फ्रांचेस्को दे पाझ्झी

(फ्रांचेस्को दे पाझी या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांचेस्को दे पाझ्झी (२८ जानेवारी, १४४४ - २६ एप्रिल, १४७८) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझे शहरातील एक बँकर होता. हा पाझ्झी घराण्याचा सदस्य असून याने पाझ्झी षड्यंत्रात मोठा भाग घेतला होता. मेदिचे कुटुंबाकडून फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचे शासन काढून घेण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले होते. फ्रांचेस्कोचे काका याकोपो दे पाझ्झी याचे सूत्रधार होते आणि त्यांना पोप सिक्स्टस चौथ्याची मूक संमती होती. []

२६ एप्रिल, १४७८ रोजी, इस्टर संडेच्या दिवशी, मध्यवर्ती फिरेंझेमधील कॅतेद्राले दि सांता मारिया देल फियोरे कॅथेड्रलमध्ये प्रार्थना सुरू असताना लोरेन्झो डी' मेदिची आणि त्याचा भाऊ आणि सह-शासक जुलियानो यांच्यावर खूनी हल्ला झाला. फ्रांचेस्को आणि बेर्नार्दो बारोंचेल्ली यांनी जुलियानोला १९ वेळा भोसकून चर्चमध्येच हत्या केली. लॉरेंझो हल्ल्यातून बचावला, आणि काही कटकारस्थानी जखमी झाले. [] [] त्यानंतर फ्रांचेस्को त्याच्या काकाच्या व्हिलामध्ये परतला. []

या फसलेल्या षडयंत्राची बातमी फिरेंझेभर पसरताच तेथील नागरिकांनी कारस्थान्यांचा माग काढून एकेकाला ठार मारणे सुरू केले. फ्रांचेस्कोला त्याच्या पलंगावरून उचलून संतप्त जमावाने फिरेंझेच्या रस्त्यावरून फरपटत नेले आणि शेवटी पलाझ्झो देल्ला सिन्योरियाच्या खिडकीतून त्याच्या सहकारस्थानी फ्रांचेस्को साल्व्हियेतीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी फासावर लटकवून दिले. त्याचे काका याकोपोची सुद्धा लवकरच हीच गत होणार होती. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Jensen, De Lamar (1992). Renaissance Europe: Age of Recovery and Reconciliation (2nd ed.). Lexington, Massachusetts: D. C. Heath and Company. p. 80. doi:10.2307/3167078. ISBN 9780669200072. JSTOR 3167078. OCLC 25171924.
  2. ^ Smedley, Edward; James, Hugh James; Rose, Henry John (1845). Encyclopaedia Metropolitana; Or, Universal Dictionary of Knowledge on an Original Plan Comprising the Twofold Advantage of a Philosophical and an Alphabetical Arrangement, with Appropriate Engravings. B. Fellowes. p. 272.
  3. ^ Koestler-Grack, Rachel A. (1974). Joseph, Michael (ed.). Leonardo Da Vinci: Artist, Inventor, and Renaissance Man. Infobase Publishing. p. 152. ISBN 978-0791086261.
  4. ^ Kohl, Witt & Welles 1978.
  5. ^ Hibbert, Christopher (6 December 2001) [1 January 1974]. The Rise and Fall of the House of Medici. Harmondsworth, Middlesex: Penguin UK. p. 141. ISBN 0140050906.