पुरुषोत्तम लाल (इ.स. १९२९ - इ.स. २०१०) हे एक भारतीय शिक्षक, लेखक, अनुवादक, व प्रकाशक होते. त्यांनी रायटर्स वर्कशॉप ही प्रकाशन संस्था स्थापली तसेच महाभारत, उपनिषदे, इ. संस्कृत साहित्याचे इंग्रजीमध्ये अनुवाद केले.

कोलकात्याच्या सेंट झेवियर महाविद्यालयात लाल इंग्रजी भाषेचे अध्यापक होते. १९५८ मध्ये त्यांनी इंग्रजी भाषेतील भारतीय अभिजात साहित्य प्रकाशित करण्याकरीता रायटर्स वर्कशॉप नावाची प्रकाशन संस्था तेथे स्थापन केली. स्वातंत्र्योत्तर भारतात आंग्लभाषी साहित्य लोकप्रिय करण्यात रायटर्स वर्कशॉपने मोठी भूमिका बजावली. याच प्रकाशन संस्थेतून विक्रम सेठ, प्रितीश नंदी, चित्रा बंद्योपाध्याय इत्यादी यशस्वी आंग्लभाषी भारतीय लेखक उदयास आले. पुढे लाल यांनी संस्कृत साहित्याचा इंग्रजीत अनुवाद करणे सुरू केले. त्यांचे हे भाषांतर मूळ संस्कृतातील लकब व भारतीयपण जपवून ठेवणारे आहे असे मानले जाते. यांमध्ये महाभारताचे व उपनिषदांचे त्यांनी केलेले भाषांतर विशेष प्रसिद्धी मिळवलेले आहेत.