बाळ सीताराम मर्ढेकर

मराठी कवी व लेखक
(बा.सी. मर्ढेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

बाळ सीताराम मर्ढेकर
जन्म नाव बाळ सीताराम मर्ढेकर
जन्म डिसेंबर १, १९०९
मृत्यू मार्च २०, १९५६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील सीताराम मर्ढेकर

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
मर्ढेकरांची कविता कविता संग्रह मौज प्रकाशन
रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी तीन कादंबऱ्या मौज प्रकाशन
सौंदर्य आणि साहित्य मौज प्रकाशन
कला आणि मानव मौज प्रकाशन

मर्ढेकरांवरील पुस्तके

संपादन
  • बाळ सीताराम मर्ढेकर (चरित्र, यशवंत मनोहर)
  • मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ, (खंड १, २). (डॉ. विजया राजाध्यक्ष) : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्‍त ग्रंथ
  • ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’ लेखक- श्रीनिवास हवालदार, प्रकाशक- कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे - (प्रकाशन वर्ष २०२१) या पुस्तकात बा.सी. मर्ढेकर आणि अन्य १३ प्रसिद्ध कवींच्या कवितांचा संग्रह आणि रसग्रहण आहे.[]

पुरस्कार

संपादन

इ.स. १९५६चा साहित्य अकादमी पुरस्कार 'सौंदर्य आणि साहित्य'साठी.

  • १९९३ साली विजया राजाध्यक्ष यांना 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
  • मर्ढेकरांच्या कविता, त्यांच्याबद्दल केले गेलेले लेखन या सगळ्यांचा वेध घेणारे पुस्तक नागपूरच्या विजयराजे ऊर्फ डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे यांनी त्यांच्या ’मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र आणि काव्य’ या ८१५ पानी ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी विजयराजे यांनी मर्ढेकरांचा ३० वर्षे अभ्यास केला होता.
  • याच विषयावर समीक्षक के.रं. शिरवाडकर यांनी ‘मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
  • डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षेचा अंतःस्वर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२ या ग्रंथात मर्ढेकरांच्या 'ओहोटीच्या काठावर' आणि 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या' या कवितांवर रसग्रहणात्मक लेख असून याच ग्रंथात ' मर्ढेकरांचा सौंदर्यविचार : निर्मितिप्रक्रियेचा आलेख' हा लेखसुद्धा आहे.
  • मर्ढेकर स्मारक सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्‍यातच, सातारा शहरापासून उत्तरेला 20 किमी अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावर बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे हे मूळ गाव आहे. येथे मर्ढेकरांच्या मूळ गोसावी घराण्याचा एक मठ असून श्रीरामाचे मंदिरही आहे. स्वतः मर्ढेकर या गावात फारसे राहिले नसले तरीही आकाशवाणीच्या नोकरीतील निवृत्तीनंतर मर्ढे येथे येऊन शेती करावी, असे स्वप्न मर्ढेकरांनी उराशी बाळगले होते. मात्र ते पूर्णत्वास गेले नाही. "कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो', ही कविता याच कृष्णानदीकाठी मर्ढेकरांनी लिहिली असल्याचे सांगणारे गावकरी आजही गावात आहेत. सन 1962 मध्ये नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे 44 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यावेळी प्रथमच, "कवी बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक त्यांचे मूळ गाव मर्ढे, ता. जि. सातारा येथे उभारण्याचा ठराव मंजूर झाला. सन 1993 मध्ये ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. या संमेलनाच्या उर्वरीत निधीमधून संमेलनाचे स्वागताध्यक्ष (कै.) आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारातून साहित्य संमेलन ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टमार्फत त्याच वर्षी पहिले अभिजात मराठी साहित्य संमेलन सातारा येथे घेण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी होते. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावच्या सीमेवर मर्ढेकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी मर्ढेकरांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर, कवी अशोक नायगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, पुढे ही भूमीपूजनाची जागा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित केली गेली. त्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मर्ढेकर स्मारक समिती नव्याने स्थापन करण्यात आली. त्यामध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष, साहित्यिक रा. रं बोराडे, डॉ. नरेन्द्र दाभोलकर असे मान्यवर होते. मर्ढेकरांचे स्मारक मर्ढे गावातच उभे करायचे, या हेतूने काम पुन्हा सुरू झाले आणि मर्ढे गावातील भैरोबा मंदिराजवळची गांधी स्मारकाची जागा मर्ढेकर स्मारकासाठी मुक्रर करण्यात आली. कऱ्हाड येथील वास्तुरचनाकार उदयन श्रीनिवास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून स्मारकाची इमारत उभी राहिली. या स्मारकाचे भूमीपूजन आ. रामराजे निंबाळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर सातारा येथील कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी, स्मारकाच्या लोकार्णासाठी, मर्ढेकरांच्या जयंतीदिनी 1 डिसेंबर 2015 रोजी पुणे येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर मर्ढेकर स्मारक समितीची नव्याने स्थापना करण्यात आली. मात्र त्यानंतरही आजअखेर हे स्मारक अपुरेच आहे. स्मारकाच्या पाठपुराव्यासाठी मर्ढे येथील मर्ढेकरप्रेमी अजित जाधव आणि अरविंद शिंगटे यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला आहे. मर्ढेकरांची कविता कार्यक्रम साधारणपणे ऐशीच्या दशकात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी, त्यांची पत्नी, साहित्यिक सुनिताबाई देशपांडे यांच्यासमवेत मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाचे काही जाहीर कार्यक्रम केले. त्यानंतरही काही काव्यप्रेमींनी मर्ढेकरांच्या कवितांच्या सादरीकरणाचा प्रयत्न केला. सातारा येथील कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी मर्ढेकरांच्या निवडक 25 कवितांवर आधारित "मर्ढेकरांची कविता' हा कार्यक्रम बसवला. त्यामध्ये वारुंजीकर यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील अन्य दहा कलाकार मर्ढेकरांच्या कविता सादर करतात. या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग मर्ढे येथे 17 जुलै 2016 रोजी सादर करण्यात आला. तर पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहातील या कार्यक्रमाला मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. अक्षयकुमार काळे, कथाकार भारत सासणे यांच्यासह अनेक मर्ढेकरप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन