दापोली तालुका

दापोली

दापोली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. दापोली शहर त्याचे मुख्यालय आहे. दापोली हे मुंबईपासून २१५ किलोमीटर (१३५ मैल) अंतरावर आहे.

  ?दापोली तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग कोकण
भाषा मराठी
तहसील दापोली तालुका
पंचायत समिती दापोली तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ०२३५८
• +४१५७१२
• महा -०८

दापोलीला कॅम्प दापोली असे म्हणले जाते कारण ब्रिटिशांनी दापोलीला त्यांचा शिबिराची (कॅम्प)ची स्थापना केली होती. बऱ्याच उच्च पदवी ब्रिटिश अधिकाऱ्यांची अधिकार गावे या टाऊन मधे होती. दापोलीत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे. दापोली तालुका व शहर हे दापोली नगर परिषदेने प्रषाशित आहे. दापोली शहराची गावदेवी कालकाई देवी आहे. शहरातील काळकाईकोंड या ठिकाणी गावदेवीचे मंदिर आहे. मौजेदापोली गावची जानाई गावदेवी आहे. दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

.

हवामान

संपादन

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

कॅम्प दापोलीचा इतिहास

संपादन

१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली[].

स्थान

संपादन

दापोली शहर व ग्रामीण भाग हा सह्याद्रीच्या पायथ्याचा खेड रांगेतून वेगळा आहे. दापोली तालुक्याला सुमारे ५० किलोमीटर (३५ मैल) केलशी, बुरोंडी ते दाभोळच्या बंदरा पर्यंत समुद्र किनारा आहे. किनारपट्टी कोकणच्या ईतर भागापेक्षा सामान्य वैशिष्ट्यांमधे फारशी भिन्न आहे. प्रमुख नद्या उत्तरेला भारजा आणि दक्षिणेला वशिष्ठी आहे. जोगेळे नावाची एक छोटी नदी आहे जी सारंग गावात समुद्राला मिळते. शहराच्या ८०० फुट (२४० मिटर)च्या समुद्रसपाटीवर आहे. अरबी समुद्रापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.

मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे.

दापोली शहर

संपादन

आसूद गावापासून दापोली केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग अचंभीत करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते. दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसीत करण्यात आली आहेत. या पर्यटन केंद्रांमधून झाडावरून नारळ काढणे, जलक्रीडा, बैलगाडीची सफर, कलम करणे, नारळ सोलणे, चूलीवर स्वयंपाक करणे, रात्री जाखडी खेळणे, कोकणी भोजन प्रकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते.

दापोली तालुक्यातील गावे

संपादन
  1. अडखळ
  2. आगरवायंगणी
  3. आघारी
  4. आडे
  5. आसोंड
  6. आवाशी
  7. आपटी
  8. आसूद
  9. आतगाव
  10. आंजर्ले
  11. आंबवली खुर्द
  12. आंबवली बुद्रुक
  13. इनामपांगारी
  14. इलणे
  15. उंबार्ली
  16. उटंबर
  17. उन्हवरे
  18. उर्फी
  19. उसगाव
  20. उंबरघर
  21. उंबरशेत
  22. ओणनवसे
  23. ओणी
  24. ओलगाव
  25. करजगाव
  26. करंजाणी
  27. करंजाली
  28. कर्दे
  29. कलंबट
  30. कळकी
  31. कवडोली
  32. कात्रण
  33. कादिवली
  34. कांगवई
  35. किन्हळ
  36. कुडावळे
  37. कुंभवे
  38. कॅम्प दापोली
  39. केळशी
  40. केळील
  41. कोळथरे
  42. कोळबांद्रे
  43. कोंगाळे
  44. कोंढ्ये
  45. खारवते
  46. खेर्डी
  47. गव्हे
  48. गावतळे
  49. गावरई
  50. गिम्हवणे
  51. गुडघे
  52. चांदिवणे
  53. चिखलगाव
  54. चिंचाली
  55. चंडिकानगर
  56. जामगे
  57. जालगाव
  58. जुईकर
  59. जोगळे
  60. टालसुरे
  61. टांगर
  62. टेटवली
  63. डवली
  64. ताडाचाकोंड
  65. ताडील
  66. तामसतिर्थ
  67. तामोंड
  68. तेरेवायंगणी
  69. तुरवडे
  70. तेलेश्वर
  71. दमामे
  72. दळखण
  73. दाभिळ
  74. दाभोळ
  75. दुमदेव
  76. देगाव
  77. देर्दे
  78. देहेन
  79. देवके
  80. धानकोली
  81. नवशी
  82. नवसे
  83. नानटे
  84. नारगोली
  85. निगडे
  86. पंदेरी
  87. पन्हाळेकाजी
  88. पाचवली
  89. पडले
  90. पालगड
  91. पावनळ
  92. पांगारी तर्फे हवेली
  93. पीचडोली
  94. पिसई
  95. पोफलवणे
  96. पंचनदी
  97. पंढरी
  98. फणसु
  99. फरारे
  100. बांधतिवरे
  101. बुरोंडी
  102. बोरघर
  103. बोरथल
  104. बोरीवली
  105. बोंडीवली
  106. ब्राह्मणवाडी
  107. भडावळे
  108. भाटघर
  109. भाटी
  110. भानघर
  111. भोपण
  112. भोमडी
  113. मळे प्रभाकर पां
  114. डुरंग
  115. महाळुंगे
  116. माटवण
  117. माथेगुजर
  118. माळवी
  119. महामाईनगर
  120. मांदिवली
  121. मुंगीज
  122. मुरूड
  123. मुरडी
  124. मौजेदापोली
  125. राजापूर
  126. रावतोली
  127. रुखी
  128. रेवाली
  129. रोवले
  130. लाडघर
  131. लोणवडी
  132. वडवली
  133. वाणोशी तर्फे पंचनदी
  134. वणौशी तर्फे नातु
  135. वणंद
  136. वळणे
  137. वाकवली
  138. वाघवे
  139. वाघिवणे
  140. वावघर
  141. वांझलोली
  142. विरसई
  143. विसापूर
  144. वेलवी
  145. शिरखल
  146. शिरवणे
  147. शिरशिंगे
  148. शिरसाडी
  149. शिरसेश्वर
  150. शिरसोली
  151. शिर्दे
  152. शिवनारी
  153. शिवाजीनगर (आडे)
  154. शिवाजीनगर (गिम्हवणे)
  155. शिवाजीनगर (साखलोली)
  156. सडवे
  157. सडवली
  158. साकुर्डे
  159. सातांबे
  160. साखलोली
  161. सातेरे तर्फे नातु
  162. सातेरे तर्फे हवेली
  163. सारंग
  164. सालदुरे
  165. सुकोंडी
  166. सोवेली
  167. सोंडेघर
  168. हर्णे
  169. हातीप

समाज जीवन

संपादन

दापोली तालुक्यात कुणबी, गवळी, कोळी, भंडारी, आगरी, सोनकोळी, डोंगरीकोळी, भोई, खारवी, मराठा, सुतार, कुंभार, चांभार, माळी, साळी, ब्राह्मण, कातकरी, मुसलमान, बौद्ध हे समाज मुळ भूमिपुत्र असुन यातील भंडारी, गवळी, कुणबी, मराठा, बौद्ध समाजाची मोठी वस्ती जवळ जवळ सर्वच गावांमध्ये आहे. खाडी किनारा व समुद्र किनारपट्टीच्या भागात प्रामुख्याने कोळी, सोनकोळी, भंडारी, आगरी, भोई, खारवी, मुसलमान समाजांची वस्ती आहे. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक नोकरी धंद्यासाठी मुंबई, ठाणे, वसई भागात स्थाईक झाले आहेत. प्रत्येक गावाचे गावदेवी हे श्रद्धास्थान असुन गावातील सर्वच जाती धर्माच्या लोकांची गावदेवी वरती नितांत श्रद्धा आहे. गावदेवीमातेचा पालखी सोहळा व जत्रा हे वार्षिक सण साजरे केले जातात.[] त्याच प्रमाणे गणपती, शंकर, हनुमान[], भैरी (काळभैरव), राम, राधाकृष्ण, दत्त, विठ्ठलरुक्मिणी, खंडोबा, म्हसोबा, जागेवाला, भवानी, जोगेश्वरी, काळकाई[], सोमजाई, झोलाई, वाघजाई, बापदेव, बापुजी, धावजी, सातआसरा ही दैवते आहेत. दापोली शहर व ग्रामीण भागातील गावांमधे स्थानिक भूमिपुत्रांबरोबर बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. गणपती व होळी हे गाववाल्यांचे मुख्य सण आहेत.

पूर्वी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये खोती-वतनदारी पद्धत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाऱ्या कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती.खोत हे प्रामुख्याने मराठा, ब्राह्मण आणि मुसलमान समाजातील असत. खोत ब्रिटिश सरकारचे नोकर होते. कोकणातील अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात नारायण नागो पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ आॅक्टोंबर १९३३ मध्ये चरी कोपरमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला.

कोकणामध्ये अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले. २७ सप्टेंबर १९३३ मध्ये चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात याच लढ्यात शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना उत्पन्नातील योग्य वाटा मिळत नसल्यामुळे त्यांनी संपावर जावे असे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यांचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे त्यांनी शेती करणेच बंद केले. खोतांना वाटले किती दिवस आंदोलन सुरू राहील. खायला अन्न मिळेना की संप मागे घेतला जाईल. परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. शहरात जाऊन मिळेल ते काम केले. महिलांनी भांडी - धुण्याचे काम केले. या आंदोलनाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीला जाऊन आंदोलकांची भेट घेतली. जुलूम बंद पाडण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले व त्यांनी कूळ कायदा करण्यास शासनास भाग पाडले. अखेर १९३९ मध्ये हा संप मागे घेण्यात आला.

चरी कोपरच्या सभेत शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन करण्यात आले. २५ गावातील शेतकऱ्यांनी शेती न कसण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा वर्ष हा संप सुरू होता. अनेकांची उपासमार झाली. काहींनी एक वेळ जेवण करून दिवस काढले परंतु सरकारच्या दबावाला बळी पडले नाहीत. अखेर तत्कालीन इंग्रज राजवटीतील सरकारला संपाची दखल घ्यावी लागली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सहा वर्षांनी १९३९ मध्ये हा संप मिटला. या संपामुळे राज्यात कूळ कायदा तयार करण्यात आला होता. दापोली तालुक्यात कूळ कायद्याने अन्यायकारक खोती पद्धत संपवली.

ऐतिहासिक दाभोळ बंदर

संपादन

दाभोळ-दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सडयावरून खाली दिसणारे मनोहरी दृश्य कुणालाही वेड लावेल. चिपळूणकडून येणारी वाशिष्टी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळ गड किल्ला, टाळकेश्वराच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारुती मंदिर, समुद्रकिना-याला लागूनच वाढलेले सुरूचे दाट वन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड, आपल्या हिरव्यागार झावळय़ांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत आणि जाणा-यांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तर ही शोभा अवर्णनीय असते. कोकणातल्या समुद्राकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातावरण असते. पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला प्रचंड घडामोडींच्या इतिहासाला रक्तरंजित गूढ पडदा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळ इतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. दाभोळ किना-यावर सध्या कार्पोरेट जगताचे लक्ष केंद्रित झाले असून येथे मुंबई प्रवासी बोट पुन्हा सुरू झाल्यास पर्यटन उद्योगालाही चालना मिळणार आहे. कोकणातली पहिली दाभोळ-धोपावे ही प्रवासी फेरी बोट माजी आ. डॉ. चंद्रकांत मोकल यांच्या प्रयत्नाने सुरू झाल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

टॉमेलीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुस्लिम यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदरात येत . त्यामुळे दाभोळला बाबुलहीद म्हणजे मक्केचा दरवाजा म्हणत. इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर इथे वस्त्र विणत असत. अगदी १०० वर्षापूर्वीपर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि घोटय़ांच्या लयबद्ध ठोक्यांवर इथे सुंदर वस्त्र विणली जात होती. शिवशाहीतील आरमारात येथील भंडारी समाजाचे प्रमुख होते. अशा इतिहासाच्या ब-याच खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरावर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात.

तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदू राजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम किनारपट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली आणि या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्क, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून सोळाव्या शतकाच्या अखेपर्यंत जवळपास ३०० वर्षापासून अधिक काळ मुसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींनी आपल्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुस्लिम सत्ताधीशांनाही बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया यांच्याशी युद्धे करावी लागली आणि इथे हजारोंची कत्तल वेळोवेळी झाली. त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात जिकडेतिकडे कबरीच कबरी दिसतात. दाभोळच्या पश्चिमेला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात.

३-४ शतकांच्या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला राज्यकारभार केला, जे लढाईत शहीद झाले, त्यांची गणना साधुसंतात झाली. त्यांचे दर्गे बांधण्यात आले. दाभोळ परिसरातील देर्दे हद्दीत असलेल्या अमीरूद्दीन बालापीर (बाला म्हणजे उंच ठिकाण) हा हिंदू-मुसलमानात विशेषतः दर्यावर्दी समाजात अत्यंत आदराचे स्थान असलेला पीर समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर आहे. दाभोळ गावातला सर्वात प्रसिद्ध पीर म्हणजे आझमखान पीर, या पिराला १८७४ सालात ब्रिटिश सरकारने दिलेली १८ रुपयांची सनद आजही चालू असून या दग्र्याचे पुजारी इनुस मुजावर यांना मिळते.

बालापीरलाही १८७० पासून ३० रुपयांची सनद असून ती परंपरेने नवसे येथील मुजावर घराण्यास मिळते. आझमखान पीर हे ठिकाण दाभोळच्या मध्यभागी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. निसर्गाच्या कुशीतील अत्यंत शांत ठिकाणी झाडीमध्ये हा दर्गा आहे. याच्या आजूबाजूला असलेल्या लहान-मोठया असंख्य कबरी आणि तेथील निरव शांतता गूढ वाटते. मन अंतर्मुख करते. विशेषतः आझमखानच्या भव्य कबरीजवळ उभे राहिले की, इथे काही इतिहास घडला असावा याचा सहज साक्षात्कार होतो. इनुस मुजावर यांच्याजवळ ११० वर्षापूर्वीची एक हस्तलिखित वही सापडली. त्यातील पार्शियन आणि उर्दू मजकूर माझे मित्र आफाक कुरेशी आणि समशुद्दीन बामणे यांच्या सहकार्याने वाचून काढली. त्यात आझमखान यांच्याविषयी लिहिले आहे. मुजावर यांच्याकडील जुन्या हस्तलिखित आझमखान हुरमुजहून धर्म प्रचारासाठी हिजरी सन ६८९ मध्ये आले असे आहे. परंतु, बर्जेस यांच्या फिरस्तामध्ये आझमखान हिजरी ९०० मध्ये म्हणजे इ. स. १४९४ मध्ये आल्याची नोंद आहे. त्या वेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. नागोजीने रत्‍नागिरीपासून समुद्रात आणि जमिनीवर या परकियांशी टक्क र दिली. दाभोळला तुंबळ रणसंग्राम झाला. त्यात आझमखान मरण पावले. परंतु, नागोजीचा पराभव झाला. त्याआगोदर (१३४७ ते १५००) येथे बहामनी राजवटीत दाभोळचे नाव मुस्तफाबाद होते. आझमखान याच्या मुलाने ते बदलून हामजाबाद असे ठेवले. येथील जंगल साफ केले आणि गाव नव्याने वसवले, सुधारणा केल्या, बाजार सुरू केला. आझमखान यांचे शिर तवसाळ येथे आहे आणि धड दाभोळला आहे. त्याचा उर्स २७ रजाब (शबेमेराज) मोठया इतमानाने साजरा होतो.

१९४९ साली औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा या जिल्हय़ाचा सुभेदार पीर अहमद अब्दुल्ला याने बांधलेली जुम्मा मशिदही भग्नावस्थेत आहे आणि तिसरी एक जुनी प्रचंड मशिद समुद्रकिनारी सादत अली यांच्या स्मरणार्थ १५५८ मध्ये बांधलेली आहे. या दोन्ही वास्तू शियापंथी असल्याचा कयास आहे. जामा मशिदीसमोर मिळालेला शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. दाभोळच्या धक्क्यावर उतरताच उभी असलेली जुनी ऐतिहासिक भव्य मशिद आपले लक्ष वेधून घेते.

मुंबईचा भाऊचा धक्का सोडल्यास ज्या धक्क्याला थेट बोट लागत असे, असे कोकणातले एकमेव बंदर म्हणजे दाभोळचा धक्का. कोकण किना-यावर हाजी कासम कंपनीने ज्या बोटी आणल्या त्यातील ‘टिळक’ व ‘बुवा’ या बोटी एकमजली होत्या. त्या कोळशावर चालत असत. अलिबाग, रेवदांडा, बोर्ली, जंजिरा, दाभोळ, जयगड, मुसाकाझी, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला, गोवा अशा बंदरातून त्यांचा प्रवास होता. त्यानंतर दी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीने बोटी सुरू केल्या. मुंबईला भाऊचा धक्का पहिल्यांदा बांधल्यानंतर १८९८ साली सुमारास दाभोळचा धक्का बांधला गेला. त्यानंतर आरसीसी धक्का १९६८-६९ साली केंद्र सरकारने बांधला. १२ जानेवारी १९६९ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री व्ही. के. आर. व्ही. राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि त्यानंतर बोट वाहतूक तिस-या दिवसापासून बंद झाली ती कायमचीच, अशी माहिती येथील जाणकार देतात.

दापोली कृषी विद्यापीठ

संपादन
  • स्थापना

कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करून येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. दोन वर्षांनी कोकणातील तीन शेती शाळाही या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या. गेल्या 42 वर्षात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा लक्षणीय विस्तार झाला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेले अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने अगदी स्थापनेपासून कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केले आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले. त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे नोकरीसाठी धावणारा तरुणवर्ग आता कोकणात स्थिरावत असून शेती व्यवसायाकडे वळू लागला आहे. इतकेच नाही, तर कोकणातील अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

  • विस्तार

विद्यापीठाचे मुख्य केन्द्र दापोली येथे असून, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. दिनांक 12 फेब्रुवारी 2001 रोजी कोकणचे सुपुत्र आणि द्रष्टे लोकनेते कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले. राज्यात पशुवैद्यक विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय त्या विद्यापीठाकडे गेले. आजमितीस या विद्यापीठामध्ये कृषी, मत्स्य आणि कृषी अभियांत्रिकी अशा तीन विद्याशाखा आहेत.

  • अभ्यासक्रम

दापोली (रत्‍नागिरी) येथे कृषी, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र आणि उद्यानविद्या तसेच रोहा (रायगड) येथे काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम व मुळदे (सिंधुदूर्ग) येथे उद्यान महाविद्यालय अशी सहा घटक महाविद्यालये असून रत्‍नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. याशिवाय विद्यापीठाची मान्यताप्राप्त सहा कृषी व एक उद्यानविद्या महाविद्यालय, दोन कृषी पणन व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये, चार अन्नतंत्र महाविद्यालये, चार जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि एक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. अशाप्रकारे आठ विषयांतील पदवी शिक्षणाची सोय विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. याशिवाय, कृषी विद्याशाखेमध्ये अकरा विषयांत, मत्स्य विद्याशाखेत सहा विषयांत आणि कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पाच विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्याशाखेत नऊ आणि मत्स्य विद्याशाखेत सहा विषयात पीएच्.डी. शिक्षण दिले जाते. कृषी अभियांत्रिकीच्या तीन विषयात पीएच्.डी. शिक्षणाची सुविधा सुरू आहे. विद्यापीठाच्या निम्नस्तर कृषी विद्याशाखेंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे विद्यापीठाची घटक कृषी तंत्र विद्यालये आहेत. शिवाय पालघर जिल्ह्यातील कोसबाडहिल येथील दोन कृषी तंत्र विद्यालये तसेच 34 खाजगी मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. घटक तंत्र विद्यालयामध्ये दोन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम तर विना अनुदानित तंत्र विद्यालयामध्ये 3 वर्ष कालावधीचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच शिरगांव (रत्‍नागिरी) येथे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहे याशिवाय बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकविला जातो.

दापोली पर्यटन स्थळे

संपादन
 
केशवराज मंदिर, आसूद
चित्र:केशवराज मंदिर पायऱ्या (आसूदगाव दापोली)महाराष्ट्र.jpg
केशवराज मंदिर पायऱ्या (आसूदगाव दापोली)महाराष्ट्र
  • दाभोळ बंदर - दाभोळ हा एक बंदर आहे जो दापोलीच्या 28 किमी (17 मैल) दक्षिणेला आहे. दाभोल जवळ दाभोळ पॉवर प्लांट एनरॉन आहे. रत्‍नागिरी गॅस ऍण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) ने हा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. वीज स्टेशन भारत सर्वात मोठी ऑपरेटिंग गॅस आधारित संयुक्त चक्र वीज स्टेशन आहे.


  • हरणई बंदर - हे महाराष्ट्रातल्या मासेबाजारांतील सर्वात मोठे पुरवठादार मानले जाते. लॉबस्टर आणि कोळंबीसह अनेक प्रकारचे समुद्री खाद्यपदार्थ येथे उपलब्ध असतात.


  • कड्यावरचा गणपती - आंजर्ले कड्यावरचा गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. या प्राचीन आणि भव्य गणेश मंदिराची उभारणी सुमारे 1150च्या सुमारास लाकडी खांबांवर केली होती. 1768 ते 1780च्या कालखंडात याचे नूतनीकरण करण्यात आले. नारळाची झाडे, सुपारी वृक्ष, सुवर्णदुर्ग किल्ला, निळा समुद्र आणि आसपासच्या टेकड्यांवरील घनदाट जंगलांचे ईथुन भव्य दृश्य दिसते[].


  • श्री केशवराज मंदिर - हे ठिकाण दापोली आणि आसुद पुल दरम्यान आहे. प्रवेश डबकेवाडीमार्गे आणि लहान नदी ओलांडून पुढे गेल्यावर, खडतर चढावा मार्गे आहे. या उंचीवर, ताजे पाणी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि वृक्षाच्या खोडापासून उगम आहे असे म्हणले जाते.[]


  • मुरुड बीच - मुरुड हा दापोलीपासून जवळजवळ 12 किमी (7.5 मैल) समुद्रसपाटीवरील लहान गाव आहे. तिथे सुंदर समुद्र किनारा आहे.


  • पन्हाळेकाजी लेणी - दापोली-पांगारी रस्त्यावर स्थित, पन्हाळेजी गुहांमधे खेड मार्गे किंवा वाकवली आणि टेटवली येथुन प्रवेश करता येतो. कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमाजवळ हे स्थान खोल दरीमध्ये आहे. तेथे सुमारे 29 कोरीव लेणी आहेत.


  • पालगड

मंडणगडपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर दापोली तालुक्यातील पालगड येथे पूज्य साने गुरुजींचे जन्मगाव आहे. या ठिकाणी पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जिवनातील अनेक प्रसंग छायाचित्रांच्या रूपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. गावातील प्राथमिक शाळेत गुरुजींचे प्राथमिक शिक्षण झाले होते. ट्रेकींगची आवड असल्यास गावालगतच असलेल्या पालगड किल्ल्यावर जाऊन प्राचीन अवशेष पाहता येतात. मात्र किल्ल्याची भटकंती करतांना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी.


  • सुवर्णदुर्ग किल्ला – सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णे बंदरापासून साधारणपणे १ किमी अंतरावर समुद्रात असलेल्या बेटावर बांधलेला आहे. ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे. किल्ल्याला १५ बुरुज असून किल्ल्याची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आणि पायरीवर कासव कोरले आहे. किल्ल्यावर वाड्याचे अवशेष असून धान्यकोठारे, पाण्याचे तलाव आणि टाके आहे. ह्या किल्ल्याचे बांधकाम शिलाहारकालीन असून १६व्या शतकात किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६० च्या सुमारास हा किल्ला शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात सामील केला आणि डागडुजी करून किल्ला बळकट केला.


  • कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला – हे तिन्ही किल्ले सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी हर्णे समुद्रकिनाऱ्यावर बांधले आहेत. तिन्ही किल्ले चिंचोळ्या भूभागाने हर्णे बंदराला जोडले आहेत. फतेदुर्गाची समुद्राच्या दिशेला असलेली थोडीशी तटबंदी आणि कनकदुर्ग व फतेदुर्ग यांना जोडणारा दगडी पूल वगळता बाकी वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. किल्ल्यावर सद्यस्थितीत कोळी लोकांची वसाहत आहे. कनकदुर्ग किल्ला समुद्रात घुसलेल्या कातळाच्या माथ्यावर बांधला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या असून जवळच डाव्या हाताला दगडी बुरुज आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि थोडीशी तटबंदी साबूत आहे. सद्यस्थितीत किल्ल्यावर दीपगृह आहे. तिन्ही किल्ल्यांमध्ये बऱ्यापैकी सुस्थित असलेला किल्ला म्हणजे गोवा किल्ला.


  • पर्णालक दुर्ग – हा किल्ला पन्हाळेकाजी लेण्यांच्या वरच्या भागात एका टेकडीवर आहे. हा भूप्रदेश साधारणपणे ११व्या शतकात शिलाहार राजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. शिलाहार राजा अपरादित्य (इ.स. ११२७ ते ११४८) याने कदंब राजसत्तेकडून हा भूभाग जिंकून घेतला. अपरादित्यने आपला मुलगा विक्रमादित्य याला कोकण प्रांताचा अधिपती बनवले. आजचे पन्हाळे गांव ही शिलाहारांची राजधानी. त्यावेळी गावाचे नाव होते प्रणालक. म्हणून हा प्रणालक दुर्ग. किल्ल्यावर असलेल्या वास्तू काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. किल्ल्यावर झोलाईदेवीचे मंदिर आहे. शासनाने डांबरी रस्ता बांधला असल्यामुळे झोलाई देवीच्या मंदिरापर्यंत गाडी घेऊन जाता येते. पण ज्यांना किल्ला चढायचा असेल त्यांनी पन्हाळे गावाच्या थोडे पुढे एक वाट डावीकडे जाते, त्या वाटेने किल्ला चढायला सुरुवात करावी. हा किल्ल्यावर जाणारा राजमार्ग. या वाटेने जाताना पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेवर एक पाण्याचे टाक सुद्धा आहे. येथे किल्ला होता हे सांगणारे दोनच अवशेष आपल्याला दिसतात आणि ते म्हणजे पायऱ्या आणि पाण्याचे टाके.


  • उन्हवरे / फरारे - गरम पाण्याचे कुंड (स्प्रिंग्स) दापोलीपासून 35 किमी (22 मैल) उंचावर गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. वकावली पासून 21 किमी (13 मैल) व टेटवली पासून 17 किमी (11 मैल) अंतरावर आहेत. आसपासच्या भागातले लोक व पर्यटक येथे येतात जे गरम सल्फर वॉटर स्प्रिंग्समध्ये आंघोळ करण्यासाठी येतात, त्वचेचे आजार या गरम पाण्याने बरे होतात.


  • श्री वाघेश्वर मंदिर – केशवराज मंदिरापासून अवघ्या २-३ किमी वर वाघेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या सभागृहात लाकडी खांब असून त्यांच्यावर पुराणातील प्रसंग कोरलेले असून गाभाऱ्यात असलेले शिवलिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, काळभैरव आणि झोलाईदेवी इ. देवतांची मंदिरे आहेत. वाघेश्वर मंदिर नदीच्या काठावर *असून नदीला सुंदर घाटसुद्धा बांधला आहे.


  • श्री विमलेश्वर मंदिर - हे आंजार्ले जवळील मुर्डी गावात स्थित आहे, काड्यावराचा गणपती पासून फक्त 1 किमी. मंदिर सुमारे 1200 वर्षे जुने आहे आणि बांधकाम अजूनही मजबूत आहे.


  • श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ

दापोलीपासून 30 किलोमीटर अंतरावर श्री चंडिकादेवीचे जागृत देवस्थान आहे. दाभोळच्या खाडीपासून 5 किलोमीटरवर हे मंदिर आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील एकसंध पाषाणात कोरीव काम करून देवीची मुर्ती आणि गाभारा उभारण्यात आला आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला भेट दिल्याचे येथे सांगितले जाते.<ref>"chandika mandir dabhol | chandika mandir dapoli". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.</


कोंढे दापोली

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
  2. ^ "कॅम्प दापोलीची गोष्ट". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.
  3. ^ "दापोलीच्या लोककला | Folk Cultures of Dapoli | Taluka Dapoli". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.
  4. ^ "दापोलीतील हनुमान जयंती- एक आनंदमय उत्सव". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.
  5. ^ "Kalkai Temple Dapoli | kalkai devi mandir | kalkai devi | kalkai mandir dapoli". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.
  6. ^ "Kadyavarcha Ganpati Mandir | Temples in dapoli". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Keshavraj Temple | Dapoli". talukadapoli.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-19 रोजी पाहिले.

1.^ "दापोली विकासपिडीया". 2.^ "District Census Handbook" (PDF). Census of India. p. 44. Retrieved 16 April 2016. 3.^ Dapoli sets example by shunning plastic - The Times of India on Mobile http://timesofindia.com/city/pune/Dapoli-sets-example-by-shunning-plastic/articleshow/14221597.cms