले काम त्यांच्या अनोख्या चित्रशैलींमुळे प्रसिद्ध आहे.

बीजिंगमधील तरुण वर्गाने रात्रीचे मौजमजेचे जीवन आत्मसात केले आहे. आता हौहाई, सनिल्टन आणि वोडकाऊ ही तरुणाचे मुख्य आकर्षण केंद्रे आहेत.

२०१२ मध्ये बीजिंगला सुंदर रचना असलेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळाले, आणि या शहराने युनेस्कोने जाहीर केलेल्या सर्जनशील शहरांच्या यादीत मान मिळवला.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

फॉर्बिडन सिटी- हा एक विशाल महाल आहे, महालामध्ये मिंग आणि कविंग वंशाचे सम्राट राहायचे. या महालामध्ये पालेस संग्रहालय आहे. त्यात चिनी कलेचा भव्य संग्रह आहे. बीहाई, शीचाहाई, झोंगणान्हाई, जिंगशान, झोंगशान या सगळ्या जागा फॉर्बिडन सिटीच्या आसपास बघायला मिळतात. याशिवाय तेथे भव्य बगीचे आणि उद्यानेसुद्धा आहेत.त्यांमधील बिहाई उद्यान चिनी बागकामाचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणूनच ते पर्यटकांचे महत्त्वाचे आकरषण आहे. या बगीच्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे.

आधुनिक युगात झोंगणांहाई हे विविध चिनी सरकारचे राजकीय केंद्र होते आणि आता चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय आहे.

समर महाल आणि जुना समर महाल हे बीजिंगच्या पश्चिमेला आहेत. स्वर्गाचे मंदिर हे सुप्रसिद्ध स्थळांपैकी एक मानले जाते, हे शहराच्या आग्नेय भागात आहे, येथे मिंग आणि क्विंग साम्राज्याचे सम्राट वार्षिक प्रार्थनेकरिता येत. बीजिंगच्या उत्तरेला धरतीचे मंदिर (दितान), पूरवे आणि पश्चिमेला अनुक्रमे सूर्याचे (रितान) आणि चंद्राचे (युतान) मंदिर आहे.

निण्यूजी मशीद ही शहरातील सगळ्यात जुनी मशीद अाहे.

पेकिंग येथे १५५ वस्तुसंग्रहालये आणि कलादालने आहेत. शहराच्या बाहेर मिंग साम्राज्याचे १३ मकबरे आहेत.. पुरातत्त्वशास्त्रामध्ये महत्त्वाची मानली जाणारी पेकिंग साईट सुद्धा बीजिंग मध्येच आहे.

बीजिंगचा धार्मिक वारसा विविधतेने भरलेला आणि समृद्ध असा आहे. चिनी, बौद्ध, टाओ, कन्फ्यूशिअन, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म इथे प्रामुख्याने आढळून येतात. ११.२% बौद्ध,०.७८% ख्रिश्चन आणि १.७६% मुसलमान लोक इथे आहेत.

वाहतूक

संपादन

चीनचे राजकीय व आर्थिक केंद्र असलेल्या बीजिंगमध्ये नागरी परिवहन तसेच आंतरदेशीय वाहतूकीचे मोठे जाळे आहे. बीजिंग शहराभोवती ५ गोलाकृती महामार्ग धावतात तर ९ द्रुतगती मार्ग व असंख्य महामार्ग बीजिंगला चीनमधील इतर शहरांसोबत जोडत्तात. बीजिंग सबवे ही येथील [[जलद परिवहन] प्रणाली जगातील सर्वाधिक वर्दळीची सेवा असून दररोज १ कोटीहून अधिक प्रवासी बीजिंग सबवेने प्रवास करतात. शहरी वाहतूकीसाठी सुमारे २८ हजार बस रोज ८८२ मार्गांवर धावतात.

बीजिंगमध्ये बीजिंग रेल्वे स्थानक, बीजिंग उत्तर रेल्वे स्थानक, बीजिंग पश्चिम रेल्वे स्थानक व बीजिंग दक्षिण रेल्वे स्थानक ही चार प्रमुख रेल्वे स्थानके असून येथून अनेक पारंपारिक तसेच द्रुतगती रेल्वेमार्ग धावतात. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वे ही जगातील सर्वात जलद लांब पल्ल्याची रेल्वे आहे तर बीजिंग-हाँगकाँग द्रुतगती रेल्वे ही जगातील सर्वाधिक अंतर पार करणारी द्रुतगती रेल्वे आहे. बीजिंगमधून सायबेरियन रेल्वेमार्गाद्वारे मंगोलिया देशातील उलानबातर तसेच रशियामधील मॉस्को शहरांपर्यंत थेट रेल्वेसेवा आहे तसेच उत्तर कोरियातील प्याँगयांगव्हियेतनाममधील हनोई येथे देखील बीजिंगमधून गाड्या सुटतात.

बीजिंग शहराच्या ३२ किमी वायव्येस असलेला बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. २०१९ साली बीजिंगच्या ४६ किमी दक्षिणेस बांधण्यात आलेला बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दुसरा प्रमुख विमानतळ वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ह्या विमानतळाची इमारत जगात सर्वात मोठ्या आकाराची असून नजीकच्या काळामध्ये हा बीजिंग महानगर तसेच त्यांजिन शहरासाठी प्रमुख विमानतळ बनेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  •   विकिव्हॉयेज वरील बीजिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश भाषेत). 2010-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-13 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)