नरतुरंग (इंग्रजी: Centaurus - सेन्टॉरस) दक्षिण खगोलातील सर्वात तेजस्वी तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी याने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता, आणि आधुनिक ८८ तारकासमूहांचा भाग आहे. ग्रीक पुराणकथांमध्ये नरतुरंग सेन्टॉर या काल्पनिक प्राण्याने दर्शवले जाते (असा प्राणी जो अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आहे). नरतुरंग मधील मित्र तारा सर्वात प्रसिद्ध ताऱ्यांपैकी एक आहे, जो सूर्यमालेपासून सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या शेजारील बीटा सेन्टॉरी आणि व्ही७७६ हे तारे आतापर्यंत शोध लागलेल्या ताऱ्यांमधील सर्वात मोठ्या आकाराचे तारे आहेत.

वैशिष्ट्ये

संपादन
 
नुसत्या डोळ्यांनी पाहिले असता दिसणारे नरतुरंग तारकासमूहातील तारे
 
दोन तेजस्वी तारे अल्फा सेन्टॉरी (डावीकडील) आणि बीटा सेन्टॉरी (उजवीकडील) आहेत. लाल वर्तुळामध्ये प्रॉक्झिमा सेन्टॉरी तारा दर्शवला आहे.

नरतुरंगाचे स्थान आकाशगंगेमध्ये असल्याने त्यामध्ये अनेक तारे आहेत. त्यामधील अल्फा आणि बीटा ताऱ्यांचा त्रिशंकू हा तारकासमूह शोधण्यासाठी वापर केला जातो. नरतुरंगमध्ये २८१ ताऱ्यांची दृश्यप्रत ६.५ पेक्षा कमी आहे, म्हणजे हे तारे एवढे तेजस्वी आहेत की नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. मित्र तारा सूर्यापासून सर्वात जवळील तारा आहे.[]

अल्फा सेन्टॉरी एक त्रैती तारा आहे ज्यामध्ये प्रॉक्झिमा सेन्टॉरी हा सूर्यापासून सर्वात जवळचा तारा आहे. या प्रणालीची दृश्यप्रत -०.२८ असून ती पृथ्वीपासून ४.४ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. यातील मुख्य आणि दुय्यम तारे पिवळ्या छटेचे तारे असून मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत -०.०१ आणि दुय्यम ताऱ्याची १.३५ आहे. प्रॉक्झिमा हा तिसरा तारा लाल बटू तारा आहे व त्याची दृश्यप्रत ११.० आहे. हा मुख्य आणि दुसऱ्या ताऱ्यापासून २ अंश लांब आहे आणि त्याचा आवर्तिकाळ दहा लाख वर्षे आहे. मुख्य आणि दुय्यम ताऱ्यांचा आवर्तिकाळ ८० वर्षे असून पृथ्वीवरून पाहिले असता ते २०३७ आणि २०३८ साली एकमेकांच्या सर्वात जवळ दिसतील.

मित्र ताऱ्याशिवाय बीटा सेन्टॉरी हा एक तेजस्वी द्वैती तारा नरतुरंगमध्ये आहे. हा या तारकासमूहातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तेजस्वी तारा आहे. मुख्य तारा ०.६ दृश्यप्रतीचा निळा राक्षसी तारा पृथ्वीपासून ५२५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दुसऱ्या घटक ताऱ्याची दृश्यप्रत ४.० आहे. गॅमा सेन्टॉरी हा २.२ दृश्यप्रतीचा आणखी एक द्वैती तारा नरतुरंगमध्ये आहे. यामधील दोनही तारे निळ्या रंगाचे तारे असून दोघांची दृश्यप्रत २.९ आहे. त्यांचा आवर्तिकाळ ८५ वर्षे आहे. या व्यतिरिक्त नरतुरंगमध्ये ३ सेन्टॉरी सारखे अनेक मंद द्वैती तारे आहेत.[]

नरतुरंगमध्ये अनेक चल तारे आहेत. आर सेन्टॉरी या चल ताऱ्याची दृश्यप्रत कमीत कमी ११.८ आणि जास्तीत जास्त ५.३ आहे. हा तारा पृथ्वीपासून २१०० प्रकाशवर्षे अंतरावर असून त्याचा आवर्तिकाळ १८ महिने आहे.[] व्ही८१० सेन्टॉरी हा आणखी एक चल तारा आहे.

बीपीएम ३७०९३ एक श्वेत बटू तारा आहे ज्याच्यातील कार्बनच्या अणूंची स्फटिक संरचना झाल्याचा अंदाज आहे. हिरे सुद्धा कार्बनचे वेगळ्या संरचनेचे स्फटिकी स्वरूप असल्याने बीटल्स या बॅंडच्या "ल्युसी इन द स्काय विथ डायमंड्स" या गाण्यावरून शास्त्रज्ञांनी या ताऱ्याचे टोपणनाव "ल्युसी" असे ठेवले आहे.[]

दूर अंतराळातील वस्तू

संपादन

ओमेगा सेन्टॉरी (एनजीसी ५१३९), याला तारकासमूहातील "ओमेगा" तारा असे म्हणले जात असले तरी तो नुसत्या डोळ्यांनी दिसणारा गोलाकार तारकागुच्छ आहे. १५० प्रकाशवर्षे व्यासाचा हा तारकागुच्छ पृथ्वीपासून १७,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा आकाशगंगेतील सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी तारकागुच्छ आहे, जो दुसऱ्या सर्वात मोठ्या तारकागुच्छापेक्षा दहा पट मोठा आहे.[] या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारकागुच्छाची दृश्यप्रत ३.७ असून तेजस्विता सूर्याच्या दहा लाख पटीपेक्षा जास्त आहे.[] याच्यामध्ये अंदाजे एक कोटी तारे आहेत, ज्यापैकी बहुतेक तारे पिवळे बटू तारे आहेत आणि काही लाल राक्षसी आणि निळे-पांढरे तारेसुद्धा आहेत. या ताऱ्यांचे सरासरी वय १२ अब्ज वर्षे आहे. त्यामुळे ओमेगा सेन्टॉरी हे अनेक वर्षांपूर्वी आकाशगंगेने गिळंकृत केलेल्या एखाद्या बटू दीर्घिकेचे केंद्रक होते अशी एक शंका वर्तवली जाते. नुसत्या डोळ्यांनी पाहिले असता ओमेगा सेन्टॉरी अस्पष्ट, अर्धा अंश व्यासाचा म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राएवढा दिसतो.[]

नरतुरंगमध्ये खुले तारकागुच्छ आहेत. एनजीसी ३७६६ हा पृथ्वीपासून ६३०० प्रकाश-वर्षे अंतरावरील नुसत्या डोळ्यांनी दिसणारा खुला तारकागुच्छ आहे. त्यामध्ये अंदाजे १०० तारे असून सर्वात तेजस्वी ताऱ्यांची दृश्यप्रत ७ आहे. एनजीसी ५४६० हा आणखी एक नुसत्या डोळ्यांनी दिसणारा पृथ्वीपासून २५०० प्रकाश-वर्षे अंतरावरील खुला तारकागुच्छ आहे. त्याची दृश्यप्रत ६ असून त्यात अंदाजे ४० तारे आहेत.[]

नरतुरंगमध्ये एनजीसी ३९१८ हा एक तेजस्वी ग्रहीय तेजोमेघ आहे. पृथ्वीपासून २६०० प्रकाशवर्षे अंतरावरील निळसर रंगाच्या या तेजोमेघाची दृश्यप्रत ८.० असून केंद्रीय ताऱ्याची दृश्यप्रत ११.० आहे. त्याचा रंग युरेनस सारखा असून आकाराने युरेनसपेक्षा तीन पट मोठा आहे.[]

नरतुरंगमध्ये अनेक दीर्घिकादेखील आहेत. एनजीसी ४६२२ ही पृथ्वीपासून २० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील (रेडशिफ्ट ०.०१४६) फेस-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. तीचे सर्पिल फाटे दोनही बाजूंनी गुंडाळले असल्याने तिची फिरण्याची दिशा शोधणे जवळपास अशक्य आहे. एनजीसी ५२५३ ही एक आकारहीन दीर्घिका आहे. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग जास्त आहे. तीच्यामध्ये एक मोठा तेजोमेघ आणि कमीत कमी १२ मोठे तारकागुच्छ आहेत.[] याव्यतिरिक्त एनजीसी ४९४५ सर्पिलाकार दीर्घिका आणि एनजीसी ५१०२ ही लंबवर्तुळाकार दीर्घिका या तारकासमूहामध्ये आहेत.[]

नरतुरंगमधील सेन्टॉरस ए (एनजीसी ५१२८) ही सक्रिय दीर्घिका पृथ्वीपासून सर्वात जवळील सक्रिय दीर्घिकांपैकी एक आहे. तीचे पृथ्वीपासूनचे अंतर १.१ कोटी प्रकाशवर्षे (रेडशिफ्ट ०.००१८३) आहे. तीच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर असून ते प्रचंड मोठे फवारे फेकत आहे, ज्याच्यातून सिंक्रोट्रॉन प्रक्रियेमुळे रेडिओ तरंग निर्माण होत आहेत. एनजीसी ५१२८ एक लंबवर्तुळाकार दीर्घिका आहे. तीच्यामध्ये धुळीचे मार्ग आढळले आहेत जे सामान्यत: लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे त्या दीर्घिकेच्या दुसऱ्या एखाद्या दीर्घिकेशी विलीनीकरण झाल्याने धुळीचे मार्ग दिसत असल्याचा अंदाज खगोलशास्त्रज्ञ वर्तवतात.[] तिची एकंदरीत दृश्यप्रत ७.० आहे.[] तिला उत्कृष्ट वातावरणात नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकते, त्यामुळे ती दीर्घिका नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्वात लांबच्या खगोलीय वस्तूंपैकी एक आहे.[]

एनजीसी ४६५०ए ही पृथ्वीपासून १३.६ कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील (रेडशिफ्ट ०.०१) ध्रुवीय कडा असणारी दीर्घिका आहे. तिच्या मध्यभागी जुन्या ताऱ्यांचे केंद्रक आहे जे लंबवर्तुळाकार दीर्घिकेसारखे दिसते आणि त्याच्या भोवती फिरणारे तरुण तारे आणि वायुचे कडे आहे. या कड्याचे प्रतल केंद्राच्या तुलनेने कललेले आहे, जे या दीर्घिकेचे सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी दुसऱ्या दीर्घिकेशी झालेल्या टक्करीमुळे झाले आहे असे सुचवते. कृष्णद्रव्याच्या अभ्यासांमध्ये या दीर्घिकेचा उल्लेख येतो, कारण या दीर्घिकेच्या कड्यातील तारे त्यांच्या एकत्रित वस्तुमानाच्या तुलनेत जास्त वेगाने फिरत आहेत. त्यामुळे असे सूचित होते, की या दीर्घिकेभोवती कृष्णद्रव्याचे तेजोमंडल आहे जे जास्तीचे वस्तुमान पुरवते.[]

सेन्टॉरस समूह हा पृथ्वीपासून सगळ्यात जवळील दीर्घिकांच्या समूहांपैकी एक आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १६ कोटी प्रकाशवर्षे (रेडशिफ्ट ०.०११४) आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e f g h Ridpath & Tirion 2001, पाने. 108-111.
  2. ^ "Discovery of largest known diamond" (इंग्रजी भाषेत). 2008-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ a b c Wilkins Jamie, Dunn Robert (2006). 300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe (इंग्रजी भाषेत). Buffalo, New York.
  4. ^ Dalrymple 2013, पान. 40.
  5. ^ Dalrymple 2013, पान. 41.
  6. ^ Steinicke 2007, पान. 182.