हुतात्मा चौक (मुंबई)

(फ्लोरा फाउंटन या पानावरून पुनर्निर्देशित)

हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक, फ्लोरा फाउंटन कारंजे आणि कोपऱ्यातील दादाभाई नौरोजी यांचा पुतळा[१] इत्यादी स्मृतिशिल्पे या चौकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक (पुरोभागी) आणि फ्लोरा फाउंटन (पार्श्वभागी)

ब्रिटिशकालीन इतिहास संपादन

इ.स. १६६८-१७१६ या कालखंडात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेटांवर एक किल्ला बांधून पूर्ण केला. पुढे इ.स. १८६० साली जागेच्या अभावामुळे आणि मुंबई नगरपालिकेच्या सांडपाण्याच्या निःसारणादी कामांमुळे हा किल्ला पाडला गेला. या किल्ल्यास तीन मजबूत सुरक्षित दरवाजे होते. पूर्वेकडील दरवाजा अपोलो गेट, उत्तरेस बझार गेट - म्हणजे सध्या ज्या ठिकाणी जी.पी.ओ. आहे तिथला भाग - आणि पश्चिमेकडील दरवाजा चर्चगेट या नावाने ओळखला जाऊ लागला. या चर्चगेटासमोर फ्लोरा फाऊंटन हे शिल्पांकित कारंजे उभे केले गेले [२] .

फ्लोरा फाउंटन कारंजे संपादन

 
फ्लोरा फाउंटन कारंजे

फ्लोरा फाउंटन हे मुंबईच्या फोर्ट भागातील हुतात्मा चौकातील पाण्याचे कारंजे आहे. हे कारंजे इ.स. १८६४मध्ये बांधण्यात आले. फाउंटन परिसरातील जमीन ही सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती. हे कारंजे म्हणजे डेव्हिड ससून यांनी त्यांच्या फ्लोरा नावाच्या अल्पवयातच निवर्तलेल्या मुलीचे स्मारक म्हणून, स्वतःच्या जमिनीवर बांधलेले स्मारक होते [३]. म्हणून त्या कारंज्याला फ्लोरा फाउंटन असे म्हणत. पुढे या कारंजावरून एकंदरीत त्या भागालाच फ्लोरा फाउंटन असे नाव पडले. फ्लोरा हे एका रोमन देवतेचे नावही आहे.

पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फ्लोरा फाउंटनाच्या परिसरात अनेकजण पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांची आठवण म्हणून त्या चौकात हाती मशाल घेतलेल्या क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा एक पुतळा उभारला गेला. त्या पुतळ्याला हुतात्मा स्मारक म्हटले गेले. त्यामुळे फ्लोरा फाउंटन असलेल्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. हा नावबदल इ.स. १९६०मध्ये झाला.

हुतात्मा चौकाचा इतिहास संपादन

 
हुतात्माचौकातील अमर ज्योती

इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

दादाभाई नौरोजी यांचा पुतळा संपादन

 
दादाभाई नौरोजी पुतळा

फ्लोरा फाउंटनपासून उत्तरेकडे पुढे जाणाऱ्या दादाभाई नौरोजी मार्गावर(जुने नाव हॉर्नबी रोड) भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह व पारशी विचारवंत दादाभाई नौरोजी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार बाळाजी वसंतराव ऊर्फ भाऊसाहेब तालीम हे होते.[१]या पुतळ्याचे अनावरण ........ साली ....... गव्हर्नरांच्या हस्ते झाले.

दादाभाई नौरोजी यांच्या पुतळ्यातील खुर्ची साधी काम करण्याची खुर्ची आहे. या पुतळ्याचे एक वैशिष्ट्य असे की, दादाभाई ज्या खुर्चीवर बसले आहेत त्या खुर्चीचे मागचे दोन्ही पाय खऱ्याखुऱ्या फनिर्चरसारखे दिसतात.[१] या खुर्चीला एवढ्या जड पुतळ्याचे वजन पेलावे, म्हणून दादाभाईंच्या पायघोळ पारशी फॅशन कोटाचा फक्त समोरचा (फोटोत दिसणारा) भाग पुतळ्याच्या 'ब्राँझ बेस' पर्यंत टेकलेला आहे.[१]

या पुतळ्याच्या पदस्थलावर (' पेडेस्टल' वर) दोन्ही बाजूस युरोपियन वास्तववादी धाटणीची वर्णनपर उठावदार बोधशिल्पे ('इलस्ट्रेटिव्ह') असणे हे या पुतळ्याचे आणखी एक 'कलात्मक' वैशिष्ट्य आहे. 'ब्रिटिश पार्लमेंटात पहिल्या भारतीयाचा प्रवेश : फेब्रुवारी १८९३' या दादाभाईंच्याच चरित्रावर आधारित प्रसंगाचे शिल्प पुतळ्याच्या एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला, मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या दादाभाईंचे 'मदर्स रिअली मेक नेशन्स' हे वाक्य आणि शाळेत आई-मुलांना प्रवेश देणारे दादाभाई, असे या प्रसंगाचे उठावशिल्प आहे.[१]


चित्रदालन संपादन


संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e दास,विबुधप्रिया. "खऱ्याखुऱ्या खुर्चीवरले दादाभाई!". Archived from the original on १३ ऑगस्ट २०१४. ३० एप्रिल, इ.स. २०१३, भाप्रवे दुपारी १३१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "मुंबापुरीचा रंजक इतिहास - वसंत गद्रे यांचे पुस्तक परिक्षण". ३० एप्रिल, इ.स. २०१३, भाप्रवे दुपारी १३१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ द ज्यूज ऑफ इंडिया: अ स्टोरी ऑफ थ्री कम्युनिटीज (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्यदुवे संपादन