पिंगळा
पिंगळा (शास्त्रीय नाव: Athene Brama) (संस्कृत नाव - कृकालिका, निशाटन, पिंगचक्षू, पिंगलिका, खर्गला) हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.
![]() | |
शास्त्रीय नाव | Athene brama (Temminck) |
---|---|
कुळ | घूकाद्य (Strigidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Spotted Owlet |
संस्कृत | पिंगला, कृकालिका |
हिंदी | खकूसट, खूसटिया |
वर्णन
संपादनपिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढऱ्या रेषा असतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.
वास्तव्य
संपादनपिंगळा पक्षी भारतभर सर्वत्र तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशात आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान तीन उपजाती आहेत. पिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.
खाद्य
संपादनपिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, पाली, उंदीर, आणि लहान प्राण्यांची छोटी पिले यांची शिकार करतो.
प्रजनन
संपादनसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल हा काळ पिंगळा पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपारीत, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले असते. किंवा त्याचे वास्तव्य दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
अन्य माहिती
संपादनपिंगळा सूर्यास्ताच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी दिसतो. म्हणून या वेळांना पिंगळावेळ असे म्हणले जाते. संस्कृत नाव कृकालिका म्हणजे पाली, सरडे खाणारा. (कृकल=सरडा)
संत काव्यातला पिंगळा
संपादनएकानाथादि संतांनी या पिंगळ्यांसाठी अनेक ’पिंगळा’ नावाच्या काव्यरचना लिहिल्या आहेत. त्यांतल्या काही ओळी :
पिंगळा महाद्वारीं | बोलि बोलतों देखा ||
डौर फिरवीतों | डुग डुग ऐका ||.......
x x x x x x x x x x x x x x x x x x x x x
हे जरी न ऐकाल | तरी दूसरा येईल ||
सरते शेवटी बा | काळ बांधून नेईल ||
काळ म्हणे यांत |आमचे काय जाईल||६||
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥
पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी ।
बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥
किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल ।
तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥
समज-गैरसमज, अंधश्रद्धा
संपादन- भविष्य सांगणाऱ्या पिंगळा जोशीला या पक्ष्याची भाषा समजते व त्या आधारे तो भविष्य सांगतो असे मानले जाते. त्यात काहीही तथ्य नाही.
- हा पक्षी घरातील मृत्यूची पूर्वकल्पना देतो असाही गैरसमज आहे. खरे तर पहाटेच्या वेळी पिंगळा हा आपले खाद्य शोधण्याच्या प्रयत्नात प्रतिध्वनी निर्माण करून इशारे करत असतो.
- याला वारंवार हाकलून लावल्यास मोठ्याने आवाज करून गोंगाट करतो, पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतो, तर काही ठिकाणी या पक्ष्यांचे ओरडणे कर्कश्श असल्याने या पक्ष्याला अशुभ मानतात. या साऱ्या अंधश्रद्धा आहेत.
- हिंदू संस्कृतीतील श्रद्धेप्रमाणे पिंगळा हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते.
हे सुद्धा पहा
संपादनचित्रदालन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |