अमावास्या
अमावास्या(किंवा अमावस्या) ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्यादिवशी(रात्री) पृथ्वीवरून, चंद्र दिसत नाही, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. म्हणजेच चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तो दिवसा आकाशात असतो पण सूर्याच्या प्रकाशामुळे तो दिसत नाही. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र-गुजरात-कर्नाटकांत अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून पुढचा (चांद्र)महिना सुरू होतो.
अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील त्या प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हणले आहे. यावरून अत्रींनी सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते.
अधिक माहिती
संपादनअमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हणले आहे.) सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अमावास्यान्त महिने असल्याने या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात, पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यांचा नंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.
- सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
- शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात.
- भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते.
- आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तरी भारतात ती श्रावण महिन्यातली अमावास्या असते.
- महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या (कुशोत्पाटिनी अमावस्या) हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो.
- सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते.
- मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावास्या हे नाव आहे.
- मौनी अमावास्या पौषात येते.
- माघ अमावास्येला द्वापारयुगादी अमावास्या म्हणतात.
संदर्भ
संपादनभारतीय सांस्कृतिकोश खंड १
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |