मुद्रण
मुद्रण, अर्थात छपाई, (इंग्लिश: Printing, प्रिंटिंग ;) म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
इतिहास
संपादनछपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते. तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले. छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला शाई लावली जाई. हा साचा कागदावर दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रती मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या.
तंत्र
संपादन- छपाई मध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका (बहुधा सपाट) माध्यमावर घेतात. नंतर ते माध्यम छपाई यंत्रावर लावून त्यावर शाईचा रूळ फिरवला जातो. रुळावरील शाई ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने ती प्रतिमेला लागते. ही शाई लागलेली प्रतिमा कागदावर दाबली जाते. त्यावरून कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट प्लेट्स, दगड, स्क्रीन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलीफ छपाई म्हणतात.
- छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रीन द्वारे छपाई वगरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हंटले जाते.
- तिसऱ्या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्ह्युअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात.
यांत्रिक छपाई
संपादनआज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत.
- शिफ्ट फेड यंत्र - या यंत्रावर कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे एकाच जागेवर बदलत राहून छपाई होते. शीट फेड यंत्रामध्ये कोरे कागद रचून यंत्राच्या एका बाजूला ठेवले जातात. याच प्रकारच्या स्वयंचलित यंत्रांमध्ये एकेक कागद हवेच्या आकर्षणाने उचलला जातो आणि साच्याखाली सारला जातो. साच्यावरील शाईची प्रतिमा कागदावर उमटते व छपाई होते. छपाई झाल्यावर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला ते कागद एकमेकावर रचले जातात. शीट फेड यंत्रावर छपाईचा वेग कमी असतो. तसेच एका वेळी कागदाच्या एकाच बाजूला छपाई होऊ शकते.
शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा कागद किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. वर्तमानपत्राचा कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो.
- रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी यंत्र असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. जर्मनीत तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रिळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते.
संगणकीय छपाई
संपादनसंगणकीय, अंकीय किंवा डिजिटल छपाई :
छोट्या प्रमाणात छपाई करण्यासाठी डिजिटल छपाईचा उपयोग केला जातो. यासाठी बहुदा ए४ अकारमानाचा कागद वापरात येतो. यासाठी निरनिराळी तंत्रे वापरली जातात.
- ब्ल्यू प्रिंट - इमारतींच्या आराखड्यांच्या नकाशांच्या प्रती काढण्यासाठी वास्तुविशारद ब्ल्यू प्रिंट वापरात. यात अमोनियाचा व इतर रसायनांचा वापर करून प्रतिमा कागदावर उमटवली जाते.
- डेझी व्हील - यामध्ये अक्षरे डकवलेले एक चाक असते. हे चाक सदैव फिरते असते. आवश्यकतेनुसार ते कागदाला टेकते व अक्षर उमटते.
- डॉट मॅट्रिक्स - खिळ्यांचा एक संच एका कॉइलमध्ये ठेवलेला असतो. या संचातील खिळे आवश्यकतेनुसार विद्युतचुंबकीय शक्तिद्वारे शाईच्या रिबिनवर आपटतात आणि छपाई होते.
- लाईन छपाई - यामध्ये अक्षरे डकवलेली एक पट्टिका असते. आवश्यकतेनुसार ती कागदाला टेकते व अक्षर उमटते. एकावेळी संपूर्ण ओळ छापली जात असल्याने हे छपाई वेगवान असते.
- हीट ट्रान्सफर - उष्णतेचा वापर करून विशिष्ट प्रकारच्या कागदावर प्रतिमा उमटवली जाते. फॅक्स यंत्रात याचा उपयोग दिसून येतो.
- इंक जेट - शाई एका जेट नळीतून कागदावर फवारून छपाई केली जाते.
- इलेक्ट्रोग्राफी - टोनर किंवा शाई कागदावरचा विशिष्ट भाग विद्युतचुंबकीय भारित करून ओढली जाते आणि उष्णतेने चिकटवली जाते.
- फोटो कॉपी - हिलाच मराठीत झेराॅक्स (काॅपी) म्हणतात.
परिणाम
संपादनधार्मिक
संपादनधार्मिक ज्ञान पूर्वी बदलत्या समाजानुसार बदलते असे. परंतु छपाईमुळे ते एकाच काळात बंदिस्त झाले.
सामाजिक
संपादनज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला.
पर्यावरण
संपादनछपाईत झाडांच्या खोडापासून बनवलेला कागद वापरला जात असल्याने तो बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई शिसे या धातूपासून बनवलेली असल्याने त्याचेही प्रदूषण होते.