ग्लिसेरॉल
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
एक द्रवरूप कार्बनी संयुग. याच्या शुद्ध रूपाला ग्लिसरॉल म्हणतात. रेणुसूत्र (रेणूमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे प्रकार आणि संख्या दाखविणारे सूत्र) C3H8O3. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दाखविणारे सूत्र) 1CH2OH - 2CHOH - 3CH2OH. याच्या रेणूत तीन हायड्रॉक्सिल गट (- OH) असल्यामुळे हे ट्रायॉल या अल्कोहॉलाच्या प्रकारात पडते. त्यावरून त्याचे रासायनिक नाव १, २, ३ - प्रोपेन ट्रायॉल असे होते. याचा रेणुभार ९२·०९ आहे.
शेले या शास्त्रज्ञांनी ऑलिव्ह तेलावर लिथार्जाची (लेड मोनॉक्साइडाची) रासायनिक क्रिया करून १७७९ मध्ये हे प्रथम बनविले व त्यास ऑल्सस हे नाव दिले. शव्हरल यांनी १८१३ मध्ये त्याला ग्लिसरीन ही संज्ञा दिली. याची रासायनिक संरचना व सूत्र १८३६ मध्ये पेलौझी, बर्थेलॉट व त्यांचे सहकारी यांनी निश्चित केली.
उपस्थिती
संपादननिसर्गात ग्लिसरीन मुक्त रूपात आढळत नाही. निरनिराळ्या कार्बनी अम्लांशी संयोग पावून बनलेल्या एस्टरांच्या रूपाने (यांना ग्लिसराइडे म्हणतात) ते वनस्पतिज तेले आणि प्राण्यांतील वसा (चरब्या, स्निग्ध पदार्थ) यांमध्ये तसेच प्राण्यांच्या शरीरातील ग्लिसरोफॉस्फेटांत (उदा., लेसिथिनात) असते.
उत्पादन
संपादनग्लिसरिनाचे उत्पादन पुढील कच्च्या मालापासून करता येते. (१) तेले आणि वसा यांपासून साबण बनविण्याच्या प्रक्रियेत किंवा त्यापासून वसाम्ले (फॅरी अॅसिड्स) वेगळी करण्याच्या प्रक्रियेत उरणारी मिश्रणे, (२) प्रोपिलीन वायू आणि (३) शर्करा. यांपैकी पहिल्या दोहोंपासून याचे औद्योगिक प्रमाणावरील उत्पादन करण्यात येते.
(१) साबण बनविण्यासाठी वनस्पतिज तेले आणि वसा यांचे मिश्रण दाहक सोड्याच्या विद्रावाबरोबर तापवितात. त्यामुळे रासायनिक विक्रिया होते आणि तेले व वसा यांमधील वसाम्लांची सोडियम लवणे (म्हणजेच साबण) बनतात व ग्लिसरीन मोकळे होते. ते मिश्रणरूपाने राहते. साबण पाण्यात थोडा विरघळतो पण मिठाच्या विद्रावात तो जवळजवळ अविद्राव्य (न विरघणारा) आहे. म्हणून मिश्रणातून साबण वेगळा व्हावा यासाठी विक्रिया मिश्रणात मीठ घालतात व वेगळा झालेला साबण काढून घेतात. खाली राहिलेल्या मिश्रणात (याला सोप स्पेंट लाय किंवा स्पेंट लाय म्हणतात) ग्लिसरीन सु. १० ते १५ टक्के असून ते मीठ, क्षारके (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ) व प्रथिने यांत मिसळलेले असते. या मिश्रणातून ग्लिसरीन काढून घेण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. एका प्रक्रियेत स्पेंट लायमध्ये थोडे वसाम्ल मिसळून मिश्रण तापवितात. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या क्षारकाचा साबण बनतो. मिश्रण थंड करून तो काढून टाकतात. राहिलेल्या विद्रावात विरल हायड्रोक्लोरिक अम्ल आणि तुरटीसारखा एखादा किलाटक (तरंगणारा पदार्थ आळवून द्रवाच्या तळाशी बसविणारा पदार्थ) योग्य प्रमाणात मिसळून मिश्रण चांगले ढवळतात आणि अविद्राव्य पदार्थ गाळून काढून टाकतात. राहिलेला विद्राव नंतर दाहक (कॉस्टिक) सोडा मिसळून किंचित क्षारधर्मी (अल्कलाइन) करतात आणि पंपाच्या साहाय्याने निर्वात पात्रात भरून कमी दाबाच्या वाफेने तापवून मिश्रण संहत करतात (मिश्रणातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण जास्त करतात). यावेळी बरेचसे मीठ अलग होते ते काढून टाकतात. सु. ८० टक्क्यापर्तं ग्लिसरीन असलेला विद्राव याप्रकारे मिळतो. तो सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कोळशाच्या थरातून गाळून घेतला म्हणजे जे ग्लिसरीन मिळते त्याला गवताच्या रंगाचे ग्लिसरीन म्हणतात. हे अशुद्ध असून निर्वात बाष्पनाने शुद्ध करता येते.
तेले आणि वसा यांतील वसाम्ले वेगळी करण्यासाठी पाण्याने त्यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे तुकडे करणे) करतात. ही रासायनिक क्रिया उत्प्रेरक (विक्रिया जलद किंवा कमी तापमानास घडावी यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) वापरून नेहमीच्या वातावरण दाबास किंवा उच्च दाब व उच्च तापमान यांचा उपयोग करून, उत्प्रेरकाने किंवा उत्प्रेरकाशिवाय घडवून आणता येते. विक्रियेनंतर वसाम्ले वेगळी काढली म्हणजे जो विद्राव उरतो त्याला ‘स्वीट-वॉटर’ म्हणतात. त्यात ग्लिसरीन असते. स्वीट-वॉटरमध्ये चुना मिसळून मिश्रण चांगले ढवळतात व गाळतात. जो विद्राव मिळतो तो निर्वात बाष्पित्राने (बॉयलरने) संहत केला म्हणजे ग्लिसरीन मिळते. ते नंतर शुद्ध करतात
(२) इ.स. १९४९ पर्यंत ग्लिसरीन वरील प्रक्रियांनीच मुख्यतः मिळविले जात असे. त्यानंतर संश्लेषणानेही (रासायनिक विक्रियांनी साध्या संयुगापासून पदार्थ बनविण्यानेही) ते बनविण्यात येऊ लागले आणि १९६५ च्या सुमारास एकंदर उत्पादनाच्या सु. ६० टक्के इतके उत्पादन या पद्धतीने होऊ लागले.
या पद्धतीत खनिज तेलाच्या शुद्धीकरणात मिळणारा प्रोपिलीन वायू कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढील तीन मार्गांनी प्रोपिलिनापासून ग्लिसरीन बनविता येते.
( अ ) कोरड्या प्रोपिलिनावर क्लोरिनाची विक्रिया करून प्रथम ॲलिल क्लोराइड बनवितात. त्यावर हायपोक्लोरस अम्लाची विक्रिया केली म्हणजे डायक्लोरोहायड्रिनांचे मिश्रण मिळते. कॅल्शियम हायड्रॉक्साइडाने त्यापासून एपिक्लोरोहायड्रीन बनवून त्याचे जलीय विच्छेदन केले म्हणजे ग्लिसरीन बनते.
(आ) या पर्यायात प्रोपिलिनाचे उत्प्रेरकाच्या सान्निध्यात प्रथम ॲक्रोलीइनात रूपांतर करण्यात येते. ऑस्मियम टेट्राऑक्साइडाच्या (OsO4) उपस्थितीत हायड्रोजन पेरॉक्साइडाने त्यापासून ग्लिसराल्डिहाइड बनवितात व त्याच्या हायड्रोजनीकरणाने (संयुगात हायड्रोजनाचा समावेश करण्याच्या क्रियेने) ग्लिसरीन मिळवितात.