चार हुतात्मा
स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने १९३० मध्ये ९,१० आणि ११ मे असे ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना १२ जानेवारी १९३१ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली..हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.[१][२]
पार्श्वभूमी
संपादन१९१४ ते १९१८ सलग चार वर्ष चाललेल्या पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला होता. त्यावेळी सोलापूरातही पाच कापड गिरण्या होत्या त्यात जवळपास १५ ते २० हजार कामगार काम करत असत. सोलापूरमध्येही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी देखील विरोधात संप पुकारला होता. १९३० मध्ये महात्मा गांधींनी गुजरात मधून सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केली होती, त्याचाच एक भाग म्हणून मीठावर लादण्यात आलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रेस सुरुवात केली. ५ एप्रिल १९३० रोजी दांडी .येथे मीठाचा सत्याग्रह करण्यात आला. समुद्र किनारा नसलेल्या ठिकाणी लोकांनी दारुबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत, असं आवाहन महात्मा गांधींनी केलं होतं. त्यामुळे, सोलापुरातील रूपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या शिंदीच्या झाडांनाही लोकांनी लक्ष्य केलं. मिरवणुकी दरम्यान पोलीस आणि लोकांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले.[१][२]
पोलिसांसोबत संघर्ष
संपादनसविनय कायदेभंग चळवळ मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींना ४ मे १९३० रोजी अटक केले. ही बातमी सोलापूरात पोहचताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरवणुका, पोलिसांची हुर्यो उडवणं, त्यांना गांधी टोपी घालायला लावणं, असे प्रकार सुरू होते. वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शंकर शिवदारे नामक तरुण कार्यकर्ता हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टर नाईट यांच्या दिशेने धावत आला, तेव्हा कलेक्टर नाईट यांच्या जिवास धोका असल्याचं वाटून सार्जंट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्यावर गोळी झाडली. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. दरम्यान, शिवदारे खाली कोसळल्याचं पाहून संतप्त जमाव कलेक्टर नाईट यांच्या दिशेने चाल करून येऊ लागला. त्यांच्या वाहनाला घेराव घातला. मात्र मल्लप्पा धनशेट्टी यांनी जमावाला थांबवलं आणि कलेक्टर नाईट यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. मात्र, यामुळे मल्लप्पा धनशेट्टी हेच जमावाचं नेतृत्व करतात, अशी कलेक्टर नाईट यांची धारणा बनली. या प्रकरणामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८-९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावावर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले.
संतप्त जमावाने मंगळवार पेठ पोलीस चौकीवर मोर्चा काढला, जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं. तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. या घटनेमध्ये दोन पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. कलेक्टर हेनरी नाईट यांनी सोलापूरच्या परिस्थिती संदर्भात मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली. याप्रकाृरणानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते. दरम्यान दि. ९-१०-११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते. या कालावधीत कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर, सरकारी कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. स्वातंत्र्याच्या १७ वर्षे आधिच सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा फडकाविण्यात आला.[१][२]
सोलापूर आणि मार्शल कायदा
संपादनसोलापूरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं काँग्रेस समितीने मुंबई सरकारला कळवलं होतं. तरीही स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे इंग्रजांनी १२ मे रोजी सोलापुरात लष्कर पाठवले आणि सोलापूरात मार्शल लॉ (लष्करी कायदा) लागू करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात करण्यासाठी दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले होते.
सोलापूरच्या नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्यास नकार दिल्यामुळे नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांना लष्करी न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयाचे दंड अशी शिक्षा सुनावली. तर तुळशीदास जाधव यांनी फक्त गांधी टोपी परिधान केल्यामुळे त्यांनाही ७ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपयाचा दंड ठोठवण्यात आला होता. पुढे गांधी-आयर्विन करारानुसार त्यांना शिक्षेमध्ये सवलत देण्यात आली.
मंगळवार पेठ पोलीस चौकीत आग लावण्याच्या गुण्ह्यावरून १३ मे रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा तर १४ मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली. मार्शल लाॅ च्यादरम्यान लष्कराने आंदोलक व काँग्रेस कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार केले. दाव्याने बांधून, सिगारेटचे चटके देऊन त्यांना रात्रभर मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरात सर्वांची धिंडही काढण्यात आली. परिणामी सोलापूर शहरात सर्वत्र शांतता पसरली. ब्रिटिश सरकारच्या १५० वर्षांच्या राजवटीत फक्त सोलापूरमध्येच 'मार्शल लॉ' लावण्यात आला.
चार हुतात्मा
संपादनमल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांच्यावर खटले दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ४९ दिवसांनंतर ३० जून १९३० रोजी मार्शल लॉ मागे घेण्यात आला. मार्शल लॉ मुळे या चौघांना न्यायालयात त्यांच्या
निर्दोषाचे पुरावे देखील सादर करता आले नाहीत. मार्शल लॉ च्याकाळात झालेला खर्च देखील इंग्रजांनी सोलापूरकरांवर अधिक कर बसवून वसूल केला. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांना १२ जानेवारी १९३१ला येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. या सर्व प्रकरणांचे केसरी या वृत्तपत्रात संदर्भ आढळतात.[१][२][३]