त्र्यंबक बापूजी ठोंबरे

(त्र्यंबक बापुजी ठोंबरे या पानावरून पुनर्निर्देशित)


बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली.

त्र्यंबक बापूजी ठोंबरे
जन्म नाव त्रंबक बापूजी ठोंबरे
टोपणनाव बाल कवी
जन्म १३ ऑगस्ट १८९०
धरणगाव, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ५ मे १९१८
जळगाव, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील बापूजी ठोंबरे

बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह. ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.[]

काव्यपरिचय

संपादन

बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.

रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे

संपादन

विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमाणूस व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे.

उदासीनता

संपादन

बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले.

बालकवींच्या प्रसिद्ध कविता

संपादन

बालकवींच्या कविता असलेली पुस्तके

संपादन
  • फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता (कुसुमाग्रज- वि.वा. शिरवाडकर). ह्या संग्रहात ५७ कविता आहेत.
  • बालकवींच्या निवडक कविता (संपादक - ना.धों. महानोर). या संग्रहात ३१ कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही आहेत.
  • बालकवींच्या बालकथा (आत्मकथन)
  • बालकवींच्या बालकविता (कवितासंग्रह, या संग्रहात २६ कविता आहेत)
  • बालविहग (कवितासंग्रह, संपादक - अनुराधा पोतदार, या संग्रहात एकूण ७५ कविता आहेत.)
  • समग्र बालकवी (संपादक - नंदा आपटे)

बालकवींवर लिहिली गेलेली पुस्तके

संपादन
  • बालकवि (कृ.बा. मराठे)
  • बालकवी (विद्याधर भागवत)
  • बालकवी : मराठी कवी (व्यक्तिचित्रण, डॉ. दमयंती पांढरीपांडे)
  • बालकवी आणि सुमित्रानंदन पंत - एक अभ्यास (मराठी आणि हिंदीतील निसर्गकवी (पद्मावती जावळे)
  • त्रिदल : बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता (संपादक- डॉ. दत्तात्रय पुंडे; डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस-पुणे, प्रथमावृत्ती: १५ ऑगस्ट १९९३) या संग्रहामध्ये संपादकांनी बेचाळीस पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना लिहिली असून त्यामध्ये उपरोक्त तिन्ही कवींच्या सोळा सोळा कवितांचा समावेश केला गेला आहे.

अधिक वाचन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, पृष्ठे ३१८-३२२