ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात.[]

ज्या दिवशी सूर्य/चंद्र ग्रहण असते त्या दिवशी सूर्य/चंद्र हा राहूजवळ किंवा केतूजवळ असतो. म्हणूनच जनसामान्यांच्या दृष्टीने, ज्या दिवशी राहू किंवा केतू हे राक्षस सूर्याचा किंवा चंद्राचा ग्रास घेतात त्या दिवशी ते ते ग्रहण होते.

ग्रहणाचे साधारण तीन प्रकार आहेत:

  1. ग्रहण (सूर्यग्रहण, चंद्रग्रहण)
  2. अधिक्रमण
  3. पिधान

सूर्यग्रहण

संपादन
मुख्य लेख: सूर्यग्रहण
 
इ.स. १९९९ साली दिसलेले खग्रास सूर्यग्रहण व तेजोवलय
 
सूर्यग्रहण

जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते. पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते.

खग्रास सूर्यग्रहण

संपादन

खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एकसारखेच भासते. त्यामुळे जेव्हा चंद्र सरळ रेषेत पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या वेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो; या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन तेथे चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागांतूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.

तेजोवलय (Corona)

संपादन

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या भोवती वर्तुळाकार प्रखर किरणे दिसतात. याला तेजोवलय असे म्हणतात. हे तेजोवलय म्हणजे एरवी आपणांस न दिसू शकणारे, सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाबाहेरील अति-तप्त असे आवरण असते.

खंडग्रास सूर्यग्रहण

संपादन

खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे. सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाशस्रोत आहे. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन जशी चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) तयार होते, तशीच विस्तारित प्रकाशस्रोतामुळे प्रच्छायेभोवती फिकट सावली (उपच्छाया) देखील पडते. उपच्छायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.

खंडग्रास सूर्यग्रहणामागे दोन कारणे असू शकतात.

  1. पृथ्वीवरील या फिकट सावलीच्या भागांतून पाहिल्यास सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो. तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
  2. कधी कधी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये अगदी एका रेषेत न येता थोडा वर किंवा खाली असतो. या स्थितीमध्ये चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवर पडत नाही, पण उपच्छाया काही प्रमाणात पृथ्वीवरील काही भागांवर पडते. या भागांतून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.

कंकणाकृती सूर्यग्रहण

संपादन

चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.

चंद्रग्रहण

संपादन
मुख्य लेख: चंद्रग्रहण

जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच पौर्णिमा ही तिथी असते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसते. चंद्रग्रहणात आपण चंद्रावर पडलेली पृथ्वीची सावली पहात असल्याने पृथ्वीच्या अनेक भागातून हे संबंधित वेळी दिसते.

खग्रास चंद्रग्रहण

संपादन

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्र आकाराने लहान असल्याने पृथ्वीच्या प्रच्छायेतून पार जाण्यास त्यास जास्त कालावधी लागतो. म्हणून खग्रास चंद्रग्रहण साधारण तासभर दिसू शकते. खग्रास सूर्यग्रहणाप्रमाणे खग्रास चंद्रग्रहणात चंद्र गडद किंवा अदृश्य न होता तांबूस, लालसर होतो. यामागे पृथ्वीच्या वातावरणामुळे विखुरणारा सूर्यप्रकाश कारणीभूत असतो.

खंडग्रास चंद्रग्रहण

संपादन

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी एका रेषेत न येता पृथ्वीची गडद सावली (प्रच्छाया) अंशतः चंद्रावर पडते तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

चंद्रग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. साध्या डोळ्यांनी ही चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद लुटता येतो.

 
चंद्रग्रहण

अधिक्रमण

संपादन

जेव्हा एखादी लहान कोनीय माप (म्हणजेच पृथ्वीवरून दिसणारे भासमान लहान आकारमान) असलेली खगोलीय वस्तू (जसा बुध ग्रह) मोठे कोनीय माप असलेल्या (जसा सूर्य) खगोलीय वस्तूच्या व पृथ्वीच्या मध्ये येते, तेव्हा दिसणाऱ्या घटनेला अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला पृथ्वीवरून बुधशुक्र यांची सूर्यावरील अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणामध्ये बुध किंवा शुक्र यांचे गडद व बिंदुवत् बिंब एका काळ्या ठिबक्याप्रमाणे सूर्याच्या तेजस्वी बिंबासमोरून जाताना दिसते.

बुधाची अधिक्रमणे ही साधारण एका शतकात १३ ते १४ वेळा दिसू शकतात. इ. स. २०१६ मध्ये ०९ मेला बुधाचे अधिक्रमण पृथ्वीवरील काही ठिकाणांहून दिसले होते. पुढील बुधाचे अधिक्रमण हे २०१९ मध्ये ११ व १२ नोव्हेंबरला दिसणार आहे. शुक्राची अधिक्रमणे मात्र खूपच दुर्मीळ असतात. इ.स. २००४ मध्ये ०८ जूनला शुक्राचे अधिक्रमण झाले होते; त्यानंतर इ.स. २०१२ मध्ये ५ व ६ जूनला पृथ्वीवरील काही ठिकाणहून २१व्या शतकातील शुक्राचे शेवटचे अधिक्रमण पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली होती. आता शुक्राचे पुढील अधिक्रमण इ.स. २११७ मध्ये १० व ११ डिसेंबर या तारखांना दिसेल. ही अधिक्रमणे पृथ्वीच्या सर्व भागावरून एकाच वेळी दिसतीलच असे नाही.

सूर्यग्रहणाप्रमाणेच अधिक्रमण पाहताना देखील डोळ्यांची योग्य काळजी घेऊन योग्य उपकरणे वापरून निरीक्षण करतात.

पिधान

संपादन

जेव्हा एखादी लहान कोनीय माप (म्हणजेच पृथ्वीवरून दिसणारे भासमान लहान आकारमान) असलेली खगोलीय वस्तू (जसे दूरचा तारा) मोठे कोनीय माप असलेल्या (जसे चंद्र) खगोलीय वस्तूच्या मागे झाकली जाते, तेव्हा दिसणाऱ्या घटनेला पिधान असे म्हणतात. आपल्याला पृथ्वीवरून अनेक ताऱ्यांची तसेच काही ग्रहांची देखील चंद्रामुळे घडणारी पिधाने दिसतात. पिधान ही घटना दुर्मीळ नाही. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना त्याच्या मागे बिंदुवत् दिसणाऱ्या ताऱ्यांना बरेच वेळा झाकत असतो.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ग्रहण". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-12-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

फोबोस उपग्रहामुळे मंगळावरून दिसलेले सूर्यग्रहण

नासा: ग्रहण संबंधित मुख्यपृष्ठ